Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विजय राजीनामा देऊन चोख प्रत्युत्तर देणार?

Khari Kujbuj Political Satire: रामा काणकोणकर मारहाण प्रकरणात कोणाचा हात हा प्रश्न सध्या राज्यभरात चर्चिला जात आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थित केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

विजय राजीनामा देऊन चोख प्रत्युत्तर देणार?

गोव्‍याची जीवनदायिनी असलेल्‍या म्‍हादई नदीचा विषय राज्‍य विधानसभेच्‍या प्रत्‍येक अधिवेशनात हमखास येतो, विरोधक यावरून विधानसभेचे सभागृह दणाणून सोडतात, मुख्‍यमंत्री सावंत त्यावर स्‍पष्‍टीकरणे देऊन त्‍यांना थंड करतात, हे नित्‍यनेमाचे झाले आहे. म्‍हादईच्‍या लढ्यात पारदर्शकता यावी, यासाठी सरकारकडून २०२३ मध्‍ये जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सभागृह समिती स्‍थापन करण्यात आली होती. परंतु, दोन वर्षांत या समितीच्‍या केवळ दोनदाच बैठका झालेल्‍या आहेत. या बैठका होत नसल्‍याने आपण या समितीच्‍या सदस्‍यपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी गत पावसाळी अधिवेशनात दिली होती. त्‍यातच आता या समितीने येत्‍या २४ ऑक्‍टोबरला बैठक घेण्‍याचे निश्‍चित केले आहे. अशा स्‍थितीत विजय खरेच राजीनामा देऊन ते सरकारला चोख प्रत्युत्तर देणार का? की त्‍यांची ‘ती’ घोषणाच ठरणार? याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

सरकारमधील कोणाचा हात?

रामा काणकोणकर मारहाण प्रकरणात कोणाचा हात हा प्रश्न सध्या राज्यभरात चर्चिला जात आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी रामाचा बोलविता धनी कोण अशी विचारणा करून विरोधकांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. रामा यांना नैतिक पाठिंबा देण्यापलीकडे विरोधकांनी काहीही केलेले नाही. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. यामुळे रामा यांच्या शब्दांमागे सत्ताधारी कोणाचा हात असावा असा नवा मुद्दा त्यामुळे पुढे आला आहे. रामा यांनी थेट सरकार प्रमुखावर केलेले आरोप हे मोठ्या कटाचा भाग असू शकतात असे काहींना वाटते. त्यामुळे रामाचा बोलविता धनी कोण, हा मुद्दा विरोधकांतही चर्चेला आला आहे. ∙∙∙

‘ट्रायल रन’ की सहनशक्तीची तपासणी!

पर्वरीतील ‘ट्रायल रन’चा उद्देश वाहतूक नियोजन तपासणं नव्हताच! तो तर फक्त वाहनचालकांची सहनशक्ती किती आहे, हे बघायचा होता, अशा टोमणेवजा प्रतिक्रिया लोकांकडून संध्याकाळी व्यक्त व्हायला सुरुवात झाली. काही वाहनचालकांनी आम्हाला त्रास होतो, असे ओरडून सांगितले खरे पण काही गप्प राहिल्याने वाहनचालकांची सहनशक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे, असा सूर काही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच ऐकू येत होता. हे खरे असेल तर अजून काही दिवस चालकांना आपली सहनशक्ती टिकवून ठेवावी लागेल, हे मात्र नक्की! ∙∙∙

झगमगाटावर किती खर्च?

‘पर्पल फेस्ट’ नुकताच पार पडला, तोही रंगारंग कार्यक्रमाने. वास्तविक या महोत्सवाचे उद्दिष्ट दिव्यांगजनांना सोसाव्या लागणाऱ्या वेदनांवर फुंकर मारण्याची धडपड असावे, ते काही अंशी साध्यही झाले असावे. पण केवळ झगमगाटी सोहळ्याने दिव्यांगांच्या वेदना शमणार असतील, तर असे दिव्य सोहळे रोजच व्हायला हरकत नसावी, कारण या सोहळ्यात हजर असलेल्या अनेक दिव्यांग प्रतिनिधींचे डोळे दिपून गेले, इतका अवाढव्य खर्च या फेस्टवर झाल्याचे दिसत होते. असो, पण या फेस्टचा किती दिव्यांगांना प्रत्यक्ष लाभ झाला, ही अन् या नेत्रदीपक सोहळ्याच्या सजावटीवर किती खर्च झाला, याचा खुलासा झाला तर ते खऱ्या अर्थाने या सोहळ्याचे फलित म्हणता येईल नाही, का? ∙∙∙

‘कला राखण मांड’मध्ये राजकारणाला सुरुवात?

कला राखण मांडचे सदस्य प्रत्येक निर्णय एकत्रितपणे घेतात- एखादी चळवळ असो वा एखाद्या अधिकाऱ्याची जाऊन घेतलेली भेट या प्रत्येक बाबतीत चर्चा-विमर्श करूनच ‘कला राखण मांड’च्या सदस्यांनी आजवर निर्णय घेतलेला आहे, असे ऐकण्यात आहे. प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांच्या ‘व्हॉट्सअप ग्रुप’वर चर्चा करून हे निर्णय घेतले जातात. मात्र काही दिवसांपूर्वी जेव्हा कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री तवडकर यांनी ‘मांड’च्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी निमंत्रण दिले. तेव्हा ‘राखण मांड’च्या निमंत्रकांनी त्याबद्दल ग्रुपला न कळवता, गुपचूपपणे आपल्या जवळच्या काही निवडक सदस्यांना खाजगीरित्या शिष्टमंडळात सामील होण्यासाठी संदेश पाठवले. आज जेव्हा पत्रकारांतर्फे या भेटीची माहिती सार्वत्रिक झाली, तेव्हा त्याबद्दल अंधारात असलेल्या काही सदस्यांनी ग्रुपवर तीव्रपणे प्रश्न उपस्थित केले. तेव्हा ‘मांड’च्या या निमंत्रकांनी लगबगीने या भेटीला दहा मिनिटे असताना ग्रुपवर निरुपायाने त्याबद्दल संदेश टाकला. खात्याचे मंत्री बदलल्यानंतर त्यांच्याकडे आपले वजन टाकण्याची चढाओढ सर्वच ठिकाणी सुरू होत असते. त्याची लागण आता ‘कला राखण मांड’च्या काही सदस्यांना झालेली दिसते. ∙∙∙

स्वतःच्या पायावर कुऱ्हाड?

रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जनता त्यांच्यासोबत राहिली खरी. पण त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या विस्फोटक विधानाने अनेकांना त्यांच्यापासून तोडले, हेही आता दिसून येत आहे. जो राग पूर्वी विरोधक आणि समाज कार्यकर्त्यांत दिसत होता, तो मावळल्याचे चित्र सध्या दिसते. याला कारण म्हणजे रामा यांनी डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी आपल्या प्रकरणातील तपासात काय पुरावे आढळले आणि जे मिळाले नाहीत ते कधी मिळणार, असा प्रश्न करायला हवा होता. मात्र त्यांनी तसे न करता वेगळेच विधान केले. तेच बहुदा सर्वांच्या पचनी पडले नसावे आणि म्हणून आज रामाच्या बाजूने राहिलेल्या लोकांची संख्या घटली, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

काँग्रेसचे गिरीश-विकास प्रभुगावकर

रामा काणकोणकर यांनी गोमेकॉतून जाताना प्रसारमाध्यमांकडे मांडलेले मत वादळ उठवणारे ठरले आहे. काणकोणकरांच्या या मतावर सत्ताधारी पक्षाने टीका केली असली तरी विरोधी पक्षांनीही त्यांचे मुद्दे उचलून धरले आहेत. काही विरोधकांनी सरकार विरोधातील मते मांडली, त्याशिवाय आपापल्या मागण्याही कथन केल्या. परंतु काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी तत्काळ पोस्ट करित काणकोणकर प्रकरणात संशय व्यक्त झाल्याने राज्य सरकारच्या दोन ‘हेविवेट’ मंत्र्यांचे राजीनामे मागितले. त्याशिवाय काँग्रेसचेच पर्वरीचे नेते विकास प्रभुगावकर यांनी थेट नावे घेत त्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तर केलीच पण काणकोणकर हल्ल्यामागे नक्की काय कारणे असू शकतात, याविषयीची एक ‘व्हिडिओ क्लिप’ही त्या व्हिडिओला जोडली आहे. असे धारिष्ट्य काँग्रेसचे इतर नेते का दाखवू शकले नाहीत, याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT