Para Swimmers Goa
पणजी: दिव्यांगजन जलतरणपटूंची २४वी राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा ऑक्टोबरमध्ये कांपाल येथील जलतरण तलावात झाली. त्यावेळी गोव्यातील चौघे दिव्यांग जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांना पदके मिळाली नाहीत; पण राज्यातील पॅरा जलतरणासाठी ते आशास्थान ठरले.
मंगेश कुट्टीकर, मेल्विन मेंडिस, शेरॉन फिगरेदो, हर्षद सावंत या पॅरा जलतरणपटूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत राज्यातील दिव्यांग जलतरणपटूंचा उत्साह वाढवला. त्यांनी शारीरिक आव्हानांवर मात करत पोहण्याचे तंत्र प्रभावीपणे सादर केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही सहभागी झालेला ५४ वर्षीय मंगेश गोव्यातील पॅरा जलतरणातील अग्रणी नाव आहे. १९९३मध्ये मंगेश यांनी कारकिर्दीला सुरवात केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासह अनेक मैलाचे टप्पे गाठले आहेत. डोळे बांधून तसेच दोन्ही हात बांधून १० किलोमीटरचे अंतर पोहून पार करणारी भारतातील पहिली दिव्यांग व्यक्ती म्हणून मंगेश यांना ओळखले जाते. सतत स्वतः शिकत राहणे आणि अढळ निर्धार या गुणांमुळे हे यश मिळवता आल्याचे ते सांगतात.
गोवा आयआयटीमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले शेरॉन ४१ वर्षीय आहेत. २०१८ साली जलतरणास सुरवात केली आणि २०२१ मध्ये स्पर्धात्मक पॅरा जलतरणात भाग घेतला. विशेषतः ब्रेस्टस्ट्रोक प्रकारावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पोहण्याचे तंत्र सुधारण्याबाबत ते आपले प्रशिक्षक केशव नाईक यांना सारे श्रेय देतात, तसेच आयआयटी गोवामधील आपले सहकारी व संस्थेतील कर्मचारी यांनी दिलेले प्रोत्साहन व पाठबळ याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. स्थानिक प्रशिक्षण सुविधांचा विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांना वाटते.
आपल्या वाटचालीचा मागोवा घेताना मंगेश म्हणाले, ‘हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता; पण दृढनिश्चय आणि स्वतःहून सतत नवनव्या गोष्टी शिकत राहण्याच्या वृत्तीमुळे मला इथपर्यंत पोहोचता आले आहे.’ मंगेश यांचे कर्तृत्व इतरांना सतत प्रेरणा देत राहते. जिद्द, निर्धार असेल तर असाधारण, अशक्यप्राय वाटणारे यशही मिळवता येते ही बाब त्यांच्या या प्रवासातून ठळकपणे समोर येते.
मेल्विन हा २४ वर्षीय आहे. सुरवातीला तो बॅडमिंटन खेळत असे, नंतर जलतरणाकडे वळला. २०२२ पासून स्पर्धात्मक जलतरणास सुरवात झाली. मेल्विनने राज्य पॅरा जलतरण स्पर्धेत ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाइल या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदके मिळवली होती व या कामगिरीमुळेच त्याला राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळाले. राष्ट्रीय स्पर्धेतील आपल्या सहभागाने अनेकांना विविध प्रकारच्या पॅरा क्रीडा स्पर्धांत सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा तो व्यक्त करतो.
२० वर्षीय हर्षद मागील सुमारे पाच वर्षांपासून पॅरा जलतरणात भाग घेत आहे. न्यू डॉन आशादीप या शाळेत शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे हर्षदने आपला अभ्यास सांभाळून जलतरण क्रीडाप्रकारात सहभाग घेण्यास सुरवात केली. पोहण्याबरोबरच हर्षदला नृत्य आणि चित्रकलेची आवड आहे. तो म्हणतो, ‘मला विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे खूप आवडते. जलतरणामुळे मला खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.