पणजी: गोमंतक भंडारी समाजाचा (Gomantak Bhandari Samaj) राजकारणासाठी होत असलेला वापर थांबवावा आणि प्रशासक नेमून समाजाचे कामकाज पुढे न्यावे. सध्या समाजातील प्रत्येक घटकाला गृहीत धरून त्यांची मते न जाणून घेता ठराविक नेते विविध पक्षांना पाठिंबा देण्याची भाषा करीत आहेत. यामुळे समाजाची प्रतिमा मलीन होत आहे. शिवाय सध्याच्या समाज मंडळाचा कार्यकाल संपल्याने आमसभा बोलवून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी समाजाचे आजीव सभासद उदय शिरोडकर (Uday Shirodkar) यांनी केली आहे.
पणजीच्या आझाद मैदानावर शिरोडकर यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या लाक्षणिक उपोषणामुळे विधानसभा निवडणुका जवळ येताना धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाला वेग येत आहे. अशातच भंडारी समाजाने मुख्यमंत्रीपदाची मागणी करीत जो पक्ष भंडारी समाजाला हे पद देईल, त्याला समाजाचा पाठिंबा असेल असे व्यक्तव्य भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी केल्याने यावर समाजातील लोकांमधूनच विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते उदय शिरोडकर यांनी पणजीच्या आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण सुरू करून समाजाचा लिलाव मांडू नका, असे म्हणत सध्याच्या गोमंतक भंडारी समाज संस्थेवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.
समाजाचे नेते अशोक नाईक आणि देवानंद नाईक यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही आभाषी पद्धतीने आणि अवैद्यपद्धतीने पदे आपल्याकडे ठेवली आहेत. शिवाय समाजाला गृहीत धरून समाजामध्ये राजकारण सुरू केले आहे. यामुळे समाजामध्येच दरी निर्माण झाली असून, त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्वरित पदावरून खाली होऊन नव्याने निवडणुका घ्याव्यात. समाजाच्या आजीव सभासदांची आमसभा बोलवून राजकीय निर्णय घ्यावेत, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे.
अशोक नाईक, देवानंद नाईक यांच्याकडून लाखोंचा गैरव्यवहार
गोमंतक क्षेत्रिय भंडारी समाज ही मूळ संस्था असून, नव्याने स्थापन केलेल्या गोमंतक भंडारी समाजाने स्वतंत्रपणे बॅंक खाते खोलून लाखो रुपयांचे व्यवहार केले आहेत, हे सर्व व्यवहार अवैद्यपणे केले जात आहे, याची पोलिसांमार्फत चौकशी व्हावी आणि धर्मादय आयुक्तांमार्फत समाजाचे व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे.
समाजाच्या हितासाठी शिरोडकर यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांकडून पाठिंबा मिळत आहे. अशोक नाईक आणि देवानंद नाईक यांनी सुरू केलेले समाजाचे राजकीय ध्रुवीकरण हे समाजहितासाठी घातक आहे. यासाठी तातडीने आमसभा बोलणे गरजेचे आहे.
- ॲड. अनिश बकाल
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.