गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसजीपीडीए मार्केटमधील चिकन व मांस विक्रेत्यांना व्यवहार सुरु करण्यास मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासन इमारतीत पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या उपस्थितीत ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष व वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांच्या हस्ते ही मान्यता पत्रे या विक्रेत्यांना प्रदान करण्यात आली.
सिवरेज तसेच पाणीपुरवठा जोडणी नसल्याचे कारण देऊन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मडगावच्या एसजीपीडीए मार्केटमधील चिकन व मांस विक्रेत्यांना नोटिसा पाठवून व्यवहार बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर या विक्रेत्यांना सिवरेज जोडणीसाठी व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवान्यासाठी अर्ज करण्यास सांगितले गेले. काही दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची विक्रेत्यांनी भेट घेतली होती व त्यांच्या समस्या मंत्र्यांपुढे मांडल्या होत्या.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना एसजीपीडीएचे अध्यक्ष साळकर यांनी सांगितले की, आम्ही या विक्रेत्यांना सिवरेज जोडणी देण्याची तयारी केली आहे. त्यांची ही नवीन समस्या नसून खूप जुनी आहे. विक्रेत्यांनी सिवरेज महामंडळाकडे सिवरेज जोडणीसाठी तसेच वेगळ्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा खात्याकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जांवर लवकरच अंमलबजावणी होणार आहे
१ ज्या इमारतीत ‘एसजीपीडीए’ची कचेरी आहे त्या इमारतीतील लिफ्ट त्या इमारतीत शेकडो कचेऱ्या आहेत त्या सर्वांच्या वापरासाठी आहे. मात्र, त्या लिफ्टचा कुणीही वाली नाही. त्यामुळे लिफ्ट बंद पडली किंवा नादुरुस्त झाली तर त्याचे खापर नेहमी ‘एसजीपीडीए’वर फोडले जाते.
२ केवळ सामाजिक बांधिलकीच्या नजरेतून आम्ही ही लिफ्ट दुरुस्त केली आहे व काही दिवसांत या इमारतीत ज्या सरकारी कचेऱ्या आहेत त्यांच्यामार्फत नवीन लिफ्ट बसविणार आहोत, असे ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष दाजी साळकर यांनी सांगितले.
एसजीपीडीए मार्केटमधील स्वच्छतेवर आमचा जास्त भर आहे. कित्येक वर्षांपासून स्वच्छ न केलेली गटारे स्वच्छ करण्याचे काम आम्ही केले. त्यातून १०० ट्रक माती व कचरा बाहेर काढण्यात आला. जर एसजीपीडीए कचेरीसाठी सिवरेज जोडणी नसेल तर आम्ही ती लगेच घेण्यासाठी प्रयत्न करू, असेही साळकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.