डिचोलीत अवाढव्य वृक्ष कोसळल्याने हाहा:कार माजला असतानाच, शहरातील शांतादुर्गा शिशुवाटिकेत बाजूच्या टेकून असलेल्या घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून आज पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आज (सोमवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराच्या भिंतीचा ढिगारा शिशुवाटिकेच्या व्हरांड्यात कोसळला.
शिशुवाटिकेत जी भिंत कोसळली, ती धोंड यांच्या जुन्या जीर्ण घराची आहे. हे घर शिशुवाटिका इमारतीला टेकूनच आहे. आज जी भिंत कोसळली, ती अत्यंत कमकुवत झाली होती. दोन वर्षांपूर्वी या भिंतीला तडे गेले होते. त्यावेळी डिचोलीच्या तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांकडून घराच्या भिंतीची पाहणी केली होती.
मात्र त्यावेळी घरमालकाने कानावर हात ठेवले होते. अखेर शिशुवाटिकेतील मुलांच्या सुरक्षेचा विचार करून व्यवस्थापन मंडळाने जुलै २०२२ मध्ये स्वखर्चाने धोकादायक भिंतीचे प्लास्टर काम केले होते. मात्र जोरदार पावसामुळे अखेर दोन वर्षांनी ही धोकादायक भिंत कोसळली.
घराची भिंत शिशुवाटिकेच्या ''पॅसेज''मध्ये कोसळल्याची व्यवस्थापन मंडळाला माहिती मिळताच, डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची खबर देण्यात आली. मामलेदार आणि अन्य अधिकाऱ्यांसह डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी कोसळलेल्या भिंतीची पाहणी केली. यावेळी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, शिशुवाटिकेचे व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ पाटणेकर, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आज सकाळी ज्या वेळेत भिंत कोसळली. त्यावेळेत शिशुवाटिकेच्या मुलांची वर्दळ सुरू असते. मात्र ''रेड अलर्ट''मुळे शाळांना आज सुटी देण्यात आली होती. सुटी असल्यामुळे आज शिशुवाटिकेत मुलांचा किलबिलाट नव्हता. शाळा सुरू असत्या, तर मोठी दुर्घटना घडली असती. घटनेची माहिती मिळताच काही पालकांनी शिशुवाटिकेत धाव घेतली. ही ''शांतादुर्गा'' देवीचीच कृपा. तिच्याच कृपेमुळे चिमुकल्या मुलांवरील मोठे संकट टळले. अशी प्रतिक्रिया व्यवस्थापन मंडळ, शिक्षक आणि पालकांसह लोकांनी व्यक्त केली.
धोका ओळखून शिशुवाटिकेची इमारत तूर्त पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शांतादुर्गा शिशुवाटिकेत एकूण १४५ मुले आहेत. याशिवाय या इमारतीत प्राथमिक विभागाचे काही वर्ग चालतात. प्राथमिक विभागाचे २४० विद्यार्थी या इमारतीत शिकतात. पुढील व्यवस्था होईपर्यंत आठवडाभर शिशुवाटिकेचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विजय सरदेसाई आणि डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.