Forest Fire in Goa: गोव्यात अलीडकच्या काळात सत्तरीपासून ते काणकोणपर्यंतच्या जंगलात आगींच्या घटना घडल्या होत्या. या वणव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलातील वनसंपदा खाक झाली होती. राज्य सरकारने व्यापक प्रयत्न करून या आगीच्या घटना आटोक्यात आणल्या होत्या.
दरम्यान, आता या आगींच्या घटनांचे संभाव्य दुष्परिणामांविषयी तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे. काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
तज्ज्ञांच्या मतानुसार पश्चिम घाटातील जैवविविधता असलेल्या हॉटस्पॉटमध्ये या आगीच्या घटना घडल्या होत्या. या आगीतून झालेल्या विनाशामुळे स्थानिक जलविज्ञान चक्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सुरवातीच्या काही वर्षात पावसाळ्यात अचानक येणारे पूर (फ्लॅश फ्लड), धातू प्रदूषण आणि इतर परिणामांवर लक्ष ठेवावे लागेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
आगीनंतरच्या परिणामांची तीव्रता विविध घटकांवर अवलंबून असते आणि ते थेट दिसून येत नाहीत. परंतु पर्यावरणाचा ऱ्हासाचे ठोस पुरावे दिसू शकतात. पावसाळ्यात राख, गाळाचे प्रमाण नद्यांमध्ये वाढू शकते.
वणव्यामुळे म्हादई नदीच्या पाणलोट क्षेत्रावर आणि उपनद्यांवरही परिणाम होऊ शकतो. पाणी सुरक्षा त्याचे नियमन, पाण्याची गुणवत्ता यावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गोव्याचा मोठा भाग म्हादई नदीच्या पाणलोट क्षेत्रावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा फटका गोव्यालाही बसत आहे. जंगलातील आगींच्या घटनांमुळे भविष्यात फ्लॅश फ्लड येण्याची शक्यता आहे.
विशेषतः साखळी, डिचोली आणि इतर भागात फ्लॅश फडची शक्यता आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. वाळवंटी नदीत थोडा जरी ओव्हरफ्लो झाला तरी खालच्या भागात पाण्याची पातळी धोकादायकरित्या वाढते.
दोन दशकांपूर्वी ओल्ड गोवा ते पणजी या भागात भारतीय हायड्रोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासात खाण खोदकाम आणि इतर कारणांमुळे म्हादई नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे म्हटले होते.
पश्चिम घाट हा 1,500 किलोमीटर लांबीचा आहे. त्या तुलनेत आग लागलेला भाग खूप कमी असला आणि त्याचा प्रभाव कमी असला तरी स्थानिक भागात नैसर्गिक संसाधनांच्या अतिशोषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. त्यामुळे त्याचे परिणामही भोगायला लागू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.