पणजी, ता. ३० ः राज्यात सध्या शेतीला चांगले दिवस येऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोरोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे घरी बसून त्रासलेला वर्ग आता शेतीकडे वळत आहे आणि त्यातूनच हा वर्ग काजू बागायतीकडे झुकला आहे. त्यासाठी कृषी आणि फलोत्पादन महामंडळांच्या सुविधा व योजना फायदेशीर ठरत आहेत. यावर्षी राज्यात नव्याने १२५ हेक्टर म्हणजे ३१२.५ एकर क्षेत्रावर काजूची लागवड झाली असल्याची माहिती कृषी खात्याचे सहायक संचालक प्रदीप मळीक यांनी ‘गोमन्तक'ला दिली.
राज्यात कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि लोकांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. काहींचे व्यवसाय किंवा कारखाने बंद राहिल्याने त्यांनी मूळघरचा रस्ता पकडला. त्याचा परिणाम ही मंडळी आपल्या शेतीकडे वळली आणि पडीक राहिलेली जमीन लागवडीखाली येऊ लागली. शाश्वत उत्पादन देणारे साधन म्हणजे शेती, हे ब्रिद खरे ठरू लागले. राज्यात अनेक ठिकाणी पडीक राहिलेली जमीन काजू बागायतीखाली वहिवाटीला आली. यावर्षी नव्याने १२५ हेक्टर जमीन काजू लागवडीखाली आली आहे. विशेष म्हणजे फलोत्पादन महामंडळाने या लागवडीला महत्त्वाचा हातभार लावला. या खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले की, टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना कोठेही जाता येणार नाही, त्यांची मोठी अडचण होणार आहे. या बाबी लक्षात घेऊन वेंगुर्ला येथून ३५ हजार काजू रोपे आणून ती थेट शेतकऱ्याच्या दारात नेऊन देण्यात आली आहेत. महामंडळाने हा पहिल्यांदाच केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी खात्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर या रोपांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय विविध भाजीपाला, फळभाज्यांची दीड टन बियाणेही शेतकऱ्यांना दारात नेऊन देण्यात आले आहे. रोपे किंवा बियाण्यासांठी ५० टक्के सवलत देऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
मळीक म्हणाले की, राज्य सरकार काजू उत्पादकांना अनुदानही चांगल्याप्रकारे देते. पहिल्यावर्षी राष्ट्रीय फलोत्पादन मिशनअंतर्गत सरकार १२ हजार रुपये प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान देते. तर राज्य सरकार २४ हजारांचे अनुदान देते म्हणजेच एकूण ३६ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळते. एका हेक्टरमध्ये २०० काजूच्या रोपांची लागवड करणे गरजेचे असते. जर नव्याने १२५ हेक्टर जमिनीवर नव्याने काजूची लागवड झाली आहे, म्हटल्यावर २५ हजार रोपांची नव्याने लागवड झाली आहे. तर पूर्वीच्या बागायतील मृत झालेल्या रोपांच्या ठिकाणी नव्याने जी रोपांची लागवड करण्यात आली आहे, त्याचे क्षेत्र १६६ हेक्टर आहे. राज्यात इतर फळांचीही लागवड होत असून, त्या फळांच्या लागवडीखालील क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.
इतर फळ व मसाला लागवडीखालील क्षेत्र
केळी...................१३ हेक्टर
टिश्यु कल्चर केळी...............६ हेक्टर
आंबा, चिकू, पेरू व कलिंगड...............१३ हेक्टर
अननस........३ हेक्टर
मसाल्याची पिके.............१६ हेक्टर
Editing _ Sanjay ghugretkar
goa goa goa
|