Valpoi Traffic Parking Problems
वाळपई: मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे समस्येत अधिक भर पडली आहे. त्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होते. यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
वाळपई पालिकेने याआधी अनेकवेळा वाहतूक आराखडा तयार केला; पण त्याची योग्य कार्यवाही होत नसल्याने ही समस्या कायम आहे. सध्या येथील काही प्रमुख मार्गांवर नो पार्किंग फलक लावण्यात आले आहेत; परंतु या फलकांना कोणी जुमानत नसल्याचे दिसून येते. अनेक वाहने नो पार्किंग फलक लावलेल्या भागात पार्क केलेली दिसून येतात.
नो पार्किंग झोन दर्शविलेल्या प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्क केलेल्या जाणाऱ्या वाहनांवर सक्त कारवाई करणे आवश्यक आहे. जबर दंड आकारल्याशिवाय या बेकायदा पार्किंगला आळा बसणार नाही. त्यासाठी पालिका व वाहतूक विभागाने सक्त पावले उचलणे आवश्यक आहे.
दरम्यान, वाळपईत सकाळी व दुपारच्या वेळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. याचे आणखी एक प्रमुख कारण शहर परिसरात असलेली विविध विद्यालये असून अनेक पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी तसेच घेऊन जाण्यासाठी गाड्या घेऊन येतात. त्यामुळे शहरात वाहतुकीचा ताण वाढतो व वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात.
वाळपईत येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ नसल्याने पार्किंग समस्या वाढते. कामाधंद्यासाठी येणारे लोक सकाळी शहरात जागा मिळेल तिथे आपल्या गाड्या पार्क करून ठेवतात. दिवसभर या गाड्या तिथेच उभ्या असतात. तसेच बाजारहाट, सरकारी कामे आदींसाठी येणारे लोकही आपली वाहने जागा मिळेल तिथे ठेवतात. या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ आवश्यक आहे. पालिकेने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
वाळपई हे सत्तरीचे प्रवेशव्दार आहे, त्यामुळे सत्तरीतील वेगवेगळ्या भागात जाणारी सर्व वाहने ही वाळपई शहरातूनच जातात. शहराला वळसा घालून जाणारा एकही रस्ता नसल्याने वाहतुकीचा सगळा ताण वाळपई शहरावर येतो. विशेषत: प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बसगाड्या शहरात थांबा घेत असल्याने या समस्येत अधिक भर पडते. येथे कदंब स्थानक आहे; परंतु त्याला जोडणारा स्वतंत्र रस्ता नसल्याने या बसस्थानकाचा पुरेसा वापर होत नाही. बहुतेक बसगाड्या शहरातच थांबा घेऊन पुढे जातात. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.