Janita Pandurang Madkaikar Dainik Gomantak
गोवा

कुंभारजुवेत मडकईकर राखणार का गड?

अल्पसंख्याकांची मते निर्णायक; मतविभागणीचाही फटका शक्य

दैनिक गोमन्तक

खांडोळा : पांडुरंग मडकईकर यांच्या हक्काच्या कुंभारजुवे मतदारसंघात यंदा काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. कारण गेल्या पाच निवडणुकीत पक्ष बदलून ते नेहमीच विजयी झाले. कारण त्यांची एकगठ्ठा मते या मतदारंसघात आहेत. परंतु आता ते स्वतः रिंगणात नाहीत, शिवाय उमेदवारी पत्नी जनिता यांना उशिरा मिळाली. समर्थकांनीही बंड केले, भाजपात इच्छुकांची गर्दी झाली.

त्यामुळे अंतर्गत मतभेदामुळे यावेळी मतविभागणीचा त्यांना फटका बसणार की अल्पसंख्याकांची मते त्यांना तारणार? हे निकालानंतरच समजणार आहे. सलग पाचवेळा विजयी झालेले पांडुरंग मडकईकर स्वतः नसले तरी त्यांच्या पत्नी जनिता रिंगणात असून त्या हा गड राखणार का, याची उत्सुकता मतदारांत आहे.

कुंभारजुवे हा पारंपरिक मगोपचा बालेकिल्ला, पण नंतरच्या काळात या मतदारसंघावर काँग्रेसचे (Congress) वर्चस्व कायम राहिले. 1975 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली आणि 1977 पासून 1989 पर्यंत मगोपकडे हा मतदारसंघ होता, पण 1994 पासून काँग्रेसकडे हा मतदारसंघ गेला. त्यानंतर मगोप, काँग्रेस, भाजप असा प्रवास करणाऱ्या पांडुरंग मडकईकरांनी मात्र आपला ताबा सोडला नाही. सलगपणे ते पाचवेळा निवडून आले. पण यंदाच्या निवडणुकीत मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने चौरंगी लढतीत भाजपच्या जनिता पांडुरंग मडकईकर यांना लॉटरी लागते की हुलकावणी देते, हे सांगता येणे कठीण आहे. कारण पांडुरंग मडकईर यांची एकगठ्ठा मते किती टिकतील, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

कुंभारजुवे मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात असून भाजप, काँग्रेस, तृणमूल, आरजी, आप, गोंयचो स्वाभिमान या पक्षाबरोबर भाजपचे बंडखोर उमेदवार रोहन हरमलकर हे अपक्ष म्हणून लढत आहेत. या उमेदवारांपैकी राजेश फळदेसाई, रोहन हरमलकर, समील वळवईकर आणि जनिता मडकईकर हे काही महिन्यापूर्वी जणू काही एकाच पक्षाचे होते, एकाच विचाराचे होते. पण उमेदवारीसाठी सगळ्यांनी मार्ग बदलले. गुरू एकीक़डे आणि शिष्य दुसरीकडे ,अशी स्थिती आहे.

अलिकडे समील काँग्रेसमधून तृणमूलमध्ये (TMC) गेले, राजेशने उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन करून काँग्रेसची उमेदवारी पटकावली आणि रोहन हरमलकर यांनी बंडखोरी करून भाजप सोडली. सिद्धेश नाईक यांनी मात्र माघार घेऊन वास्कोकडे मोर्चा वळविला. पण अंतर्गत बंडाळी कायम असून एकमेकांना दगाफटका करण्याच्या वृत्तीमुळे मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे कोणीही ठामपणे आपण विजयी होणारच,असा दावा करत नाहीत. समाज, पक्ष, गटातटांच्या राजकारणामुळे मतदारांच्या मनात गोंधळ उडाला आहे. कारण मतदारांनी बॅनर पाहिले ते वेगळेच होते आणि आत्ता उमेदवार वेगळ्याच पक्षाच्या चिन्हावर उभे असलेले दिसत आहेत.

रोहन हरमलकर, समील वळवईकर हे तसे पूर्वीचे पांडुरंग मडकईकरांचेच खंदे कार्यकर्ते. पण समीलने उमेदवारीसाठी काँग्रेसनंतर तृणमूलला जवळ केले. कारण गेल्या वर्षापासून काम करूनही काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी काँग्रेस, भाजप (BJP) सोडला. रोहन उमेदवारी न मिळाल्यामुळे थेट अपक्ष म्हणून रिंगणात उतरलाही. त्याला कुंभारजुवेतून मोठा पाठिंबा आहे. समाजकार्यकर्ते बाबू रायकर, प्रशांत भंडारी काही पंचाचाही त्यांना पाठिंबा आहे. राजेश फळदेसाई हे तसे उद्योजक असून काँग्रेस पक्षातर्फे आपले नशीब आजमावून पाहात आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद आहे.

एकूणच आप, आरजीपेक्षाही या तिघांसह जेनिता मडकईकरांना मतदारसंघात प्रतिसाद लाभत आहे. पण सगळीकडे मतविभागणीचे गणित पाठ सोडत नाही. त्यामुळे या चौघांच्या लढतीत कोण बाजी मारणार? हे सांगणे कठीण आहे. एकाच परिवारात सामना रंगत असेल, तर मत कोणाला देणार? हा प्रश्नही सर्वसामान्य मतदारांना पडत आहे. त्यामुळेच चौरंगी लढत होणार असून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.

अंतर्गत माघार, पाठिंब्याचा खेळ रंगणार

मागच्या निवडणुकीत 61.35 टक्के मते घेणारे पांडुरंग मडकईकर या निवडणुकीत नाहीत, तर त्यांची पत्नी रिंगणात आहेत. त्यामुळे ही सर्व मते जनिता यांना पडणे शक्य नाही. कारण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. रोहन, समील, राजेश एकाच नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू असल्या तरी प्रत्येकजण जनिता यांचीच मते खेचणार आहेत. त्यामुळे पूर्वीची मडकईकरांची मतांची टक्केवारी घसरणार असून अटीतटीच्या चौरंगी लढतीत अंतर्गत माघार किंवा एकमेकांना पाठिंबा देण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता अधिक आहे.

अल्पसंख्याकांची मते

कुंभाजरजुवे हिंदू बहुल मतदारसंघ असून येथे किमान 35 ते 40 टक्के मतदार हे ख्रिश्चन आहेत, आणि हीच मते उमेदवारांच्या विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. दिवाडी बेट, सांतइस्तेव्ह, जुने गोवेचा काही भाग, खोर्ली, सापेंद्र, करमळी, गवंडाळी परिसरात ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठी आहे. सुमारे 6500 मतदार ख्रिस्ती असून मुस्लिमांचीही 4 टक्के मते आहेत. परंतु हिंदू उमेदवारांच्या गर्दीत 2017 साली काँग्रेसचे शावियर कुलासो यांनी 3961 मते मिळवली होती. यंदा ही मते काँग्रेसला की अन्य कोणाला पडणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.

जनिता गड राखणारच ः मडकईकर

माजी आमदार (MLA) पांडुरंग मडकईकर म्हणाले, उमेदवारी जाहीर करण्यास (भाजप)पक्षाने उशीर केला. माझ्या पत्नीला उमेदवार दिली, तरीही माझी मतपेढी कायम आहे. त्यामुळे तीही माझ्याप्रमाणेच बहुमताने निवडून येणार हे निश्चित. माझे कार्यकर्ते सूज्ञ आहेत. एका दूरध्वनीवर ते कार्य करतात, ते आपली जबाबदारी व कर्तव्य जाणतात. मी आजारी असूनही अनेक कार्यकर्त्यांशी माझा संपर्क आहे. भेटीगाठी होतात, त्यामुळे कुंभारजुवेचा गड आम्ही निश्चित राखणार आहोत, यात दुमत नाहीच.

उमेदवार

जेनिता मडकईकर भाजप

राजेश फळदेसाई काँग्रेस

समील वळवईर तृणमूल

छगन नाईक आरजी

गोरखनाथ नाईक आप

मारिया वारेला गोंयचो स्वाभिमान

रोहन हरमलकर अपक्ष

एकूण मतदार 26418

महिला मतदार 12715

पुरुष मतदार 13703

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT