‘जन्मो-जन्मी हाच नवरा पाहिजे’ असे मानणारी भारतीय स्त्री पैशांसाठी विधवा बनण्याचे नाटक करते, हे वाचण्यात जरी वेगळे वाटत असले तरी सत्य आहे. केंद्र सरकारच्या विधवा पेन्शन योजनेचा फायदा घेण्यासाठी देशातील साठ हजार महिलांनी स्वतःला विधवा घोषित करून सरकारी योजनेचा गैर फायदा करून घेतला. महत्वाचे म्हणजे या कामात म्हणे नवऱ्यांची सहमती होती. कोण जाणे आपल्या राज्यातही अशा भाग्यवान स्त्रिया आहेत की नाहीत. उपवास धरून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणारी भारतीय नारी पैशांसाठी स्वतःचा सिंदूर पुसू शकते, याला काय म्हणावे?∙∙∙
सभापतिपदावरून रमेश तवडकर हे बाजूला झाले तर सभापतिपद आपल्याला मिळू शकेल काय याकडे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांचे लक्ष आहे. अलीकडे त्यांचा समावेश केंद्र सरकारने व्हॅटिकनला पाठवलेल्या देशाच्या अधिकृत शिष्टमंडळात केला होता. त्याशिवाय ते माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र असल्याने त्यांची दिल्लीत स्वतंत्र ओळख आहे. म्हापशातील बदलत्या राजकारणामुळे त्यांना खरेतर मंत्रिपदाची गरज आहे. लोबोंच्या राजकारणामुळे मंत्रिमंडळात शिरकाव होणे शक्य नसल्याने निदान सभापतिपद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील,अशी चर्चा आहे. ∙∙∙
गोव्यात गावडा, कुणबी, वेळीप या तीन जमातींना एसटीचा दर्जा मिळाला तरी धनगर समाजाला अजून हा दर्जा मिळालेला नाही. या समाजालाही हा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत धनगर नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहेच. मात्र आता यासाठी कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचाही वापर करून घेतला जात आहे, असे समजते. कर्नाटक राज्यानेही धनगरांना एसटीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. सध्याच्या काँग्रेस सरकारातील एक ज्येष्ठ नेता यासाठी प्रयत्न करत आहे. असे म्हणतात, या नेत्याची ही मागणी पूर्ण झाल्यास तो काँग्रेस सोडून भाजपमध्ये जायलाही तयार आहे. यासाठीच असेल कदाचित गोव्यातील धनगर नेत्यांच्या सध्या कर्नाटक वाऱ्या वाढल्या आहेत. धनगर, एसटी आणि हे नवे कर्नाटक कनेक्शन सध्या गोव्यातही नाही, म्हटले तरी चर्चेचा विषय बनलाच आहे. ∙∙∙
गेले दोन दिवस मुसळधार वृष्टी झाली व सालाबादप्रमाणे पाड्डे बुडले. हे आता नेहमीचेच झाले आहे व पाड्डे बुडल्याशिवाय पावसाला जोर नाही, असे समीकरणच झाल्याचे परिसरातील रहिवासी म्हणू लागलेत. मात्र पाड्डे का बुडते व त्यावर तोडगा काय याचा विचार कोणीही करत नाही. परवा विरोधी पक्षनेते तथा स्थानिक आमदार असलेल्या युरीबाबांनी तुंबलेल्या पाण्यातून जाऊन तेथील पाहणी केली. त्यांच्यासमवेत केपेचे आमदार एल्टनबाबही होते. गेल्यावर्षी असा पूर येऊन केपे-मडगाव रस्ता पाण्याखाली गेल्यावरही अशीच पाहणी केली होती. यंदाही तशीच त्यांनी ती केली, पण अशा पाहण्या याही वार्षिक कार्यक्रम बनणार की, काही तरी तोडगा काढणार, असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. संबंधित खाते कोट्यवधींच्या निविदा काढते पण त्यात पाड्डेबाबत कोणताच उपाय नसतो, हे मात्र खरे. ∙∙∙
येत्या काही महिन्याभरात राज्यात पालिका निवडणुका लागणार आहेत. मात्र, आतापासून म्हापशात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. म्हापसा पालिका मंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत पीपीपी तत्त्वावर म्हापसा पालिकेच्या मालकीच्या जमिनीचा वापर हा बस टर्मिनलच्या पुनर्विकासासाठी देण्याकरिता, वाहतूक संचालनालयाकडून पालिकेकडे प्रस्ताव आला आहे. त्याला म्हापसा पालिका मंडळाने आपल्या सर्वसाधारण बैठकीत तात्पुरती परवानगी दिली. यावरून सत्ताधारी व काही विरोधी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली. विरोधी नगरसेवकांनी वरील मान्यता म्हणजे पालिका निवडणुकीची ही ‘अर्थपूर्ण’ तयारी आहे, असा आरोप केला. तर सत्ताधारी नगरसेवकांच्या मते विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने, ते या गोष्टीचा अकारण बाऊ करत आहेत. यापूर्वी काहींचे कुटुंब पालिकेत होते, तेव्हा त्यांनीही असेच ‘अर्थपूर्ण’ राजकारण केले का?, अशी टीका करताच विरोधक नरमले. पण आगामी पालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार याचे हे संकेत आहेत.∙∙∙
नियोजनाचा अभाव असला की हाती घेतलेले काम फसण्याचा धोका जास्त असतो. आपल्या राज्यातील ‘एससीईआरटी’ या शिक्षण क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षणसंबंधी संस्थेला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असला तरी नियोजनात मात्र एससीईआरटीचा दर्जा सुधारला नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या बदलाची जागृती करण्यासाठी एससीईआरटी शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करीत आहे. मात्र, पणजीला उत्तरेतील सहा तालुक्यांतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत शिक्षकांची संख्या जास्त व जागा अपुरी पडल्यामुळे मोठा गोंधळ झाला. शिक्षकांना उभे राहून प्रशिक्षण घेण्याची वेळ आली. काही महिन्यांपूर्वी क्रीडा शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेला अशीच गर्दी झाली होती.आता आयोजकांना शिक्षकांच्या संख्येचा हिशोब लावता येत नाही की, सरकारी खात्याचा हा हक्काचा निष्काळजीपणा आहे, असा प्रश्न शिक्षक विचारीत आहेत. ∙∙∙
कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. त्या भेटीचे वर्णन खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेटीत राजकीय चर्चा झाली असे केले. त्यामुळे लोबो किंवा त्यांच्या पत्नी शिवोलीच्या आमदार दिलायला यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असे मानले जात आहे. याचा आनंद साळगावचे आमदार केदार नाईक यांना झाला आहे. लोबोंपैकी कोणीही मंत्रिमंडळात समाविष्ट झाले की, साळगावचा विकास झालाच समजा, असे समीकरण त्यांनी मांडले आहे. त्यामुळे लोबोंच्या मंत्रिपदाचा आनंद जास्त करून साळगावमध्येच साजरा केला जाईल, असे बोलले जात आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.