New Zuari Bridge: पत्रादेवी-पाळोळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पत्रादेवी-दोडामार्ग-केरी-मोले-पाळोळे अशा बायपासला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून जमीन अधिग्रहण करण्यासाठीचे 50 टक्के पैसे आणि स्टील, सिमेंटवरचा जीएसटी खर्च राज्य सरकार भरण्यास तयार असल्यास या पुलाच्या अंतिम सर्वेक्षणानंतर मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित असलेल्या झुआरी केबलस्टेड पुलाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते भव्य आतषबाजीत लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार फ्रान्सिस सार्दिन, विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गडकरी यांच्यामुळेच हा प्रकल्प साकार होऊ शकला. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत आहे. अटलसेतू उद्घाटनावेळी त्यांनी ‘हाउ ज द जोश’ असे विचारले होते. ती ऊर्जा घेऊन आम्ही काम करत आहोत.
गेल्या 30 वर्षांत वाहतुकीसंबंधी दक्षिण गोव्यातील सर्वांनी जो त्रास भोगला तो यापुढे होऊ नये. मनोहर विमानतळ कार्गो विमानतळ असल्याने दक्षिण गोव्यातील माल आणण्यासाठी या पुलाचा फायदा होईल. याशिवाय मुरगाव बंदरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी फायदा होईल.
यावेळी श्रीपाद नाईक, नीलेश काब्राल यांची भाषणे झाली. यावेळी राज्यातील खड्ड्यांच्या संबंधित सूचना आणि इतर माहिती मिळविणाऱ्या ॲपचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले.
नेटकी व्यवस्था आणि भव्य सोहळा
या पुलाचा उद्घाटन सोहळा पुलावरच भव्य स्टेज उभारून आज साजरा करण्यात आला. यासाठी राज्य सरकारच्या वतीने नेटके नियोजन केल्याचे दिसून आले. यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी कार्यरत होती.
स्वागत गीतापासून हारतुरे, भेटवस्तू, पाहुण्यांची आणि नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय, टॉयलेटची सोय पुलावर चोखपणे करण्यात आली होती.
रेस्टॉरंट आणि व्हिविंग गॅलरी
2,530 कोटींच्या भव्य प्रकल्पातील मुख्य टॉवरवर रिव्हॅलविंग रेस्टॉरंट आणि व्हीविंग गॅलरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधी यापूर्वी दोनदा काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी आता केंद्र व राज्य सरकार काही पैशांची गुंतवणूक करून हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.
अमेरिकेप्रमाणेच वाहतुकीच्या सुविधा
मंत्री गडकरी म्हणाले, येत्या 2024 पर्यंत देशातील वाहतुकीच्या साधनसुविधा अमेरिकेइतक्याच चांगल्या करण्याचा केंद्र सरकारने निर्धार केला आहे. आम्ही त्या पद्धतीने कामही सुरू केले आहे. राज्यात सुरू असलेली रस्ते वाहतुकीची कामे तातडीने पूर्ण केली जातील. ‘भारतमाला’ योजनेअंतर्गत राज्यात 216 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची 17,726 कोटींची कामे सुरू असून पणजी-हैदराबाद या रस्त्यासाठी 6,176 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
मान्यवरांचा सत्कार आणि सानुग्रह साह्य
प्रकल्प उभारण्यासाठी काम केलेले उत्तम पार्सेकर, प्रशांत हेगडे, दिनेश गुप्ता, दत्तप्रसाद कामत, संजय अस्थाना, अतुल भोबे, अतुल जोशी या अभियंते, सल्लागारांचा सत्कार करण्यात आला. शिवाय प्रकल्प साकारताना झालेल्या अपघातात दोन मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाखांची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
पुलावर रंगले नाराजी नाट्य
झुआरी पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून येत मोठे नाराजी नाट्य रंगले. या नाट्याचा केंद्रबिंदू केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही दाद न दिल्याने अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मध्यस्थी करावी लागली आणि या नाराजी नाट्यावर पडदा टाकावा लागला. मात्र, एक कार्यकर्ता बोलून गेला ‘कुणाच्या जीवावर हे सुरू आहे!’ वापरा आणि फेकून द्या, हे आता भाजपात वाढू लागले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.