म्हापसा : शहराचा कायापालट करणे, गेल्या तीन दशकांची एकाधिकारशाही मोडीत काढणे आणि म्हापशाला नवे, सक्षम नेतृत्व देण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांतील नागरिक एकत्र आले आहेत. सर्वसमावेशक विचारसरणीतून शहराला नवी दिशा देण्यासाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या कायमस्वरूपी संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे.
गुरुवारी, रामनवमीच्या मुहूर्तावर संघटनेचे प्रवर्तक ॲड. महेश राणे आणि अन्य सदस्यांनी या संघटनेची भूमिका स्पष्ट केली. आगामी नगरपालिका निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक, या दोन्ही टप्प्यांवर ही संघटना शहराच्या हितासाठी निर्णायक भूमिका बजावेल.
आगामी पालिका निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे आणि कार्यक्षम उमेदवारांचे पॅनेल रिंगणात उतरवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी ही संघटना ‘शॅडो कौन्सिल’च्या तत्त्वावर काम करेल. शहराच्या समस्या मांडण्यासोबतच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला जाईल, असे विजय भिके यांनी स्पष्ट केले.
राजकारणातील वाढती दडपशाही आणि भीतीचे वातावरण दूर करून नागरिकांना मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे राजेश मराठे यांनी सांगितले.
नगरपालिका हे केवळ पक्षीय नेत्यांचे साधन बनू नये, तर ते लोकसेवेचे केंद्र राहावे यासाठी संघटना प्रयत्नशील राहील, असे जितेश कामत यांनी नमूद केले.
प्रत्येक प्रभागातील समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच सदस्यांची विशेष समिती नियुक्त केली जाणार आहे. अध्यक्ष ॲड. महेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या संघटनेत उपाध्यक्ष अर्मिंदो ब्रागांझा, विजय भिके, डॉ. पृथ्वी आमोणकर, जितेंद्र फळारी, दीपू म्हाडेश्री. सरचिटणीस जितेश कामत.
सचिव शेखर नाईक, प्रवीण आसोलकर, योगेश केळकर, मेधा जाधव, पांडुरंग सावंत, सूरज मंत्रावादी, अभय सामंत, सिद्धेश केणी, शाहजहान शेख, देश किनळेकर. खजिनदार राजेश मराठे. सह-खजिनदार देवेंद्र राठवड. कार्यकारी सदस्य मयूर सावकार, सुदेश हसोटीकर, सत्येन म्हापसेकर, नॉर्मन आताईत, नारायण राटवड, प्रताप परब, यांसारख्या २६ समविचारी नागरिकांचा समावेश आहे.
संघटना प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी शहरात सर्वेक्षण आणि जनसंवाद कार्यक्रम राबवले जातील. जिथे नगरपालिका अपयशी ठरेल, तिथे शांततापूर्ण आंदोलने आणि प्रसंगी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. नद्यांचे प्रदूषण आणि जिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थापन यावरही उपाययोजना सुचवल्या जातील. ‘टुगेदर फॉर म्हापसा’ ही संघटना केवळ एक गट नसून म्हापसाचा हरवलेला नागरी अभिमान परत मिळवण्यासाठी सुरू झालेली एक लोकचळवळ ठरेल, असा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.