Valpoi : सत्तरी तालुक्यात अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांकडून शेती, बागायतींची प्रचंड नुकसानी सुरू आहे. ही नुकसानी शेतकरी व बागायतदारांच्या जीवावर बेतली आहे. बळीराजाला संरक्षण देण्याचे सोडून उपद्रवी प्राण्यांना मित्र बनविले जात आहे. त्यास सरकारची उदासीनता कारणीभूत ठरत आहे, असा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या समस्येवर ताबडतोब तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सत्तरी तालुक्यातील विविध गावांमध्ये गव्यांचा तर मुक्त संचार दिसून येत आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील माळेली, धावे, नगरगाव, आंबेडे आदी गावांत रस्त्यावर गवे नजरेस पडतात. धावे गावातही गवे बागायतींत, रस्त्यांवर खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे लोकांना बागायतीत जाणे धोक्याचे बनले आहे. वनखात्याने याकडे पाठ फिरविल्याने येथील लोकांचे जगणे खडतर बनले आहे. ‘सांगा, आम्ही कसे जगायचे?’ असा सवाल बळीराजा करीत आहे.
या कठीण परिस्थितीमुळे शेतकरी, बागायतदारांचे अर्थकारण, व्यवस्थापन बिघडले आहे. यावर काय उपाय करावा या विवंचनेत ते आहेत. कधी तरी उत्पन्न कमी मिळत होते. पण तरीही सरासरी उत्पन्नात समतोल राखला जायचा. पण आजच्या घडीला आर्थिक घडी बदलेली आहे. जंगली प्राण्यांनी उत्पन्न फस्त करायचे व कष्टकरी लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची असेच चित्र दिसत आहे.
काजू बागायतींत खेतींचा उच्छाद
पडून गेलेले नारळ, फळे नष्ट करणे हे बागायतदारांचे नित्याचेच काम बनले आहे. मग लोकांनी दररोज नुकसानीसाठी शेतकी खात्यात खेपा माराव्यात काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काजू बागायतीत देखील खेतींचा उच्छाद सुरू आहे. काजू झाडांवर उड्या मारून कोवळे काजूगर त्या खाऊन फस्त करतात. त्यामुळे या बागायतीत काजू हंगामापूर्वी बेणकट करावी लागते. सुपारी पीक घेणारेही ग्रामीण भागात बरेच लोक आहेत. त्यांच्यावरही मोठे संकट ओढवले आहे.
सत्तरीत अनेकांच्या मोठमोठ्या शेती, बागायती आहेत. सुपारी बागायतीत तर बाराही महिने काम करावे लागते. हिवाळ्यात पाणी पुरविणे, खते घालणे, चुडते गोळा करून साफसफाई करणे, पावसाळ्यात जमिनीवर पडलेली परिपक्व सुपारी रोज गोळा करणे, औषध फवारणी करणे आदी कामे करावीत लागतात. कुळागरात नारळ, फळांच्या राशीच्या राशी पडलेल्या असतात. त्याची नुकसान भरपाई सरकारकडून दिली जात नाही. त्यातच जंगली प्राण्यांचा उपद्रव. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
- रणजीत राणे, सोनाळ-सत्तरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.