Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; युरींच्या शुभेच्छा बॅनरवरून चर्चा

Khari Kujbuj Political Satire: उत्तराखंड येथील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडामंत्री गोविंद गावडे गेले होते हे कोणाला ठाऊक तरी होते का?

Sameer Panditrao

युरींच्या शुभेच्छा बॅनरवरून चर्चा

‘सुतावरून स्वर्ग गाठणे’ अशी एक म्हण आहे. काही लोक राहीचा पर्वत करण्यात समाधान मानतात. असाच प्रकार कुंकळळी मतदारसंघात घडला आहे. कुंकळ्ळीचे मतदारसंघाचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी फेस्तानिमित्त जनतेला शुभेच्छा देण्यासाठी उभारलेला बॅनर वादाला कारण ठरला आहे. युरी आलेमाव यांनी फेस्ताचा शुभेच्छा बॅनर उभारला. मात्र, फातर्पा जत्रेनिमित्त जनतेला शुभेच्छा बॅनर का नाही उभारला? असा प्रश्न आता काही युरी विरोधक विचारायला लागले आहेत. काही लोकांना वाद उकरून काढण्याची सवय असते त्याला काय म्हणावे? ∙∙∙

क्रीडामंत्र्यांना अविस्मरणीय अनुभव

उत्तराखंड येथील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडामंत्री गोविंद गावडे गेले होते हे कोणाला ठाऊक तरी होते का? राज्यातच नव्हे, तर तेथील आयोजकांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांची दखल घेण्याचा प्रश्नच उद्‍भवला नाही. त्यांना देहरादून येथे पाससाठी तिष्ठत रहावे लागले. शेवटी महाराष्ट्रातील काही अधिकारी मदतीला धावले. त्यांच्या कोट्यातील काही पास त्यांना मिळू शकले आणि मानहानी टळली. बक्षीस वितरण सभारंभातही त्यांना ऐनवेळी प्रवेश मिळाला. यामुळे संतप्त झालेल्या क्रीडामंत्र्यांनी उत्तराखंड सोडले आणि दिल्लीतून थेट गोव्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत सहाजण होते. नंतर त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या पदक विजेत्यांचे साधे अभिनंदन करण्याचीही तसदी घेतली नाही. याची एक खुमासदार चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे. ∙∙∙

पोलिसांची चौकशी गुलदस्त्यात

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान हा क्राईम ब्रँच विभागात असलेल्या पोलिस कोठडीतून पळाला होता. तो फरारी असताना त्याने व्हिडिओ व्हायरल केला होता त्यामध्ये काही पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनीच त्याला गोव्याबाहेर जाण्यास मदत केल्याचा आरोप केला होता. हा व्हिडिओ आपचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांच्याकडे कसा पोहोचला याचा तपास जुने गोवे पोलिसांनी केला. मात्र, संशयित सुलेमान याने ज्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेतली होती त्यांच्या जबान्याच नोंदवण्यात आल्या नाहीत. एखाद्या प्रकरणात पोलिसांचे नाव समोर आल्यास त्याची चौकशी केली जाते. मात्र, या प्रकरणात तसे का झाले नाही असा प्रश्‍न लोकांनाही पडला आहे. उपसभापतींचेही नाव संशयित सुलेमान याने घेतले होते. त्यामुळे त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस तपास योग्य दिशेने करण्यात येत आहे की फक्त विरोधी नेत्यांची सतावणूक करून पोलिसांची पाठराखण करण्याचा प्रयत्न पोलिस खाते करत आहे असेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. ∙∙∙

महाकुंभसाठीची रेल्वेसेवा कधी?

गोवा सरकारने राज्यातील महाकुंभसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. या रेल्वेसेवेमुळे आपल्याला सुरळीतपणे प्रयागराजचा दौरा करता येईल या आशेने महाकुंभसाठी जाऊ इच्छिणारे हजारो गोमंतकीय या विशेष रेल्वेसेवेची वाट पाहात आहेत. हा महाकुंभ संपुष्टात येण्यासाठी आता काही मोजकेच दिवस राहिले आहेत. त्यामुळे ही विशेष रेल्वेसेवा नेमकी कधी सुरू केली जाईल की ‘ये तो एक जुमला था...’ असे सांगितले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

दामूंची हुशारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची पहिली पत्रकार परिषद सोमवारी घेतली. केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यासाठीच्या या पत्रकार परिषदेला त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनाही पाचारण केले होते. दोघे मंत्री बोलल्याने साहजिकच पत्रकारांच्या प्रश्नांचा रोख मंत्र्यांकडेच राहिला. खासदार सदानंद शेट तानावडे अशी पत्रकार परिषद घेताना एखाद्या सचिवाला सोबत घेत असत. त्यामुळे राजकीय प्रश्नांचा मारा त्यांना सहन करावा लागत असे. कोणालाही न दुखावण्याच्या आपल्या शैलीत ते उत्तरेही देत असत. दामू यांनी दोन मंत्र्यांना आणून आपल्यावरचे राजकीय प्रश्न टाळले अशी चर्चा यानंतर मात्र ऐकू आली. ∙∙∙

तवडकरांचा लोकसंग्रह

काणकोणातील आमोणे गाव रविवारी चर्चेत होते. निमित्त होते विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी नव्या बांधलेल्या घराच्या गृहप्रवेश व वास्तुशांत कार्यक्रमाचे. तवडकर यांचा लोकसंग्रह किती आहे याचे दर्शन रविवारी आमोणे येथे घडले. एरव्ही लोकोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील लोक तेथे जात असतातच. रविवारी मात्र राज्यभरातील अनेकजण आवर्जून आमोणे येथे गेले होते. दिवसभरात तेथे गेलेल्यांची गणतीच नसावी अशी मोठी गर्दी उसळली होती. तवडकर यांच्या अफाट लोकसंग्रहाचे दर्शन यामुळे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

सुस्त कारभार

पोलिस खात्यात सध्या सुस्त कारभार होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याचे ऐकू येते. जबाबदार नागरिकांनी कुत्रे किंवा इतर पशूंना होत असलेल्या मारहाणीवरून केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काही उपनिरीक्षक योग्य दाद देत नसल्याच्या घटना घडत आहेत. एखादा अधिकारी तक्रार घेऊन आल्यास ती आत जाऊन देण्यापूर्वी प्रथम उपनिरीक्षक किंवा संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी ऐकून घेणे आवश्यक असल्याची प्रक्रिया असते. परंतु काही उपनिरीक्षक सुस्त झाल्याने त्यांना याची परवा नाही. अशा घटना जर संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत घडत असतील, तर सर्वसामान्यांचे कल्याणच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. याच पद्धतीने पोलिस वागत असतील, तर येणाऱ्या काळात तक्रारीच केल्या जाणार नाहीत. कारण खुद्द पोलिसांना रस नसल्याने लोक कशासाठी धाडस करतील? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT