वास्को : जोपर्यंत वास्कोतील खड्डेमय रस्ते व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत कंत्राटदाराला एकही पैसा दिला जाणार नाही, असा इशाराच वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिला आहे. वास्कोतील रस्त्याच्या झालेल्या दूर्दशेविषयी त्यांनी नाराजी बोलताना व्यक्त केली. रस्त्याची दुर्दशा झाली याची मला जाणीव आहे. त्यासाठी मी नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो असे साळकर म्हणाले.
वास्कोतील रस्त्याचे हॉट मिक्सिंग करून महिना झाला नसेल तोच लक्ष्मी पेट्रोल पंपजवळ रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. महिन्याभरातच रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त करून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावे बोटे मोडण्यास सुरुवात केली आहे. येथील समाजसेवक सातान कुरैया यांनी याविषयी चौकशी होण्याची मागणी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हॉट मिक्सिंग केलेला रस्ता पहिल्याच पावसाळ्यात खराब झाला. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदारासह इतर संबंधित अभियंत्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. रस्त्याची चाळण झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना वाहन चालकांना धोक्याचे बनले आहे.
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांना विचारले असता काही तांत्रिक कारणास्तव सदर हॉट मिक्सिंग बरोबर झाले नसल्याचे सांगून वाहन चालकाकडे दिलगिरी व्यक्त केली. आपण याविषयी संबंधित खात्याला आणि कंत्राटदाराला धारेवर धरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत रस्त्याचे काम सुरळीत होत नाही तोपर्यंत एकही पैसा कंत्राटदाराला दिला जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
तापमानामुळे सदर रस्त्याची चाळण झाल्याचे अभियंत्यांने सांगितले असल्याचे साळकर यांनी सांगितले. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाचे अभियंते विन्सेंट यांनी यावेळी बोलताना सदर रस्त्याचे हॉट मिक्सिंग तापमानाच्या तांत्रिक कारणामुळे उखडले गेले असल्याचे सांगितले. आता पावसाळ्यात तसेच ढगाळ वातावरणात काम करून चालणार नसल्याचे ते म्हणाले. सूर्यप्रकाश पडून तापमानात वाढ झाल्यानंतर सदर रस्त्याचे काम केले जाईल असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.