सत्तरी: गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील ठाणे-पाली भागात म्हादई अभयारण्यालगत अस्वल फिरत असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओला भीतीदायक शीर्षके देऊन जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले, ज्यामुळे लोकांमध्ये अनावश्यक भीती पसरली. मात्र, ‘गोमन्तक ’ या वृत्तसंस्थेने या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आणि "ठाणे सत्तरी ते चोर्ला-जांभळी रस्ता ठरतोय वन्यप्राण्यांना अडथळा" असे शीर्षक दिले. याच मुद्द्याचा सखोल विचार करण्याची गरज आहे.
सत्तरीतील ठाणे-पाली ते जांभळीकडे (चौर्ला घाट) हा मार्ग पूर्वी घनदाट जंगलाने वेढलेला होता आणि रस्ता वगळता आजतागायत आहे. हा मार्ग वाघ, बिबटे, गवा रेडा, अस्वल यांसारख्या सस्तन प्राण्यांसाठी तसेच इतर वन्यप्राण्यांसाठी पारंपरिक संचारमार्ग म्हणून ओळखला जात असे. मात्र, दोन वर्षांपूर्वी येथे तीन मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला. परिणामी, जंगलातील निर्जन वाटांवर वाहनांची वर्दळ वाढून त्याचा थेट परिणाम वन्यप्राण्यांच्या हालचालींवर झाला.
पूर्वी या मार्गावर प्राण्यांना मुक्त संचार करता येत असे. तृणभक्षी आणि सर्वभक्षी प्राणी येथील फणस, आंबा, रुमड, भेडशा यांसारख्या स्थानिक फळांवर ताव मारत या रस्त्यावरून मुक्तपणे संचार करायचे. मात्र, आता या मार्गावर वाहतूक वाढल्यामुळे त्यांचे पारंपरिक मार्ग रोखले गेले आहेत. अशा परिस्थितीत हे मुक्या जीवांनी जायचे तरी कुठे?
आज अस्वल दिसले, उद्या गवा दिसेल, आणि भविष्यात आणखी कोणते वन्यप्राणी वाहनाखाली सापडतील, हे सांगता येणार नाही. त्यामुळे, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
संभाव्य उपाय आणि वन्यजीव संरक्षणासाठी सदर मार्ग गोवा वनखात्याने सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत, या मार्गावर वाहतूक बंद ठेवावी व फक्त आपत्कालीन (Emergency) वाहतुकीसाठीच हा रस्ता खुला ठेवावा. त्यामुळे वन्यप्राण्यांना मोकळेपणाने फिरता येईल.
गोव्याच्या सीमेवर असलेल्या मान गावातील एका शेतकऱ्यावर झालेला अस्वल हल्ला तसेच सुर्ला, सत्तरी येथे शाळेत निघालेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीवर अस्वलाचा हल्ला आदी प्रकरणे पाहून राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळ सदस्य पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी लोकांना सावध करताना म्हटले आहे की, "संध्याकाळी उशिरा आणि पहाटे जंगल परिसरात जाणे टाळावे. वन्यप्राण्यांच्या हालचालीमुळे दुर्घटना होऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे."
म्हादई अभयारण्य आणि त्याला लागून असलेल्या जंगलात वन्यप्राणी राहणारच. मात्र, त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे ते आता मानवी वस्तीकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे, या समस्येचे मूळ कारण आपणच तयार केले आहे, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
नुकतेच गोवा वन्यजीव मंडळाने चरवणे धरणाला हिरवा कंदील दाखवून प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास उपलब्धतेवर बोट ठेवले आहे. या धरणामुळे संबंधित परिसरातील बरेच जंगल बुडीताखाली येऊन भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.
मानवाने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या सुविधांनी मात्र वन्यजीवांच्या अधिवासास धोका निर्माण केलेला आहे. वनखात्याने भविष्यात उद्भवणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाचा विचार करून योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
संकेत सुरेश नाईक,
सदस्य, विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, केरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.