पणजी: उबो दांडो - सांताक्रूझ परिसरात शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी भरदुपारी घडलेली चोरीची घटना पोलिसांनी तब्बल चार दिवस लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका फ्लॅटमध्ये झालेल्या लाखोंच्या चोरीची अधिकृत माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांनाही दिली नाही. स्थानिक नागरिक आणि पीडितांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांची गुपचूप तपासाची पद्धत आणि घटना दाबून ठेवण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शुक्रवारी कुसुम चौहान यांच्या फ्लॅटमधून २५ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. १० लाखांचे सोने आणि १५ लाखांची रोकड घेऊन चोर अवघ्या २० मिनिटांत पळाले. कुसूमचे पती डब्ल्यू भारती यांनी सांगितले, की माझी पत्नी दुपारी मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेली असता ही चोरी झाली. अवघ्या २० मिनिटांत चोरांनी मुद्देमाल लंपास केला.
पत्नी घरी आल्यावर तिने जेव्हा चोरी झाल्याचे पाहिले, तेव्हा आम्ही जुने गोवे पोलिसांना फोन केला. पोलिसांनी चौकशी सुरू केली. १४ रोजी दुपारी जुने गोवे पोलिसांत तक्रारही नोंदविली; पण एवढ्या मोठ्या चोरीबाबत पोलिसांनी चार दिवस एक चकार शब्दही काढला नाही.
गुन्हेगारीच्या घटना दाबून ठेवून पोलिस कोणाची प्रतिमा उजळ करू पाहतात, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. सांताक्रूझमध्ये चोरीचे प्रकार वाढत आहेत आणि पोलिस मात्र आकडे लपवतात, असेही लोक स्पष्टपणे बोलू लागले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये महाराष्ट्र नोंदणीची गाडी संशयास्पदरित्या आढळल्याचे पीडितांना पोलिसांनी सांगितले. पण ही महत्त्वाची माहितीही अधिकृतरित्या दिली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.