तुकाराम सावंत
प्रश्न: एक प्रसिद्ध नेत्रचिकित्सक अशी तुमची ओळख आणि तुम्ही प्रसिद्धही आहात. तरी असताना अचानक राजकारणात येण्याचे कारण?
उत्तर: मेणकुरेसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने सुरूवातीपासूनच मला गरीबी काय त्याची जाणीव आहे. समाजासमोरील प्रश्न आणि गरीब जनतेच्या दुःखाची कल्पना आहे. नेत्रचिकित्सक हा पेशा सांभाळताना आपण रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहे. अडलेल्या-नडलेल्यांना मदत करण्याचे संस्कार आपल्यावर लहानपणीच झाले आहेत. आतापर्यंत आपण शेकडो गरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करावे, म्हणून आपण राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे आपला स्वार्थ नाही. केवळ समाजकारण करण्याच्याच निव्वळ हेतूने मी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न: भाजपसह (BJP) अन्य राजकीय पक्षांनी तुम्हाला उमेदवारीची ‘ऑफर’ दिली होती असे ऐकिवात आहे. तरीसुद्धा तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरला आहात. त्यामागचे कारण काय?
उत्तर: स्वार्थी राजकारण करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. तर जनतेची सेवा करण्याचा मानस बाळगूनच मी राजकारणात आलो आहे. राजकीय पक्षांपेक्षा मला जनतेचा आदर आहे. माझे मतदार हाच माझा पक्ष आहे. जनतेची सेवा करण्याचाच प्रामाणिक हेतू असल्याने मी राजकीय पक्षांचा विचार केला नाही. (Vision to make Bicholim an ideal constituency Dr. Chandrakant Shetye)
प्रश्न: डिचोलीसाठी तुमचे ‘व्हिजन’ किंवा तुम्ही कोणता संकल्प केला आहात?
उत्तर: मतदारसंघात पायाभूत साधनसुविधा उपलब्ध करताना रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे. लाटंबार्से जीआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणि सूक्ष्म-लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे. सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, करिअर कौन्सलिंग आणि नोकरी संधी निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन, पॅरामेडिकल कॉलेजची स्थापना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राची स्थापना, व्यावसायिक शिक्षणासाठी सहाय्य, कृषी विकास आणि जोडधंद्याना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना, डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविण्याबरोबरच आरोग्य सेवा जनतेच्या दारापर्यंत पोचवणे, मनोरंजन उद्यानाची निर्मिती करून पर्यटनाला चालना, कलाभवन, गावोगावी, ‘देवमांड’ची निर्मिती, क्रीडानगरीसह गावोगावी क्रीडा मैदाने आणि व्यायामशाळांची उभारणी आदी विविध विकासकामे करून स्मार्ट गाव आणि शहर करण्याचे माझे स्वप्न आहे. डिचोली एक आदर्श मतदारसंघ करण्याचासंकल्प केला आहे.
प्रश्न: मतदारसंघात तुमच्या प्रचाराचा झंझावात आहे. सध्या मतदारांच्या तोंडी तुमचेच नाव आहे. आतापर्यंतच्या प्रचारात तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला आहे?
उत्तर: मतदारसंघातील घरोघरी प्रचार केला असता, मतदारांकडून मला अनपेक्षित असा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. प्रत्येकठिकाणी मतदारांनी माझे स्वागत केले आहे. मतदार हे माझे कुटुंब आहे. मतदारांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या आणि अडचणी समजल्या आहेत. माझ्या प्रचारासाठी प्रत्येकठिकाणी महिलांसह युवावर्ग आदी कार्यकर्ते स्वतःहून पुढे येत आहे. मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, मतदारांचे आशीर्वादच मला विधानसभेत पाठवतील याचा मला ठाम विश्वास आहे.
प्रश्न: भाजपची सत्ता असतानाही गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत तुम्ही पुरस्कृत केलेला उमेदवार निवडून आला. त्यामागचे कारण काय?
उत्तर: ते यश म्हणजे चमत्कार मुळीच नाही, तर तो माझ्या मतदारांचा विजय आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच ते शक्य झाले. मतदारांचे प्रेम आणि आशीर्वाद यावेळीही मिळणार याचा पूर्ण विश्वास आहे.
प्रश्न: आरपीआय (कांबळे), आम आदमी पक्ष आणि मायनिंग पीपल्स फ्रंटने तुम्हाला पाठिंबा दिलाय. त्याचा तुम्हाला फायदा होणार?
उत्तर: हो नक्कीच. स्वतः हून पुढे येऊन पाठिंबा देणे ही चांगली गोष्ट आहे. या सहकार्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती आली आहे.
आपण समाजकारणासाठीच राजकारणात उतरलो आहे. निवडून आल्यास मतदारांवर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. मतदारसंघाचा चौफेर विकास आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य देऊन डिचोली एक ‘आदर्श’ मतदारसंघ बनविण्याचे माझे ‘व्हिजन’ आहे. डिचोली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिलेली ही विशेष मुलाखत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.