मये: डिचोली येथील वाळवंटी नदीच्या जल संवर्धनासाठी डिचोली नगरपालिकेने बंधारा घालून केलेल्या प्रयत्नांचे डिचोली येथील स्थानिक रहिवाशांनी कौतुक केले आहे. डिचोलीचे नगरसेवक सतीश गावकर यांनी घेतलेल्या एका अभिनव उपक्रमात पालिकेने जलस्त्रोत विभागाचे सहाय्यक अभियंते के.पी. नाईक यांची मदत घेऊन डिचोली गणेश विसर्जनस्थळ परिसरात नदीच्या मध्यभागी बंधारा उभारला आहे. उन्हाळ्यात दरवर्षी जवळजवळ कोरड्या पडणाऱ्या नदी पात्रात आता पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे.
नगरसेवक सतीश गावकर ‘गोमन्तक’शी बोलताना म्हणाले की, हा प्रकल्प 1 कोटी 85 लाख रुपयांचा असून सहाय्यक अभियंते के.पी. नाईक यांची मदत घेऊन उभारलेला हा प्रकल्प अनेक प्रकारे उपयुक्त आहे. मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे डिचोली नदीपट्ट्याला सुंदर स्वरूप प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.
वार्षिक कालोत्सवादरम्यान दीपोत्सव या उत्सवाला अधिक चालना मिळेल ज्यात गंगेचा अवतार मानल्या जाणाऱ्या वाळवंटी नदीला समर्पित केलेल्या लाडूंचा प्रसाद गोळा करण्यासाठी अनेक भाविक सहभागी होत असतात. भागातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकतात, असेही गावकर म्हणाले.
या वेळी बोलताना नगराध्यक्ष कुंदन फळारी म्हणाले, ही अभिनव कल्पना सतीश गावकर यांनी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कमी पाण्यामुळे लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शोधून काढली आहे.
गावकरवाडा येथील दत्ताराम गावकर म्हणाले, सतीश गावकर व पर्यायाने डिचोली पालिकेची ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. कारण गुरांनाही नदीचे पाणी मुबलक प्रमाणात प्यायला मिळते आणि स्थानिकांच्या इतर अनेक अडचणी दूर होतात. या अभिनव संकल्पनेच्या अंमलबजावणीमुळे युवकही या बंधाऱ्याकडे आंघोळीसाठी आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.