केपे: ज्योतिष शास्त्रानुसार १५ डिसेंबर हा विवाहासाठी शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर १६ जानेवारी रोजी विवाहासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे येत्या १५ डिसेंबरला अनेकजण विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र वीज खात्यामुळे वधु-वरांसाठी हा दिवस थोडा अडचणीचा ठरणार आहे.
वीज खात्याने १५ डिसेंबर रोजी दक्षिण गोव्यातील काणकोण, सांगे, केपे तसेच सासष्टीतील आठ व धारबांदोडा तालुक्यातील तीन पंचायती व फोंडा पालिका क्षेत्रात तब्बल दहा तास वीज खंडित करणार असल्याची नोटीस जारी केली आहे. याचा परिणाम १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर होणार आहे. त्यामुळे हे भारनियमन पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी वधु-वर व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दक्षिण गोव्यातील सहा तालुक्यात सकाळी ७ वाजल्यापासून सायं. ५ वाजेपर्यंत तब्बल दहा तास वीज पुरवठा खंडित असणार आहे. त्यात कुंकळ्ये व वेर्णा औद्योगिक वसाहत तसेच सासष्टी तालुक्यातील कुंकळी, बाळळी, वेळळी, फ़ातर्पा, नेसाय, करमणे, बाणवली, वार्का, कोलवा आणि नावेली भागांचा समावेश आहे. धारबांधोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ, शिगाव कुळे आणि मोले या पंचायत क्षेत्रांचा सहभाग आहे. फोंड्यातील पंचवाडी पंचायत क्षेत्रावर वीज शटडाऊनचा परिणाम होणार आहे. तसेच काणकोण, सांगे व केपे तालुक्यात दहा तास पूर्णपणे वीज पुरवठा खंडित राहणार आहे. दक्षिण गोव्याच्या सर्कल एकच्या अधीक्षक अभियंत्यांनी ही नोटीस जारी केली आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार २०२४ मध्ये लग्नासाठी ७१ शुभ मुहूर्त होते. त्यातील डिसेंबरमध्ये एकूण दहा मुहूर्तामध्ये १५ डिसेंबर हा विवाहासाठी शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर बरोबर तीस दिवसांनी म्हणजे नवीन वर्षाच्या जानेवारीत १६ तारखेनंतरच विवाहासाठी शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे १५ डिसेंबरचा मुहूर्त वधू-वरांनी निवडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.