Vijay Hazare Trophy 2023: विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या (लिस्ट ए) क्रिकेट स्पर्धेतील अगोदरच्या लढतीत दुबळ्या नागालँडविरुद्ध ३८३ धावांचा पर्वत उभारणाऱ्या गोव्याचे उंच उडणारे विमान रविवारी जमिनीवर आले. बंगालने त्यांचा डाव १०६ धावांत गुंडाळून सामना ८ विकेट राखून सहजपणे जिंकला.
गोव्याचा हा स्पर्धेच्या ई गटातील पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला. त्यांचा शेवटचा सामना बडोद्याविरुद्ध होईल. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमी मैदानावर बंगालने रविवारी सकाळी नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.
गोव्याचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ६ बाद ४५ वरुन कर्णधार दर्शन मिसाळ व दीपराज गावकर यांनी सातव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केल्यामुळे, तसेच दीपराज व लक्षय गर्ग यांनी दहाव्या विकेटसाठी २४ धावांची भागीदारी केल्यामुळे
गोव्याला शतकी धावसंख्या गाठता आली. गोव्याच्या डावात दीपराज गावकरने सर्वाधिक नाबाद ३४ धावा केल्या. त्याने ४६ चेंडूंतील खेळीत पाच चौकार मारले.
उत्तरादाखल शाकिर हबिब गांधी (४८) व अभिषेक पोरेल (२०) यांनी ५७ धावांची सलामी दिल्यानंतर बंगालला रोखणे गोव्याच्या गोलंदाजांना अजिबात शक्य झाले नाही.
संक्षिप्त धावफलक
गोवा ः २८.४ षटकांत सर्वबाद १०६ (ईशान गडेकर ११, स्नेहल कवठणकर ०, सुयश प्रभुदेसाई १५, विकास सिंग ०, राहुल त्रिपाठी १, दर्शन मिसाळ १०, के. व्ही. सिद्धार्थ १३, दीपराज गावकर नाबाद ३४, अर्जुन तेंडुलकर ०, मोहित रेडकर ०, लक्षय गर्ग ८, आकाश दीप ६-३, महंमद कैफ ३९-३, शाहबाझ अहमद ३०-२, करण लाल ३-२)
पराभूत वि. बंगाल ः २२.३ षटकांत २ बाद १११ (शाकिर हबिब गांधी ४८, अभिषेक पोरेल २०, सुदीपकुमार घरामी नाबाद १५, शाहबाझ अहमद नाबाद २१, अर्जुन तेंडुलकर ७.३-१-४६-१, मोहित रेडकर ६-१-२७-०, लक्षय गर्ग २-०-७-०, दर्शन मिसाळ ५-०-१८-१, दीपराज गावकर १-०-४-०, विकास सिंग १-०-५-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.