पणजी, ‘गोमंतभूमीला ख्यातकीर्त साहित्यिक आणि अभिजात साहित्याचा वैभवशाली वारसा असून, सामाजिक जडणघडणीत त्याचे मोल अपरंपार आहे.
गोवेकरांनी समाजोद्धाराच्या कलासक्त परंपरेचे पाईक होत, कलेसह साहित्य क्षेत्रात गुणात्मक उंची गाठून निर्भीडपणे अभिव्यक्त व्हावे. तरच भविष्यात गोव्याची अस्मिता व सत्त्व टिकेल’, असे प्रतिपादन ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.
येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा’ सभागृहात आज (रविवार) साहित्यिका गीता नारकर यांच्या ‘स्मृती मंथन’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने नायक बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कविवर्य माधव बोरकर, ‘ब्रागांझा’चे अध्यक्ष दशरथ परब व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नायक पुढे म्हणाले, ‘गोवेकरांनी अर्थार्जनासोबतच सामाजिक भानही राखावयास हवे. समाजस्नेही आचरणासह आपली मते निर्भीडपणे मांडावीत’. ज्येष्ठ कवी मनोहरराय सरदेसाई यांच्या आठवणींना उजाळा देत, नायक यांनी त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. ‘नवोदित साहित्यिकांनी कलांच्या सर्वव्यापी छटांचा किमान अभ्यास करावा.
आपल्या साहित्याची वाचकांकडून नेमकी समीक्षा होते आणि ती स्वीकारण्याची तरलता मनी असावी’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गीता नारकर यांच्या काव्यामधील बलस्थाने विषद करून नायक यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती स्तवनाने झाली. सूत्रसंचालन मानसी धाऊस्कर यांनी केले.
अल्पाक्षरी परंतु प्रत्ययकारी मिमांसा
माधव बोरकर यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘कविता’ या संकल्पनेची त्यांनी अल्पाक्षरी परंतु प्रत्ययकारी मिमांसा केली. गीता नारकर यांनी काव्यसंग्रहाचे श्रेय आई-वडिलांसह कुटुंबीयांना दिले.
‘बिंब प्रकाशन’चे दिलीप बोरकर यांनी स्वागतपर भाषणात चांगले, सकस साहित्य वाचन काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.