lockdown  Dainik Gomantak
गोवा

Panaji Lockdown : पणजीत आजपासून लॉकडाऊन; महिन्यासाठी शहर राहणार बंद

स्मार्ट सिटी प्रकल्प व कोरोनाच्या सावटावर प्रभावी मात करण्यासाठी सरकारची अनोखी कल्पना

दैनिक गोमन्तक डिजिटल

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी, खासगी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची अनुमती; मंत्रिमंडळाचा निर्णय

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला.

गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होऊन त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.

शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.

एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.

‘पोलिस खात्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.

‘पणजी शहराच्या भल्यासाठीच सरकारने लॉकडाऊन पुकारले असून जनतेने त्याकामी संपूर्णत: सहकार्य करावे. या एका महिन्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्व कामे संपवली जातील आणि पावसाळ्यात पणजी शहर बुडू नये, यासाठी हा निर्णय कठोरपणे राबविला जाईल’, असे पोलिस सूत्रांनी रात्री उशिरा ‘गोमन्तक’ला सांगितले.

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. ते म्हणाले, मी स्वत:च लॉकडाऊनचा प्रस्ताव सरकारला एका महिन्यापूर्वी दिला होता.

राजधानीत लोकांना अनेक अडचणी सोसाव्या लागत आहेत हे खरेच आहे. परंतु त्याहून मोठे संकट पावसाळ्यात येईल आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी स्वत: कोणतीही जबाबदारी घेणार नाहीत, हे ओळखून आम्ही हा प्रस्ताव तयार केला होता.

एक महिना संपूर्ण शहर बंद ठेवून सर्व बांधकामे वेगाने संपविण्याचा निर्धार आम्ही केला, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

आपत्कालीन सेवा सुरूच राहणार; साहित्य घरपोच पुरविण्‍याची व्‍यवस्‍था; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मच्छीमारांना सवलत

  • पणजीमधील हॉटेल्सना सक्तीने बंदी पाळावी लागणार असली तरी त्यांना जर घरपोच जिन्नस पोहोचवायचे असतील तर खास सरकारी सवलत देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केले आहे.

  • पणजीतील मच्छी बाजार बंद ठेवण्यास सांगितले असले तरी पणजीतील हॉटेलचालकांना खास स्टिकर देऊन त्यांना मडगावहून मासळी आणण्यास मान्यता दिली आहे.

  • या काळात पणजीतील लोकांना खास ताजी व स्वच्छ मासळी घरपोच देण्यात येईल. पणजीतील मच्छीमारांना मात्र बंदमधून वगळण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ पर्यंत मिरामार येथे त्यांना मच्छी विकण्यास परवानगी असेल.

औषधांवर १५ टक्के सवलत

लॉकडाऊनच्या एका महिन्याच्या काळात आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचा आदेश सरकारने दिला असल्याने आज रात्रीपासूनच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचा आदेश आरोग्य खात्याने दिला. या काळात पणजीतील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू राहील.

शिवाय पणजीतील सर्व फार्मसींना घरपोच औषधे पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात सर्व औषधांवर 15 टक्के सवलत देण्याचेही सरकारने बजावले आहे.

घरातही मास्क वापरा

बंदमधून वगळलेल्या सर्व घटकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अलगीकरण अत्यंत सक्तीने राबवतानाच प्रत्येकाने मास्क वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

घरामध्येही मास्कचा अवलंब करावा. ज्यांच्‍याकडे मास्क नाही, त्यांनी फोन केल्यावर ते घरपोच पोचवले जातील, अशी ग्‍वाही देण्‍यात आली आहे.

फातोर्ड्यातही लॉकडाऊन करा : विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय मात्र लोकानुरंजक असल्याची मल्लीनाथी केली. ‘आधीच सरकार काम करत नाही. अकार्यक्षमतेने कळस गाठला आहे. ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ असा हा प्रकार असून फातोर्डा येथेही लॉकडाऊन का केले जाऊ शकत नाही?’, असा सवाल त्यांनी केला.

विमान प्रवासासाठी हवाई इंधनात सूट

मोपा विमानतळावर विमान कंपन्यांसाठी खास सवलत गोवा सरकारने जाहीर केली. पणजीतील नागरिकांना हिमाचलमध्ये एका महिन्याच्या सुटीवर जायचे असेल तर विमान कंपन्यांनी 50 टक्के सूट द्यावी व त्या बदल्यात त्यांना हवाई इंधनामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा गोवा सरकारने केली आहे.

‘मोपा’ विमानतळ सुरू झाल्यावर हवाई इंधनात सरकारने काही सूट दिलीच आहे. त्यावर आता ५० टक्के अतिरिक्त सूट दिल्यामुळे बहुसंख्य विमाने ‘मोपा’वरून चंदीगढपर्यंत जाण्यासाठी मोठ्या संख्येने तयार होतील, असा सरकारचा अंदाज आहे.

हिमाचल प्रदेशात स्वस्त हॉटेल्स

पणजी शहरात वास्तव्य करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याची सुट्टी सरकारने आज जाहीर केली.

एप्रिलपासून संपूर्ण महिनाभर ही सुट्टी असेल. या काळात कर्मचाऱ्यांना राज्याबाहेर जायचे असेल तर त्यांना प्रवास भत्ता देण्याबाबतही सरकार विचार करीत आहे.

हिमाचल प्रदेश सरकारकडेही राज्य सरकारने बोलणी चालवली असून तेथे या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात हॉटेल्स पुरवली जातील.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे. संपूर्ण एप्रिल महिना एकूणच सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली तर आम्ही प्रमोद सावंत सरकारचे ऋणी राहू, असे संघटनेचे प्रमुख म्हणाले.

"लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरबसल्या मनोरंजनाची सोय व्हावी, यासाठी दूरचित्रवाणीवर दिवसाला तीन चित्रपट दाखविण्याची सोय केली जाणार आहे. हे मनोरंजन विनामूल्य असेल याची मी तरतूद केली आहे. लवकरच एका संकेतस्थळावर चित्रपटांची नावे जाहीर केली जातील."

- बाबूश मोन्सेरात, महसूलमंत्री

"कोरोनाची लागण वेगाने होऊ लागली आहे. शुक्रवारी कोरोनाच्या प्रादुर्भावाने एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर आम्ही अधिकच सावध झालो आहोत. याच सावधगिरीचा भाग म्हणून पणजी शहर बंद करण्याची कल्पना पुढे आली. पणजी शहर जर पूर्णत: कोरोना प्रादुर्भाव मुक्त झाले तर इतर शहरांनाही ही योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे."

- संचालक, आरोग्यसेवा संचालनालय

(वरील बातमी ‘एप्रिल फूल’चा भाग आहे. पणजी शहर गेले तीन महिने ज्या पद्धतीने खोदून ठेवले आहे, त्यामुळे येथील नागरिक त्रस्त बनला. त्यावर आम्हीही अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या, परंतु ‘एप्रिल फूल’च्या दिवशी मात्र आणखी अस्वस्थ न होता, अशापद्धतीने या खोदाईकडे बघावे व हसून प्रतिक्रिया द्यावी, या उद्देशानेच ही बातमी तयार केली आहे.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

SCROLL FOR NEXT