Sonsodo Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Garbage Issue: सोनसडोचे ‘ग्रहण’ आता तरी सुटणार?

डोकेदुखी कायम : उच्‍च न्‍यायालय‍ाने दिलेल्‍या कानपिचक्‍यांनंतर सफाईच्‍या कामाला वेग

दैनिक गोमन्तक

Sonsodo Garbage Issue: मडगावातील सर्वांत जुनी आणि बिकट समस्‍या असलेल्‍या सोनसडो कचरा प्रक्रिया प्रकल्‍पावरील परिस्‍थिती डिसेंबर 2023 पर्यंत आटोक्‍यात आणा असा निर्वाणीचा इशारा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिल्‍यानंतर सुस्‍त पडून राहिलेल्‍या मडगाव नगरपालिकेला खडबडून जाग आली. या प्रकल्‍पाकडे जाणारा रस्‍ता, कचऱ्यावर प्रक्रिया करण्‍यासाठी नवीन शेड बांधणे, कचरा लोकवस्‍तीत पसरू नये यासाठी संरक्षक भिंती उभारणे, सुक्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी नवीन बेलिंग मशीन सुरू करणे आदी उपाय पालिकेने योजिले.

परंतु जुन्‍या शेडमध्‍ये साचून राहिलेल्‍या हजारो टन कचऱ्याची डोकेदुखी अद्याप दूर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मडगावला लागलेले हे सोनसडा कचऱ्याचे ग्रहण यंदा तरी सुटणार का? असा प्रश्‍‍न मडगावचे नागरिक विचारू लागले आहेत.

सोनसडो प्रश्‍‍ना‍कडे मडगाव पालिकेने दुर्लक्ष केल्‍यानंतर मुंबई उच्‍च न्‍यायालयाला कठोर भूमिका घ्‍यावी लागली होती. न्‍यायालयाने एका आदेशान्‍वये पालिकेला नवीन बांधकाम परवाने देण्‍यास बंदी आणली होती. या पार्श्‍वभूमीवर आता सोनसडो प्रकल्‍पाकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याचे काम सुरू झाले असून संपूर्ण प्रकल्‍पाच्‍या सभोवताली संरक्षक भिंत उभारण्‍याकरिता निविदाही जारी केल्‍या आहेत.

यापूर्वी कचऱ्याच्‍या वजनामुळे जी शेड कोसळली होती, ती नव्‍याने बांधण्‍यासाठी काम सुरू झाले आहे. हे काम 40 टक्‍के मार्गी लागले आहे. असे असले तरी जुन्‍या शेडमधील हजारो टन कचरा अजूनही तसाच पडून आहे.सदर कचरा साफ करण्‍याचे काम पालिकेने आता कचरा व्‍यवस्‍थापन महामंडळाकडे सोपविले आहे.

या जुन्‍या कचऱ्याचे रेमेडिएशन कचरा व्‍यवस्‍थापन महामंडळातर्फे करण्‍यात येत होते. या कामावर देखरेख ठेवणारे महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक लेविन्‍सन मार्टिन्‍स यांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, जुना लिगसी कचरा आम्‍ही पूर्णपणे साफ केला आहे. या प्रक्रियेनंतर टाकाऊ कचरा या प्रकल्‍पातून हलविण्‍याचे काम बाकी राहिले आहे.

सध्‍या पाऊस असल्‍यामुळे ते काम करता येत नाहीय. मात्र पाऊस संपल्‍यानंतर लगेच तोही कचरा हलविण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर ओल्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्‍यासाठी १५ टन क्षमतेचा बायोडिग्रेडेबल प्रकल्‍प प्रायोगिक तत्त्‍वावर सुरू करण्‍यात येणार आहे. सुक्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी तेवढ्याच क्षमतेचा इन्‍सि‍नरेटर बसविण्‍यात येणार आहे.

सोनसड्यावर पूर्वीचा साचून राहिलेला कचरा हा जवळपास साफ झाला आहे. सुक्‍या कचऱ्याची त्‍वरित विल्‍हेवाट लावण्‍यासाठी नवीन बेलिंग मशीन बसविण्‍यात आले आहे. अतिरिक्‍त कामगार लावून हे काम त्‍वरेने पूर्ण केले जात आहे. ही गती पाहिल्‍यास येत्‍या तीन-चार महिन्‍यात सोनसड्यावरील समस्‍येवर पूर्णत: तोडगा काढणे आम्‍हाला शक्‍य होईल असे वाटते.

- दामोदर शिरोडकर, नगराध्‍यक्ष

जुना लिगसी कचरा नष्‍ट करण्‍याचे आमच्‍याकडे सोपविलेले काम आम्‍ही पूर्ण केले आहे. आता शेडमध्‍ये साचून राहिलेला कचराही हटविण्‍याचे काम आमच्‍यावर सोपविण्‍यात आले आहे. महामंडळातर्फे मडगाव पालिकेला आम्‍ही सर्व ती मदत करत आहोत. परंतु पालिकेकडे दहा अभियंते असतानाही ज्‍या गतीने काम होणे अपेक्षित होते, तसे ते झालेले नाही.

- लेविन्‍सन मार्टिन्‍स, व्‍यवस्‍थापकीय संचालक, कचरा व्‍यवस्‍थापन महामंडळ

सोनसड्याबाबत मडगाव पालिकेने नेहमीच अनास्‍था दाखवली आहे. मालिदा खाण्‍यातच त्‍यांना जास्‍त रस होता असे वाटतेय. साचून राहिलेला कचरा काढण्‍यासाठी जी दोन कोटींची निविदा पालिकेने जारी केली होती ती अवास्‍तव होती. त्‍यामुळेच ती उच्‍च न्‍यायालयाच्‍या दबावाखाली सरकारला रद्द करावी लागली. यातून पालिकेचा हा सावळागोंधळ स्‍पष्‍ट होतो.

- विजय सरदेसाई, फातोर्ड्याचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT