साखळी: राज्यस्तरीय दर्जा प्राप्त त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव विठ्ठलापूर–कारापूर येथे वाळवंटी नदी परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात शेकडो नागरिकांनी वाळवंटीतील नौकानयन सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. या सोहळ्यात एकूण ३० सजविलेल्या नौकांनी सहभाग नोंदवला.
मध्यरात्री त्रिपुरासुर वधाने उत्सवाची सांगता झाली. हा सोहळा कला व सांस्कृतिक खाते, पर्यटन खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ, माहिती व प्रसिद्धी खाते तसेच दिपावली उत्सव समिती विठ्ठलापूर आणि विठ्ठल–रखुमाई देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता.
उत्सवाची सुरुवात श्रीकृष्ण मिरवणुकीने झाली. ही मिरवणूक विठ्ठलापूर ग्रामातून प्रदक्षिणा घालून वाळवंटी किनाऱ्यावर पोहोचली. तेथे श्रीकृष्णाची मूर्ती मध्यभागी स्थापन करून महिलांनी दीपदान केले. रात्री आठ वाजल्यापासून विठ्ठल–रखुमाई मंदिर परिसरात नौकानयन स्पर्धेतील नौका प्रदर्शनासाठी सज्ज होत्या.
उपस्थितांनी या कलात्मक नौकांचा जवळून आस्वाद घेतला. त्यानंतर रंगमंचावर "आधी देवा विठ्ठला" हा गोमंतकीय गायक व वाद्यकलाकारांचा संगीत कार्यक्रम रंगला. पुढे विठ्ठल–रखुमाईची पालखी वाळवंटी किनारी दाखल होताच त्रिपुरासुर वधाचा नाट्यमय सोहळा सादर झाला. त्यानंतर रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेल्या नौकांचे मोहक दर्शन होताच संपूर्ण वाळवंटीचे पात्र दैदिप्यमान झाले. आकाशात झेप घेणारे सरंगे (आतषबाजी) हे सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले.
या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट, कारापूर सर्वणचे सरपंच लक्ष्मण गुरव, पंचसदस्य तन्वी सावंत, बिंदीया सावंत, दत्तप्रसाद खारकांडे, साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, संचालक विवेक नाईक, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र जोगळे, देवस्थान समितीचे अध्यक्ष उदयसिंह राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोवा सरकार राज्यातील सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला राज्यस्तरीय दर्जा देऊन त्याची सर्व जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. या नौकानयन स्पर्धेतून युवकांची जहाजबांधणीतील सर्जनशीलता दिसून येते. युवकांनी नावीन्य, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रात भर देऊन कार्य केले, तर ते विकसित भारत आणि विकसित गोव्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.
प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले की, राज्य सरकार नागरिकांचा आनंद वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. विकासासोबतच गोव्यातील लोक आनंदी राहावेत, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. सूत्रसंचालन श्याम गावकर आणि समृद्धी गणपुले यांनी केले.
माहिती व प्रसिद्धी खात्याच्या वतीने मंदिराजवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पूर्ण झालेल्या पूल व रस्त्यांच्या विकासकामांचे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.