Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, विनोद नागेशकर पुन्हा ‘मगो’मध्ये...?

Khari Kujbuj Political Satire: बदली होऊनही अनेक पोलिस कॉन्स्टेबल्स राजकीय वजन वापरून शहरी किंवा किनारपट्टी भागातील पोलिस स्थानकांत वर्णी लावून घेतात.

Sameer Panditrao

विनोद नागेशकर पुन्हा ‘मगो’मध्ये...?

बांदोड्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य विनोद नागेशकर हे जवळपास एका दशकानंतर पत्रकारांसमोर आले आहेत. जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करून नंतर राजकारण संन्यास घेतलेले विनोद नागेशकर हे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे एकेकाळचे खंदे समर्थक. पण नंतर वादामुळे विनोद यांनी सुदिनरावांची वाट सोडली. आता गोविंद गावडे यांनी उपस्थित केलेल्या वादात विनोद नागेशकर यांचे नाव गोवले गेल्याने त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी पत्रकारांचा आधार घेतला. खरे म्हणजे विनोद नागेशकर हे पत्रकारांचे फार जवळचे मित्र. बांदोडा पंचायतीच्या ग्रामसभेत एखाद्या प्रश्‍नावर आवाज उठवायचा झाल्यास त्यावेळी विनोद नागेशकर, गोविंद गावडे हे अग्रेसर असायचे, आणि त्याकाळी मोठे वार्तांकनही पत्रकारांनी केले होते, नंतरच्या काळात गोविंदराव आमदार, मंत्री झाले, मात्र विनोदरावांनी जिल्हा पंचायत सदस्यापुरते मर्यादित राहण्याचा निर्णय घेतला, किंबहुना राजकारण संन्यासच घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा ते पत्रकारांसमोर आले , त्यामुळे पाहुया विनोद नागेशकर परत ‘मगो’ची वाट धरतात का, अशी विचारणा होतेय...! ∙∙∙

‘नामधारी’ पोलिस अधिकारी!

पोलिस खात्यात बदल्यांचा घोळ काही नवा नाही. बदल्यांचे आदेश हे पोलिस व्यवस्थापन मंडळाच्या शिफारशीनुसार काढण्यात आल्याचे आदेशात नमूद केले तरी राजकारण्यांच्या निर्देशानुसार ते निघतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक हे फक्त सह्यांपुरते नामधारी असतात. बदली होऊनही अनेक पोलिस कॉन्स्टेबल्स राजकीय वजन वापरून शहरी किंवा किनारपट्टी भागातील पोलिस स्थानकांत वर्णी लावून घेतात. त्यामुळे पोलिस बदल्यांचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांच्या कक्षेत असले तरी राजकारणी आपल्या मर्जीतील पोलिसांची बदली करू देत नाहीत. पोलिस अधिकारीही बदली करण्याचे धाडस करत नाही. अनेकदा काही पोलिस अधिकारीच आपल्याला हवे ते पोलिस कर्मचारी आपल्या सेवेत मागून घेतात. त्यामुळे या बदल्या फक्त ज्यांचा ‘गॉडफादर’ नाही किंवा कोणा राजकारण्याचा आशीर्वाद नाही, त्यांच्यापुरत्याच असतात, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे. बदलीला ठेंगा दाखवलेले काही कर्मचारी ‘सेटींग’ होईपर्यंत आजारी रजेवर जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारीही काही करू शकत नाही. ∙∙∙

‘त्या’ महिलेचे पितळ उघडे

नव्या शैक्षणिक वर्ष येत्या सोमवारपासून सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला काही निवडक पालकांचाच विरोध असून त्यामध्ये एका महिला राजकीय नेत्याचा उल्लेख आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीवेळी नाव न घेता झाला. त्या महिलेची माहितीही खंडपीठासमोर छायाचित्रासह सादर करण्यात आली. काही पालक स्वार्थ साधण्यासाठी या शैक्षणिक वर्षाला विरोध करत आहेत. त्यामुळे काहींना आपले सुट्टीच्या काळातील शिबिरे व वर्ग घेणे शक्य होणार नाही, हे त्यामागचे कारण आहे, अशी माहिती सरकारने दिली. मात्र न्यायालयाने या प्रकरणाशी त्या माहितीचा काही संबंध नाही, असे म्हणत ती छायाचित्रांसह माहिती परत केली. या शैक्षणिक वर्षाला विरोध करणारे कोण आहेत व त्यांच्या त्यामागील काय स्वार्थ हे काहींना माहीत आहे. शाळा सुरू राहिल्या तर त्याचा फटका मुलांसाठी दरवर्षी क्रीडा, नृत्य शिबिरे व शिकवण्या वर्ग घेणाऱ्यांना बसणार आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू होती, मात्र उच्च न्यायालयासमोर ती कमी पडली. मात्र या महिलेचा या निर्णयाला विरोध करण्यासाठी असलेला पुढाकार चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙

तुम्हाला आता जात आठवली का?

सरकारने राज्यात जनगणना सुरू करावी, अन्यथा आम्हीच गणती सुरू करू, अशी धमकीवजा सूचना माजी आमदार किरण कांदोळकर यांनी केली आहे. यासंबंधीची सोशल मीडियात पोस्ट व्हायरल होताच त्यावर काहींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तुम्हीच सत्तेत असताना सगळे गोंयकार एकच, असं म्हणायचात, निवडणुका जवळ आल्या म्हणूनच आता किरणबाब, दयानंदबाब तुम्हाला जात आठवली का, अशी विचारणाही काही नेटकऱ्यांनी केलीय. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची कल्पकता

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकीसाठीच्या निधीचा वापर सरकारच्या सुविधांत वाढ करण्यासाठीही करणे सुरू केले आहे. ‘गोवा सीएसआर ऑथोरिटी’ची स्थापना केल्यापासून कॉर्पोरेट क्षेत्रातील निधीचा वापर सरकार करू लागले आहे. पोलिसांना अद्ययावत लॅपटॉपची गरज होती. तीही ‘सीएरआर’मधून भागवण्यात आली आहे. ‘सीएसआर’ उपक्रमाअंतर्गत पुष्पम ज्वेलर्स आणि मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्या सहकार्याने पोलिस अधिकाऱ्यांना ३१ लॅपटॉप वितरित केले. ∙∙∙

दामूंची समयसूचकता

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दिनक्रम फार व्यग्र असतो. बैठका, मेळावे, गाठीभेटी सुरूच आहेत. असे असले तरी ते घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतात. शुक्रवारी अभिनेते मनोजकुमार यांचे निधन झाले. दामू यांच्यातील कलाकार जागा झाला आणि मनोजकुमार यांना त्यांनी सविस्तर अशी श्रद्धांजली वाहिली. वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारचे अभिनंदनही केले. मेळाव्‍यांदरम्यान साखळी ते केपे असा प्रवास करताना नजीकच्या देवस्थानांना भेट देण्यासही ते शुक्रवारी विसरले नव्हते. ∙∙∙

उसगावचे कलिंगड!

राज्यात यापूर्वी पर्रातील कलिंगड, काणकोणची मिरची, माशेलची तवशे, ताळगावची वांगी प्रसिद्ध होती. शेतातील पिकांच्या किंवा फळांच्या उत्पादनावरून त्या गावांची ओळख निर्माण झाली होती. आता कोणतीही फळे, भाजीपाला कोठेही उत्पादित होतो. त्यामुळे तशी काही खास ओळख राहिली नाही. परंतु एका कार्यक्रमात एका नेत्याने सरकारी अधिकाऱ्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या कलिंगडाचा जाहीर उल्लेख केला. कारण त्या परिसरातील एक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल म्हणे त्या अधिकाऱ्याला कलिंगडं भेट म्हणून दिली गेली. त्यामुळे नेटकऱ्यांनाही त्यावर व्यक्त होण्याची संधी आयतीच मिळाली. उसगावातील ‘कलिंगड'' प्रसिद्ध होणार, अशीही काहींनी टिप्पणी केली. उसगाव यापुढे ‘कलिंगड'' उत्पादनासाठी प्रसिद्ध झालेच तर त्याचे श्रेय या अधिकाऱ्याला नक्कीच द्यावेच लागेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT