मोरजी: पाण्याची सोय असेल तेथे पूर्वी जाणकार लोक लोकवस्तीसाठी उभारत असत. आता काळ बदलला आहे. आता लोक अगोदर घरे बांधतात व नंतर पाण्याची सोय बघतात. जंगले ही वन्यप्राण्यांसाठी राखीव ठेवली जायची. त्यामुळे कधीही चुकून देखील वन्यप्राणी लोकवस्तीत येत नसत. परंतु आता लोकवस्ती वनात वाढू लागली आणि वन्यप्राणी लोकवस्तीत शिरू लागल्याचे दिसून येत आहे. (Wildlife in Goa is under threat)
लोकवस्ती जंगलात वृक्षतोड करून वाढू लागली आहे. तसेच ती डोंगरावरही वाढू लागली आहे. मग जंगलातील प्राणी जाणार कुठे, याचा माणसाने विचार केलेला दिसत नाही. वन्यप्राण्यांना आजही वनातील प्राण्यांकडून नव्हे तर माणसाकडूनच धोका जास्त संभवत आहे. पेडणे तालुक्याचा विचार केला तर मागच्या दहा-बारा वर्षांपूर्वी चांदेल, हंसापूर, इब्रामपूर, हळर्ण, तळर्ण, पत्रादेवी, कासारवर्णे, हाळी या भागांत जंगलातील हत्ती लोकवस्तीत घुसून शेतीची, बागायातींची, फळा-फुलांची नासाडी करत असत. आता गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवलेला आहे. शिवाय माकड, डुक्कर आणि आता तर वाघांनीही लोकवस्तीत घुसून थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आम्ही वनखात्याला दोषी ठरवतो. पण बारीक विचार केल्यास या गोष्टीला माणूसच जबाबदार असल्याच्या निष्कर्षाप्रप्त आम्ही येतो.
जंगलतोड करून लोकवस्त्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जंगली प्राण्यांना जंगले असुरक्षित वाटू लागली आहेत. अन्नाच्या शोधात हे प्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत. काजूच्या हंगामात लोक जंगलात काजू गोळा करण्यासाठी जात असतात. त्यावेळी सर्व माकडे मनुष्याच्या भीतीने जंगलातून आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवतात आणि नंतर मनुष्य हा वन्यप्राण्यांना दोष देऊन त्यांना ‘उपद्रवी प्राणी’ म्हणून घोषित करण्याची मागणी करतात. हे कितपत योग्य आहे?
मोप विमानतळ ठरले
रानटी डुकरांसाठी मृत्यूचा जबडा!
पेडणे तालुक्यात सर्वत्र लोकवस्तीत आणि हमरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचे कळप ठाण मांडून बसतात. जंगलातील बिबटे, वाघ मग भक्ष्याच्या शोधात आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवात. सध्या मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोरात सुरू आहे. विमानतळ प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या जागेत पूर्ण संरक्षक भिंत घातल्यामुळे मोपा जंगल परिसरातून येणारे रानडुक्कर मोठ्या प्रमाणात शिकारीला बळी पडत आहेत. एकमेव वाट असलेल्या जागेतून हे रानडुक्कर परिसरात यायचे, त्याच जागेवर शिकारी नेम धरून बसतो. रानडुक्कराला जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने मोपा विमानतळाची संरक्षक भिंत रानटी जनावरांसाठी जीवघेणी ठरली आहे.
विर्नोडा येथे अडकून पडलाय गव्यांचा कळप
म्हस्कोण-विर्नोडा येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेत पाच गव्यांचा एक कळप अडकला असून तो तेथील शेताची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहे. हा कळप मार्च-एप्रिल महिन्यात अन्नाच्या शोधार्थ आला असावा असा अंदाज आहे. जाण्यासाठी वाट नसल्याने तो अडकला आहे. म्हस्कोण-विर्नोडा या ठिकाणी एका बाजूने रेल्वेमार्ग जातो तर दुसऱ्या बाजूने तिळारी प्रकल्पाचे कालवे जातात. या कालव्यातून उतरून जायला गवे घाबरतात. त्यामुळे ते याच ठिकाणी अडकून पडले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनाही या गव्यांच्या कळपामुळे शेतात, बागायतीत जाणे धोक्याचे वाटते. शिकार होण्यापूर्वी वनखात्याने त्यांची सुटका करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करू लागले आहेत.
जिभेचे चोचले पुरवण्यासाठी...!
जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीव, जंतू, प्राणी, मनुष्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण आज सर्वश्रेष्ठ बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मनुष्यामुळेच वन्यप्राण्यांवर मोठे संकट आले आहे. विशेष म्हणजे सरकारलाही एका एका टप्प्याने वन्यप्राण्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करावे लागत आहे. नुकताच डुकराच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यामुळे माणसाला त्याची हत्या करण्याची आणि स्वत:च्या जिभेचे चोचले पुरवण्याची आयतीच संधी मिळाली आहे. काही प्राणी नक्कीच मोठ्या प्रमाणात शेती, बागयतींची नुकसानी करत असतात. एकदा का सरकारने त्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित केले की खवय्यांचे आयतेच फावते. वन खात्याच्या अधिकाऱ्यानांही माहित असते की जंगली प्राण्यांची शिकार कोठे होते व त्यात कोण कोण गुंतलेले आहेत. पण शिकार करणाऱ्यांवर कधी कारवाई केल्याचे स्मरत नाही. रानटी जनावरे लोकवस्तीत येण्याची अनेक कारणे आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे जंगले उद्ध्वस्त करून लोकवस्त्या उभारल्या जात आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.