पणजी: राज्यात (Goa) कोविडच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना परराज्यातून गोव्यात येणारे बिनधास्त दाखल होत असल्याने राज्याच्या सिमेवरील तपासणी केवळ ‘फार्स’ ठरत आहे. दुचाकीवरून येणाऱ्यांची सक्तीने तपासणी केली जात असली तरी खासगी बसमधून (Bus) प्रवास करणाऱ्यांची तपासणी टाळली जात आहे. नाक्यांवर (Check Post)तपासणीबाबत होणारी टाळाटाळ भविष्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेचे कारण ठरू नये.
कोविडचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात परप्रांतातून येणाऱ्यांची काळजीपूर्वक तपासणी केली जावी, असे आवाहन न्यायालयाकडून करण्यात आले आहे. सरकारकडूनही तिसरी लाट रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्याच्या हद्दीवरील गोवा-मुंबई महामार्गावरील पत्रादेवी नाका, बेळगाव-पणजीदरम्यानचा चोर्ला राज्य महामार्गावरील केरी नाका, बेळगाव-पणजी, धारवाड महामार्गावरील मोले नाका आणि काणकोण दरम्यानच्या कारवार मार्गावरील नाक्यावर प्रवाशांची कितपत तपासणी केली जाते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर राज्यांनी केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लाधलेले आहेत. केरळसह ज्या राज्यांत कोविडचे रुग्ण वाढले आहेत, त्या राज्यातील नागरिकांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. तातडीच्या कामासाठी दोन्ही लसींच्या अटीसह आटीपीसीआर चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. एकूणच सर्वच राज्यात कोविडसंदर्भात दक्षता बाळगली जात असताना गोव्यात मात्र हलगर्जीपणा केला जात आहे. सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असून त्यानिमित्त राज्यात विविध राज्यातून नागरिक राज्यात येत आहेत.
केरी येथील नाक्यावर बस आल्यानंतर केवळ काही प्रवाशांचीच चाचणी केली जात आहे. उर्वरीत प्रवाशांची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे प्रवाशी निर्धास्तपणे राज्यात येत आहेत.त्यामुळे ब्लॅक फंगसचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे.
तपासणीसच केरळचे!
राज्याला जोडणाऱ्या सर्व तपासणी नाक्यांवर केरळीयन आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. भयभीत झालेला केरळी नागरिक गोव्यात येत आहेत. पण, त्यांची गांभिर्याने चाचणी केली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय इतरही राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची व्यवस्थित चाचणी केली जात नाही. काहीजण बस थांबल्यानंतर पुढे येऊन थांबतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.