Wanted Punjab Accused Escapes From Custody At Dabolim Airport: शस्त्रबंदी कायद्यांतर्गत पंजाब पोलिसांना हवा असलेला काश्मीरसिंग नामक संशयित शनिवारी (२३) पहाटे दाबोळी विमानतळावरून शारजाकडे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडून दाबोळी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिला.
मात्र, थोड्याच वेळात त्याने शौचालयात जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. याप्रकरणी दोघा पोलिसांनी निलंबित केले आहे.
पंजाब येथील काश्मीर सिंग नामक ३४ वर्षीय तरुण ''एअर अरेबिया''च्या विमानाने शारजाकडे जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर आला असता, विमानतळावर ''चेक इन''मध्ये त्याचा पासपोर्ट इत्यादी गाेष्टींची तपासणी सुरू असताना पंजाब पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ''लूक आऊट नोटीस'' जारी केल्याचे उघड झाले.
पंजाबमध्ये चोरी आणि शस्त्रबंधी कायद्यांतर्गत काश्मीरसिंग तेथील पोलिसांना हवा होता. दाबोळी विमानतळावरील इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे कळताच त्यांनी त्वरित त्याला ताब्यात घेतला.
त्याला केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी त्याला दाबोळी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. दाबोळी विमानतळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील सोपस्कार करत असतानाच काश्मीरसिंगने उलट्या होत असल्याचे सांगून शौचालयात जाण्याची विनंती केली.
तो पहिल्यांदा शौचालयात जाऊन आल्यानंतर काही वेळाने त्याने पुन्हा शौचालयात जाण्याची विनंती केली. तिसऱ्यांदा शौचालयात जाण्याची विनंती करून गेल्यानंतर त्याने शौचालयामागील सुमारे १० फूट उंचीच्या भिंतीवरून बाहेर उडी मारून तेथून पोबारा केला.
काश्मीर सिंगने पलायन केल्याचे समजताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. काश्मीरसिंग दाबोळी महामार्गावरून जवळच असलेल्या रेल्वे रुळावरून गायब झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.