
साखळी: येथील श्री दत्त मंदिरातील मूर्तीचोरी प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे, मुखत्यार श्याम बोडके यांच्यासह सदस्यांनी नेमके काय घडले याचा तपशील देत प्रशासन चुकल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी मामलेदारांविरोधात संबंधित अधिकारणीकडे तक्रार दाखल करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
बोडके यांनी म्हटले आहे, शुक्रवार २७ रोजी डिचोली मामलेदारांनी सकाळी ११ वा. नोटीस बजावून संध्याकाळी ४ वा. हजर राहण्याची सूचना केली. पण आपणास शक्य नसल्याने खजिनदार विठ्ठल सामंत हे हजर राहिले. त्याच रात्री डिचोली पोलिस स्थानकात चौघांच्या नावाने तक्रार केली.
शनिवार, २८ रोजी सकाळी आपण कार्यालयात आलो असता आपणास पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली. त्यानंतर आपले पूत्र ॲड. शर्मद बोडके व आमचे कायदेशीर सल्लागार ॲड. नेहाल कामत यांनी कायदेशीर व तांत्रिक बाजू सांभाळून व दत्तमहाराजांच्या कृपेने रविवारीच आपणास व दीपेश कामत यांना जामीन मिळाला, असेही श्याम बोडके यांनी सांगितले.
या मूर्ती या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्यावेळी जपमंडपात काढून ठेवल्या होत्या. समितीचेच पदाधिकारी या मूर्ती नेऊन विसर्जित करतात याला चोरी कशी म्हणू शकतो, असा सवाल सचिव गजानन भटगावकर यांनी उपस्थित केला.
घरचेच भेदी देवस्थानची माहिती बाहेर देत आहेत. दत्तवाडी संस्थानात प्रथमच देवस्थान समितीची निवडणूक हात उंचावून झाली. त्यात त्यांचे संपूर्ण पॅनल पडले होते. मागील समितीने नोंदवहीतील इतिवृतांतही यापूर्वी बदलला आहे. या षडयंत्रात त्यांचाच हात आहे, असा आरोप सल्लागार सदस्य दीपेश कामत यांनी केला.
मामलेदार केवळ देवस्थान प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात. जरी मामलेदारांनी तक्रार केली तरी पोलिस त्यास आदेश म्हणून कसे काय घेऊ शकतात ? असा सवाल यावेळी कायदा सल्लागार अँड. नेहाल कामत यांनी यावेळी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.