मोरजी: तिळारी प्रकल्पातून पेडणे तालुक्यासाठी येणारे पाणी नेतर्डे-हाळी जंक्शनवरून बांदा-डोंगरपाल या भागासाठी महाराष्ट्रात वळवले जात आहे. अगोदरच तिळारी प्रकल्पातून महाराष्ट्र सरकार गोव्याला कमी प्रमाणात पाणी सोडत असून, सोडलेल्या पाण्यातील अर्धे पाणीही पुन्हा महाराष्ट्र राज्याला वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जलसिंचन खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तिळारी प्रकल्पातून अर्धवट पाणी गोवा राज्याला अर्थात पेडणे-डिचोली भागासाठी सोडले जात आहे. त्या अर्ध्या कोट्यातील अर्धे पाणी आता महाराष्ट्राला वळवण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. नेतर्डे-हाळी जंक्शनवर जो कालवा उभारलेला आहे त्या कालव्यातून हे पाणी बांदा-डोंगरपाल भागाला सोडले जाते. हा प्रकार असाच सुरू राहिला तर या कालव्याच्या परिसरात असलेल्या शेती-बागायतीला पाणी मिळणार नाही. दुसरीकडे, सरकार पेडणे तालुक्यातील मोठ्या प्रकल्पांना पाणी देण्यासाठी नद्यांचे पाणी आणि तिळारी प्रकल्पातून येणारे पाणी त्या ठिकाणी पंपहाऊस बसवून वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कालव्यातून दरदिवशी लाखो लिटर पाणी वाया: सासोली-दोडामार्ग तिळारी भागातून येणारा जलसिंचन खात्याचा कालवा पेडणे तालुक्यात पोचलेला आहे. या कालव्याला भगदाडे पडलेली आहेत. त्यातून दरदिवशी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्याची दुरुस्ती करण्याकडे जलसिंचन खात्याने आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. उलट जलसिंचन विभाग मोठ्या प्रमाणात नवनवीन प्रकल्प उभारून नद्यांचे पाणी इतर प्रकल्पांना देण्यासाठी पंपहाऊस उभारत आहे. हे पंपहाऊस उभारण्यापूर्वी गोव्यातील शेती-बागायतींना प्राधान्य देण्यासाठी जे कालवे उभारलेले आहेत, त्यातून दिवसाकाठी वाया जात असलेले लाखो लीटर पाणी वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.