Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; युरींचा राग की दबाव?

Goa Latest Political News: मडगावचे गांधी मार्केट व बाबू आजगावकर हे गेले अनेक वर्षांपासून एक समीकरण बनून गेले आहे. सोमवारी त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

गोमन्तक डिजिटल टीम

युरींचा राग की दबाव?

सोमवारी झालेल्‍या राज्‍य कार्यकारिणीच्‍या बैठकीत गोवा फॉरवर्डने आगामी विधानसभेत २५ जागा लढवण्‍याचा निर्णय घेतला. पक्षाच्‍या या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस–गोवा फॉरवर्ड युती राहणार की नाही? असा प्रश्‍‍न निर्माण झालेला आहे. नुकत्‍याच झालेल्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाच्‍या अखेरच्‍या दिवशी सभागृहात घडलेल्‍या एका घटनेवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरदेसाईंवर ‘सेटिंग’चा आरोप केलेला होता. त्‍यामुळे दुखावलेल्‍या फॉरवर्डच्‍या नेत्‍यांनी वारंवार युरींवर तोंडसुख घेण्‍यास सुरुवात केलेली आहे. यातून युरींवरील रागाचा वचपा काढण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड २५ जागा लढवण्‍याचा विचार करीत आहे की काँग्रेसवर आतापासूनच दबाव टाकण्‍यासाठी? असा प्रश्‍‍न मतदारांना निश्‍चित पडेल. ∙∙∙

बाबूचा ‘शो मस्ट गो ऑन’

मडगावचे गांधी मार्केट व बाबू आजगावकर हे गेले अनेक वर्षांपासून एक समीकरण बनून गेले आहे. सोमवारी त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. या मार्केटमधील दुकानांचे सीमांकन करण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते.त्यांना तेथील व्यापाऱ्यांनी अटकाव केला. ‘लीडरशीप’ अर्थातच बाबू सरांनी केली. आपण अन्याय सहन करून घेणार नाही, असे त्यांनी आपल्या नेहमीच्याच स्टाईल मध्ये ठणकावून सांगितले. बाबू नेहमी ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणतात. त्याची आठवण पुन्हा एकदा त्याच्या समर्थकांना आली. बाबूचा आवेश ठीक आहे. मात्र या गांधी मार्केटमध्ये सर्व काही कायदेशीर आहे का,असा सवाल मठग्रामस्थ करतात बरं का! ∙∙∙

राजकीय दबाव कुणाचा?

सध्या कुडचडे सेक्स स्कॅन्डल मधील संशयिताला राजकीय संरक्षण असल्याने पोलिसांनी हे प्रकरण सौम्यपणे हाताळले आहे, असा आरोप होत आहे. वास्तविक कुठल्याही ठिकाणी पोलिस, उपजिल्हाधिकारी असे प्रशासकीय अधिकारी सत्ताधारी आमदारांच्या मर्जीतील असतात. त्यामुळे हा राजकीय दबाव आमदारांकडून येतो की, अन्य कुणी राजकारणी असा आहे, जो आमदारांपेक्षा प्रभावी आहे ज्याचे पोलिस ऐकतात? की हे भलतेच राजकारण कुणी करू पाहत आहेत? की या गंभीर अशा प्रकरणाचाही वापर करून काहीजण आपली राजकीय पोळी भाजून घेऊ पाहतात? सध्या कुडचडे बाजारात सेक्स स्कॅन्डल बरोबर हीदेखील चर्चा चालू आहे. ∙∙∙

म्हापशातील गुंंतागुंत

म्हापशातील पालिका निवडणुकीत आपल्याला रस आहे, असे जाहीर करून कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आपल्या विस्तारवादी राजकारणाची प्रचिती दिली आहे. मध्यंतरी ते आपल्या मुलासाठी मांद्रे मतदारसंघ तयार करत असल्याची चर्चा होती. ती चर्चा मागे पडल्यानंतर म्हापशातील विषयावरून लोबो बोलत असत. म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी लोबो यांनी आपला मतदारसंघ पहावा असे प्रत्युत्तर देऊनही लोबो यांनी त्यातून काही धडा घेतलेला दिसत नाही. म्हापशाला चांगले नगरसेवक मिळायला हवेत, असे कारण पुढे करत त्यांनी पालिका मंडळ निवडणुकीत आपल्याला निश्चित रस आहे, असे सांगत डिसोझांसमोरील कटकटींत वाढ केली आहे. भाजप पक्षाचे प्रदेश पातळीवरील नेतृत्व हा विषय कसा हाताळतात हे पाहणे आता त्यामुळे औत्सुक्याचे ठरले आहे. ∙∙∙

पाटकर यांना विषय मिळाला

कुडचडे येथे अल्पवयीन मुलींवर एका नगरसेवकाच्या मुलाने अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना कुडचड्यात पाय रोवण्यास विषय मिळाला आहे. कुडचड्यातून त्यांनी विधानसभेची मागील निवडणूक लढवली होती. कुडचड्यात सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी मोठा विषय अलिकडे हाती येत नव्हता. जेटीचा विषय गाजणार असे दिसतानाच तो विस्मृतीत जाण्याइतपत शांतता त्या आघाडीवर निर्माण झाली आहे. त्यातच हा सेक्स स्कॅण्डलचा विषय पुढे आला आणि त्यात संशयिताचा पिता हा सत्ताधारी पक्षाचा असल्याने पाटकर यांच्या विरोधाला धार चढली आहे. आता कुडचड्याचे राजकारण यावरून रंगणार, असे दिसू लागले आहे. ∙∙∙

फोंड्यातील राजकारण असेही!

राज्य मंत्रिमंडळातील सदस्य सुदिन ढवळीकर हे वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेत. केतन भाटीकर हे फोंडा पोट निवडणुकीत सध्या कॉंग्रेसचे उमेदवार असले तरी ते आधी ‘मगो’मध्ये होते. त्यामुळे ढवळीकर यांची भाटीकर यांना या पोट निवडणुकीत सहानुभूती आहे असे चित्र रंगवणे सुरू झाले आहे. यामुळे ढवळीकर यांचे मंत्रिपदही धोक्यात आल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. भाजपसोबत ‘मगो’ची युती असून त्यांनी रितेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. असे असताना भाटीकर यांना ढवळीकर यांचा पाठिंबा गृहित धरून चर्चा सुरू झाल्याने राजकारण वेगळीच दिशा घेत असल्याचे सुचवण्यात येत आहे. त्यातच भाटीकर हे गोवा सुरक्षा मंचाचे ते ‘मगो’चे नव्हेत, असे ढवळीकर यांचे म्हणणेही चर्चेत आणले गेले आहे.∙∙∙

परबांचा युरींवर बाण?

कॉंग्रेसने डॉ. केतन भाटीकर यांना पक्षात घेतले व त्यानंतर फोंडा पोट-निवडणुकीचे तिकीट दिले परंतु हे सर्व करताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी ‘आरजी’वाल्यांशी बोलणी केली नाही, अशी खंत आज पत्रकार परिषदेत तुकाराम उर्फ मनोज परब यांनी व्यक्त केली. त्याही पुढे जाऊन, जिल्हा पंचायत निवडणुकांनंतर कॉंग्रेसच्या कुठल्याच नेत्यांनी युतीसंबंधी संपर्क साधला नाही, असा दावाही परबांनी केला. आता, नगरनियोजन खात्याचे कलम ‘३९-ए’ रद्द करावे म्हणून आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी आमरण उपोषण केले त्यावेळी कॉंग्रेसचे युरी आलेमाव मनोज परबांच्या खांद्याला खांदा लावून वावरत होते. त्यानंतर, विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसचे अलायन्स पार्टनर विजय सरदेसाई यांच्यासोबत न राहता कॉंग्रेस आमदार ‘आरजी’च्या एकमेव आमदारासोबत राहिले. एवढे सख्य असूनही युरींनी युतीची बोलणी केली नाही, याचा राग कदाचित परबांना आला असेल असे दिसते व त्यांनी पाटकर-ठाकरेंच्या आडून विरोधी पक्षनेत्यावर बाण मारण्याची संधी घेतली असावी. त्यातच कॉंग्रेसने ‘आरजी’वाल्यांना विचारूनच सर्व निर्णय यापुढे घेतले तरच युती होईल, असा इशाराच जणू मनोज परबांनी दिल्याची अनेकांची तसेच काही कॉंग्रेसवाल्यांची भावना झाली आहे. ∙∙∙

अधिकाऱ्यांचा ‘ओव्हरटाईम’

कोलवाळ कारागृह प्रशासन वाईट कामांसाठी अलीकडे चर्चेत आहे. कारागृहात अमली पदार्थ मिळणे आणि मोबाईल सापडणे हा गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. आता बड्या संशयितांना जामीनावर सोडण्यासाठी कारागृहातील अधिकारी कर्मचारी ओव्हरटाईम करू लागल्याचे दिसून येत आहे. सरकारी कार्यालयाची वेळ संपल्यानंतर सर्व प्रक्रीया तेथेच थांबवायची असते. न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींची पूर्तता केल्याचे कारागृह प्रशासनाला कार्यालयीने वेळेत कळवावे लागते. मग सुटकेची कागदपत्रे तयार करून संशयितांना कारागृहाबाहेर सोडले जाते. वेळेत हे काम पूर्ण झाले नाही तर सुटका दुसऱ्या दिवसावर जाते. असा नियम असला तरी संशयितांची मर्जी राखण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत थांबून जामिनावर संशयिताला कारागृहाबाहेर सोडण्यात येत असल्याचे प्रकार चर्चेत आले आहेत. सोमवारी अजय गुप्तालाही अशीच मेहरनजर दाखवल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accidents: पत्रादेवी टोलनाक्यावर जबरदस्त अपघात! दोघा अभियंत्यांना बसली धडक; तिघे गंभीर जखमी झाले

Ponda By Election: फोंड्यात घोषणाबाजीने तणाव! भाजप-काँग्रेस आमनेसामने; पोटनिवडणुकीसाठी तिन्ही पक्षांतर्फे अर्ज दाखल

Birch Nightclub Fire: बर्च प्रकरणातील ‘स्लिपिंग पार्टनर’ अजय गुप्ताला दिलासा! सशर्त जामीन मंजूर; 50 हजारांचा जातमुचलका

VIDEO: अखेर ‘म्हादईत’ बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, घटनेमुळे वाळपईसह मडगावातही हळहळ

Curchorem: 'सेक्स स्कॅण्डल' प्रकरणी पॉक्सो गुन्हा! दबावानंतर पोलिसांची कारवाई; धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT