म्हापसा: राष्ट्रीय संपत्ती विकण्यात कोणता राष्ट्रवाद आहे, स्वत:चे घरदार सांभाळू शकत नाही अशी व्यक्ती देश कशी सांभाळणार, असे सवाल करून काँग्रेसचे युवा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकंदर कार्यपद्धतीबाबत जोरदार टीका केली. (Latest News on Kanhaiya Kumar Goa Visit)
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय इत्यादी समाजघटकांसमवेत बहुजन संवाद या उपक्रमाच्या अंतर्गत स्नेहसंवाद करण्यासाठी म्हापसा येथील टॅक्सीस्थानकावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे (Congress) केंद्रीय नेते तथा माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), उपाध्यक्ष गुरुदास नाटेकर, अन्य नेते संगीता परब, बाबी बागकर, शंभू बांदेकर, चंद्रकांत चोडणकर, सुधीर कांदोळकर, तारक आरोलकर, रामकृष्ण जल्मी, अमरनाथ पणजीकर, विजय भिके व इतर उपस्थिती होते.
कन्हैया कुमार पुढे म्हणाले, पंतप्रधान आपल्या देशाची सारी संपत्ती स्वत:च्या मित्रांना विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही लढाई देश विरुद्ध पंतप्रधानांचे मित्र अशा स्वरूपाची आहे. विकणारे व त्यापासून वाचवणारे यांचा हा लढा आहे. त्यामुळे कोणाच्या बाजूने उभे राहावे, हे जनतेनेच ठरवायचे आहे. आपला हक्क आणि अधिकार यांचे हितरक्षण कोण करीत आहे, याचा विचार सर्वस्वी जनतेनेच करायचा आहे.
गोव्यातील प्रत्येक पंचायत क्षेत्रातील जनतेशी संवाद साधण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी गोव्याच्या (Goa) काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच चाळीसही मततदारसंघांत व दोन्ही जिल्ह्यांतही काँग्रेसबाबत जनजागृती करण्याचा माझा विचार आहे. या देशात काँग्रेस पक्ष सत्तेवर येणे का गरजेचे आहे, हे मी त्यांना पटवून देणार आहे, असेही कन्हैया कुमार म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.