पणजी: थिवी येथे प्रस्तावित एमआयटी विद्यापीठ संकुलासाठी १ हजार १४९ झाडांची तोड करण्यास गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. अलीकडील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून भरपाई वृक्षलागवड व पर्यावरणीय उपाययोजनांसाठी कठोर अटी घालण्यात आल्या आहेत.
हा प्रस्ताव पुण्यातील एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स चालवणाऱ्या महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च (एमएईईआर)ने सादर केला होता.
सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रावर खासगी शैक्षणिक संकूल उभारण्याचा या संस्थेचा मानस असून यात निवासी इमारती व शैक्षणिक पायाभूत सुविधा असतील. ही जमीन स्थानिक कोमुनिदादकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.
प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणावर झाडतोडीला परवानगी दिली असली तरी भरपाई स्वरूपात स्थानिक प्रजातींची लागवड करण्याचा आदेश दिला आहे. अॅकेशिया नसलेल्या झाडांसाठी पाचपट आणि अॅकेशिया प्रजातींसाठी तीनपट वृक्षलागवड करावी लागणार आहे. या परिसरातील अॅकेशिया झाडांचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, एमआयटी समूहाने याच जमिनीवरील जुना लोखंडाचा खनिज साठा हटवण्यासाठी खाण व भूविज्ञान संचालनालयाकडे परवानगी मागितली आहे. या भागात सुमारे ६१४ अॅकेशिया झाडे आहेत. मात्र या झाडतोडीसाठी खाण खात्यासह संबंधित विभागांची स्वतंत्र मंजुरी आवश्यक असेल.
प्राधिकरणाने घातलेल्या अटी
झाडतोड टप्प्याटप्प्याने करणे, जेणेकरून पर्यावरणावर कमी परिणाम होईल. झाडतोडीदरम्यान वन्यजीव, पक्ष्यांची घरटी वा त्यांचे निवासस्थान यांना हानी पोहोचू नये. अंतिम सरकारी मंजुरीपूर्वी सविस्तर वृक्षलागवड आराखडा सादर करणे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.