हणजूण येथे पब्स व रेस्टॉरंटमधून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गेल्या दोन महिन्यांत ३१ रेस्टॉरंट्स व पब्सविरुद्ध ३३९ कॉल्स आल्याची माहिती पोलिसांनी सादर केली. त्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेत सर्वाधिक कॉल्स ज्या पाच रेस्टॉरंट्स व पब्सविरोधात पोलिसांना आलेत, त्यांना अवमान याचिकेत प्रतिवादी करून नोटीस बजावली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळालाही या पाच रेस्टॉरंट्स व पब्सवर देखरेख ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. हणजूण पोलिसांनी गोवा खंडपीठाला सादर केलेल्या माहितीनुसार १ जुलै २०२४ ते २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोलिस यंत्रण कक्षामार्फत हणजूण पोलिस स्थानकांना ३३९ कॉल्स आले आहेत.
ध्वनी प्रदूषणामुळे काही लोकांनी ३१ रेस्टॉरंट्स व पब्सविरुद्ध पोलिस स्थानकात तक्रारी केल्या. त्यापैकी १५ जणांविरुद्ध ११ वा त्यापेक्षा अधिक ध्वनी प्रदूषणाचे कॉल्स आले आहेत. या कॉल्सनुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी केलेल्या तपासणीवेळी बहुतेक ठिकाणी संगीताचा आवाज नियंत्रणात असल्याचे आढळून आले, असे आज खंडपीठाला दिलेल्या कारवाईसंदर्भातील अहवालात नमूद केले आहे.
म्हापसा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन विशेष पथके ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी व कारवाईसाठी स्थापन केली आहेत, त्या पथकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे नागरिकांना थेट या पथकातील अधिकाऱ्यांना करणे सोपे होणार आहे.
तक्रार नोंदविल्यापासून विशेष पथकांनी किंवा हणजूण पोलिसांनी ३० मिनिटांत कोणतीही कारवाई न केल्यास उपविभागीय अधिकाऱ्यांना थेट मोबाईलवर संपर्क साधून नागरिक तक्रार देऊ शकतात, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे.
गोवा खंडपीठाने अवमान याचिकादार तसेच ॲमिकस क्युरी या दोघांना सरकारने सादर केलेल्या या प्रस्तावासंदर्भात आणखी काही सूचना करायच्या असल्यास त्यांनी पुढील सुनावणीवेळी मांडाव्यात, असे तोंडी निर्देश देऊन ही सुनावणी ४ सप्टेंबरला ठेवली आहे.
डियाझ पूल क्लब ॲण्ड रेस्टॉरंट, हणजूण ५३ कॉल्स
नोआ गोवा, ओझरांत - वागातोर ५१कॉल्स
थलसा, वाडी - शिवोली २६ कॉल्स
बार हिफी, शापोरा - शिवोली २५ कॉल्स
रियथ ओझरांत - वागातोर १७ कॉल्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.