सांगे: हल्ली सरकारी नोकरीसाठी मुलाखतींसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा पाहिल्यावर गोव्यातील बेरोजगारीची भीषणता लक्षात येते. परंतु या समस्येची तीव्रता मळकर्णे (सांगे) येथील विठोबा उर्फ विजय प्रशांत सामंत यांच्या उदाहरणावरून प्रकर्षाने दिसून येते. आतापर्यंत ११०४ विविध नोकऱ्यांसाठी अर्ज करूनही नोकरी मिळाली नाही, म्हणून अखेर त्यांनी स्कूटर मेकॅनिकच्या दुकानात हेल्पर म्हणून काम स्वीकारले आहे.
विठोबा कला शाखेचा पदवीधर असून, त्यांनी संगणकाचा डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. त्यांनी विविध सरकारी व अॅप्रेंटिसशिप नोकऱ्यांसाठी अर्ज केले, मात्र नशिबाने साथ दिली नाही. सततच्या अपयशानंतर व परिस्थितीशी झगडताना, घरात बेरोजगार बसण्यापेक्षा, त्यांनी वर्तमानपत्रातील स्कूटर मेकॅनिकच्या हेल्परची जाहिरात पाहून ते काम स्वीकारले.
विठोबा यांचे बालपणही संघर्षमय होते. अवघे चार महिन्यांचे असताना आईचे छत्र हरपले. वडील आणि आजीने त्यांचे पालनपोषण केले. सध्या वडील घरी असतात तर घरखर्चासाठी काकांचा आधार आहे.
एकीकडे कला शाखेची पदवी व संगणक डिप्लोमा पूर्ण केला असतानाही स्कूटर मेकॅनिक हेल्पर म्हणून काम करण्यास कोणताही कमीपणा वाटत नाही का, असे विचारल्यावर विजय म्हणतो, नोकरी मिळत नाही, मग घरी बसून डोक्याला आणि वृद्ध बाबा व आजीला त्रास देण्यापेक्षा, मिळेल ते काम करणे योग्य. पदवीधर म्हणून मोठ्या नोकरीची अपेक्षा न ठेवता, जी मिळेल त्या नोकरीवर समाधान मानणे गरजेचे, असे तो म्हणतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.