केपे: 'कुडचडे मतदारसंघाचा नियोजनबद्ध रित्या विकास करण्यावर माझा प्रयत्न आहे. विकास कामाविषयी आपले विरोधक नको असलेला अपप्रचार माझ्या विरोधात करीत असून, जर हा विकास लोकांच्या हिता आड येणार असेल, तर याला पूर्ण जबाबदार मला ठरवावे', असे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी सांगितले. ते रवींद्र भवनमध्ये (Ravindra Bhavan) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र कामाच्या शुभारंभ कार्यक्रमावेळी बोलत होते.
यावेळी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रचे उपाध्यक्ष तथा सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस (Tony Fernandes), नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई, नगरसेवक रुचा वस्त, टोनी फर्नांडिस, प्रमोद नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कुडचडे मतदारसंघाचा विकास करताना तो लोकांसाठी उपयुक्त ठरावा, याचा मी विचार करतो. मिळेल ते प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही, असे काब्राल यांनी सांगितले. सांडपाणी प्रक्रिया संयंत्रचे काम तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी सुमारे 650 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याच्या कामाला आज शुभारंभ होत असून यासाठी 166 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात किमान तीन ठिकाणी असे प्रकल्प सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास जागा उपलब्ध नसल्याने बंद पडले आहेत. पण आम्ही या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रथम जागा उपलब्ध करून दिली. आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काही दिवसात अनेक विकासकामे कुडचडे मतदार संघात येणार असून या मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा, हेच त्यांचे ध्येय असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी बऱ्याच ठिकाणी जागा मिळणे कठीण होत असल्याने, सदर प्रकल्प मार्गी लागू शकत नाही. पण काब्राल यांनी प्रथम जागा उपलब्ध करून दिल्याने टोनी फर्नांडिस यांनी काब्राल यांचे अभिनंदन केले. 'सांडपाणी प्रक्रिया हे काम येणाऱ्या काळासाठी अत्यंत गरजेचे असल्याने ते झाले पाहिजे आणि याला लोकांनी प्राधान्य दिले पाहिजे', असे फर्नांडिस यांनी सांगितले. काब्राल यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता कुडचडेला लाभला हे तुमचे भाग्य आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी या प्रकल्पाविषयी सखोल माहिती देण्यासाठी खास लोकांना आमंत्रित केले होते. यात डॉक्टर, वकील तसेच कुडचडेतील लोकांनी उवस्थिती लावून या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.