मोरजी : चांदेल येथील 15 एमएलडी पाणी प्रकल्प पूर्ण तालुक्यातील जनतेची तहान भागवू शकत नाही. त्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा प्रचंड दबाव या खात्याच्या अधिकाऱ्यांवर होता. आता हा दबाव नाही. त्यामुळे आता तरी पुरेसे पाणी द्या, अशी मागणी मोरजीवासीय करत आहेत.
तालुक्यातील मांद्रे (Mandrem) व पेडणे मतदारसंघातील 20 गावे आणि एका शहरातील जनतेला पुरवण्याचे काम पाणीपुरवठा विभागाचे अभियंते करत. मात्र, अगोदर पेडणे मतदारसंघाला पाणी पुरवा, असा आदेश दरवेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर द्यायचे. त्यामुळे अभियंते आधी पेडणेत नंतर मांद्रे मतदारसंघात पाणी पुरवायचे. आता तसा दबाव नसल्याने निदान दोन्ही मतदारसंघांना समान पाणी पुरवा, अशी मागणी येथील लोक करत आहेत.
- विस्तारासाठी भूमिपूजन, पुढे काय?
चांदेल पाणी (water) प्रकल्प बेभरंवशाचा बनला असून सध्या पेडणे तालुक्यात पाण्याची टंचाई भासत आहे. मागच्या सरकारने चांदेल पाणी प्रकल्पाच्या विस्तारासाठी भूमिपूजन केले. मात्र ज्यांची नावे येथील नामफलकावर आहेत, त्यापैकी एकाही लोकप्रतिनिधीने गेल्या पाच वर्षांपासून याकडे लक्ष दिलेले नाही.
- ...अन्यथा पाणी पेटणार
संपूर्ण पेडणेकरांची तृष्णा भागवण्यात चांदेल प्रकल्प अपुरा पडत आहे. त्यातच राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने प्रकल्पातून येणारे पाणी नक्की कुठे जाते याचा सरकारने शोध घ्यावा आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे. पाण्याची गंभीर समस्या मांद्रे मतदारसंघात उद्भवली असून या विषयावरून पाणीही पेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- आश्वासन वचननाम्यापुरतेच
चांदेल प्रकल्पाचे पाणी मांद्रे मतदारसंघात पोचवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तुये येथे ३० एमएलडी पाणी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना निवडणुकीत अपयश आल्याने हा प्रकल्प रखडला. आता या प्रकल्पाचा उल्लेख नुकत्याच झालेल्या निवडणुकीवेळी उमेदवारांनी आपल्या वचननाम्यात आवर्जून केला होता.
- क्षमता अपुरी, नळ कनेक्शन भरमसाट
पेडणे (Pernem) तालुक्यात पूर्वी लोकवस्तीत विहिरी होत्या. त्यांचे पाणी दैनंदिन व्यवहारासाठी वापरले जायचे. आता काळ बदलला असून लोक पूर्णत: नळाच्या पाण्यावरच अवलंबून राहात आहेत. त्यातच प्रकल्पाची क्षमता अपुरी पडत असून नळ कनेक्शन भरमसाट झाली आहेत.‘‘
धारगळ किंवा पेडणे मतदारसंघातून जो आमदार (MLA) निवडून येतो, तो पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून पाणी अगोदर आपल्या मतदारसंघातील जनतेला द्या, अशी मागणी करतो. मात्र, तो आमदार आता या मतदारसंघात नसल्याने निदान आता तरी मांद्रे मतदारसंघात अधिकाऱ्यांनी नियमित पाणीपुरवठा करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.