भारतीस संघाचा हिटमॅन टेस्टमध्ये सध्या सतत संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. गेल्या 15 कसोटी डावांमध्ये त्याला 10.93 च्या सरासरीनं फक्त 164 धावा करता आल्या आहेत. बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमधील खराब कामगिरीनंतर त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.
रोहित आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी क्रिकेटकडे वळला आहे. रोहित शर्मानं आज 23 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध जवळजवळ 10 वर्षांनी रणजी सामना खेळला. पण त्याचा कसोटीमधील संघर्ष येथेही पाहायला मिळाला. तो फक्त 3 धावा करुन बाद झाला.
त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरूध्द चांगली फलंदाजी करणारा युवा खेळाडू यशस्वी जैस्वालही या सामन्यात विशेष कामगिरी करु शकला नाही. यशस्वी जयस्वाल 8 चेंडूत 5 धावा करुन बाद झाला. तर रोहित 18 चेंडूत 3 धावांवर बाद झाला.
मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. मात्र जम्मू आणि काश्मीरच्या गोलंदाजांनी त्यांना जास्त वेळ मैदानात टिकू दिलं नाही.
दुसरीकडे, कर्नाटकविरुद्ध पंजाब संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली. या सामन्यात गिलनं प्रभसिमरन सिंगसोबत डावाची सुरुवात केली. मात्र गिलही विशेष काही करू शकला नाही. त्याचा खराब फॉर्म इथंही कायम राहिला. त्यानं 8 चेंडूत 1 चौकारासह 4 धावा काढून बाद झाला.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्याकडे भारताचे दिग्गज फलंदाज म्हणून पाहिलं जात. मात्र, हे तिघंही रणजी हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात पूर्णपणे फेल ठरल्याच पाहायला मिळतंय.