वास्को: मुरगाव पत्तन न्यास (MPT) बंदरातील धक्का क्रमांक 10 व 11 खाजगीकरण करून सार्वजनिक खाजगी भागीदारी करण्याच्या तयारीत असून त्याला मुरगाव बंदरातील गोवा पोर्ट अँड डॉक कामगार संघटनेबरोबर मुरगाव पोर्ट अँड रेल्वे कामगार संघटनेने तीव्र विरोध केला आहे. मुरगाव बंदरातील (Murgaon Port) धक्क्याचे खाजगी करण्याच्या विरोधात मुरगाव सडा येथील एमपीटी प्रशासकीय इमारती समोर दोन्ही कामगार संघटनेच्या (Trade Unions) नेत्याबरोबर कामगारांनी निदर्शने केली.
मुरगाव पत्तन न्यास (एमपीटी) बंदरातील धक्का क्रमांक 10 व 11 खाजगीकरण करून एमपीटी व्यवस्थापन कामगारांच्या हिताच्या विरोधात जात असून याला बंदरातील गोवा पोर्ट अँड डॉक कामगार संघटना व मुरगाव पोर्ट अँड रेल्वे कामगार संघटनेने विरोध दर्शविला आहे. बुधवार रोजी मुरगाव पत्तन न्यासच्या दोन्ही कामगार संघटनेने मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 10 व 11 ला खासगीकरणाला सडा येथील एम पी टी च्या प्रशासकीय इमारती समोर व्यवस्थापनाच्या विरोधात निदर्शने केली.
यावेळी गोवा पोर्ट अँड डॉक कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गावडे (Laxmikant Gawde), उपाध्यक्ष रवी लुइस, बालकृष्ण फळदेसाई, खजिनदार अभय राणे, उदय फोडते, भरत पाटील, तथा मुरगाव पोर्ट अँड रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष क्रूज मास कारेन्हस, कार्याध्यक्ष जो डिकॉस्ता, उपाध्यक्ष शाहीर खान, खजिनदार करिम मुल्ला, अनिल एकोस्कर व दोन्ही कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी कामगार उपस्थित होते. पुढे माहिती देताना लक्ष्मीकांत गावडे म्हणाले की, व्यवस्थापन समितीने एम पी टी मधील धक्का क्रमांक 10 व 11 खाजगीकरण करून सार्वजनिक खाजगी भागीदारी करण्याचा प्रयत्न करणे एकदम चुकीचे आहे.
कारण पूर्वीच बंदरातील काही धक्के खाजगीकरण करून एम पी टी ची आर्थिक रित्या नुकसानी झालेली आहे. एवढे असून सुद्धा व्यवस्थापन धक्का क्रमांक 10 व 11 सार्वजनिक खाजगी भागीदारी करण्याच्या उद्देशाने बैठका घेत आहे. याविषयी बंदरातील दोनही कामगार संघटनेने राज्य कामगार आयुक्तकडे दाद मागितली आहे. तसेच पुढील व्यवस्थापनाच्या बैठकीत दोनही कामगार संघटनेने खाजगीकरणाला विरोध करणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली. तसेच व्यवस्थापनाच्या विरोधात पेन्शन संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
यावेळी मुरगाव पोर्ट अँड रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष क्रूज मास्कारेन्हस यांनी एम पी टीचा धक्का क्रमांक 10 व 11 ला खासगीकरणाला तीव्र विरोध करून व्यवस्थापन कामगारांना संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. एम पी टीमध्ये सध्या असलेले 800 कामगार सदर बंदरातील धक्का क्रमांक 10 व 11 वर आपला उदरनिर्वाह करीत असताना, व्यवस्थापन दोन्ही धक्के खाजगीकरण करण्याच्या हालचाली करीत आहे. याला येणाऱ्या बैठकीत कामगार संघटना विरोध करणार असल्याची माहिती मास्कारेन्हस यांनी दिली.
एमपीटीला 153 कोटीची खाजगीरित्या दिलेल्या बंदरातील धक्क्याची थकबाकी येणे बाकी असतानासुद्धा व्यवस्थापन उर्वरित धक्के सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे देण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप काम कामगार नेते लक्ष्मीकांत गावडे यांनी केला. व्यवस्थापनाने यापूर्वी वेस्टर्न इंडिया शिप्यार्ड कंपनी व अदानी कंपनीला धक्के खाजगीकरण देऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात असताना पुन्हा एकदा धक्का क्रमांक 10 व 11 खाजगीकरणाला देण्याचा विचार करीत आहे. एमपीटीला वेर्स्टन इंडिया शिप्यार्ड कंपनी अंदाजे 27 कोटी तर अदानी कंपनीचे 126 कोटी थकबाकी येणे आहे. भविष्यात 10 व 11 धक्का खाजगी करण्यास दिल्यास याची सुद्धा हीच स्थिती निर्माण होऊ शकते अशी माहिती गावडे यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.