pradeep shet
pradeep shet 
गोवा

‘बाबरी ढाचा पाडला त्यामुळेच आजचा सुदिन दिसला...’

नरेंद्र तारी

फोंडा,  अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी होत आहे, या पायाभरणीचा हर्ष आज प्रत्येक करसेवकाच्या मनात आहे. या करसेवेत गोव्यातून सहभागी झालेले दुर्भाट येथील एक उद्योजक प्रदीप शेट यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ६ डिसेंबर १९९२ रोजी करसेवेतून बाबरी ढाचा पाडला नसता तर कदाचित आजचा हा सुदिन दिसलाच नसता, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याशी साधलेल्या संपर्कातून प्रदीप शेट यांनी अयोध्येच्या करसेवेतील अनेक स्मृती जागवल्या.
समोर करसेवकांचा अथांग जनसागर. डोळ्यात निर्धार आणि स्फुरलेले हात...! एकच नाद घुमला, जयघोषाने आसमंत दणाणून गेले आणि गेली अनेक वर्षे हिंदुंच्या ललाटावरील कलंक पुसून टाकला गेला. "हर हर महादेव'चा घोष अन्‌ "जय श्रीराम'चा नाद यामुळे क्षणार्धात प्रत्यक्ष करसेवेला सुरवात झाली आणि पाहता पाहता बाबराचा ढाचा कोसळून पडला. १९९२ सालची ही घटना...या घटनेचा साक्षीदार होण्याचा आणि जवळून सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले असल्याची प्रतिक्रिया प्रदीप शेट यांनी व्यक्त केली आहे. अयोध्या ही श्रीरामाची भूमी पण परकीय आक्रमणावेळी येथील मंदिर पाडून त्यावर बाबरी ढाचा उभारण्यात आला. त्याच जागेवर राम मंदिर उभारण्याचा विचार सुरू झाला. विश्‍व हिंदू परिषद आणि संघसेवकांबरोबरच हिंदुत्वनिष्ठांनी त्यासाठी पुढाकार घेतला. राम मंदिर उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचा दिवस ठरला ६ डिसेंबर १९९२ रोजीचा. देशभरातून करसेवक अयोध्येत जमा होऊ लागले.
गोव्यातूनही आम्ही सुमारे दीडशे लोक रवाना झालो. विद्यमान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवरांसोबत जाण्याचा मलाही योग आला. खरे म्हणजे घरून विरोध झाला, आई कशीच ऐकेना..! पण घरच्यांची समजूत काढली, आणि अखेर अयोध्येला प्रस्थान केले. अयोध्येला आम्ही ३ डिसेंबरला पोचलो. ४ तारखेला विश्रांती घेतली. ५ रोजी सकाळी उठल्याबरोबर बैठका आणि प्रत्यक्ष करसेवेसंबंधी माहिती देण्यात आली. श्रीरामाच्या लाखो विटा अयोध्येला पोचल्या होत्या. प्रत्येकाची भावनाच त्या मातीच्या विटेत दडली होती. जसे काही आम्ही प्रत्यक्षात येऊ शकत नाही, पण आमच्या ह्रदयातील संवेदना या श्रीरामाच्या विटेत आहेत, असाच संदेश सर्वांनी दिला होता.
करसेवेच्या आधी विवादित बाबरी ढाचा पाहण्याची संधी मिळाली. बाबरी मशीद नतद्रष्टांनी उभारली खरी, पण त्यावर मशिदीप्रमाणे कोणताच मिनार नव्हता. खांबांवर विष्णूरुपी वराह अवताराची चित्रे होती. खांबांवरील कारागिरीही हिंदू संस्कृतीची. नंतरच्या काळात याच ठिकाणी उत्खननात हिंदू संस्कृती आणि देवतांशी संबंधित वस्तू मिळाल्या तो भाग वेगळा. पण प्रत्यक्षात हा ढाचा पाहिला तर सबंध हिंदू संस्कृतीचा लेपच या ढाच्याला चढवण्यात आल्याचे लक्षात यावे, अशी स्थिती होती.
५ डिसेंबरला विवादित जागी पाहणी झाली. पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. ६ तारखेला प्रत्यक्षात करसेवेचा दिवस उजाडला आणि हजारोंच्या संख्येने करसेवकांनी विवादित बाबरी ढाचाच्या दिशेने चाल केली. हर हर महादेव आणि जय श्रीरामाच्या घोषाने आसमंत दणाणून गेले. ढाच्याकडे अगोदर पोचलेल्यांनी ढाच्यावर चढून भगवा फडकवला आणि प्रहार केले, बघता बघता इतरांच्या सहकार्याने ढाचा जमीनदोस्त झाला.
ईप्सित तर साध्य झाले होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेच्या तावडीतून सुटका कशी होईल...!
पाच दिवस कसेबसे जागा मिळेल तेथे झोपून, काही मिळाले ते पोटात ढकलून काढले. थंडीचे दिवस, त्यातच ओलसर गवतावर झोपण्याची पाळी, तंबू उभारलेले, पण सर्वांना पुरणार कसे. कुडकुडत रात्री काढल्या, एकदा तर राखीव पोलिस दलाच्या जवानांनी तंबू उखडून टाकले, मिळेल त्याच्यावर लाठी चालवल्या, वाट मिळेल तेथून पळत सुटलो. शेवटी कसेबसे रेल्वे स्थानकावर आलो. आम्ही सगळेजण सुरक्षित होतो. हायसे वाटले. रेल्वेत शिरलो. पण पुढे काही स्थानकांवर तर हिंदुविरोधी संघटनांनी रेल्वेवर दगडफेक केली. त्यातूनही बचावलो, आणि घर गाठले. मनात एकच खुन्नस होता, श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा. जे करायला गेलो ते प्रत्यक्षात कार्यवाहीत आणले, याचे मोठे समाधान, अशा शब्दात प्रदीप सेट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT