Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; पत्‍नीही गेली अन् पैसेही...

Khari Kujbuj Political Satire: टॅक्सी चालकांनीही जारी केलेले ॲप ॲग्रीगेटर धोरण अवलंबावे, अशा तऱ्हेने भूमिका सुरुवातीला केली होती. मात्र, टॅक्सी चालकांचा रुद्रावतार पाहून त्यांनी पलटी मारली आहे.

Sameer Panditrao

पत्‍नीही गेली अन् पैसेही...

काहीवेळा लोक आपली कामे पार पाडण्‍यासाठी पोलिसांना पैसे चारतात. अशीच घटना एका महिन्‍यापूर्वी मडगावातही घडली असे सांगण्‍यात येते. मटक्‍याच्‍या व्‍यवसायात असलेल्‍या एका बुकीची पत्‍नी म्‍हणे, घरातून अकस्‍मात गायब झाली. तिला शोधून आणण्‍यासाठी त्‍या मटकेवाल्‍याने मडगावातील पोलिस खात्‍यातील एका साहेबाला थोडे थोडके नव्‍हे तर चक्‍क दीड लाख रुपये दिले. मात्र, त्‍या मटकेवाल्‍याच्‍या दुर्दैवाने म्‍हणा किंवा अन्‍य काही कारणामुळे पैसे घेतलेल्‍या त्‍या साहेबांची मडगावातून बदली झाली आणि त्‍या जागी दुसरा साहेब आला. आणि यात त्‍या मटकेवाल्‍याची गाेची झाली. गायब झालेली त्‍याची पत्‍नी तो साहेब घरी आणून देऊ शकलाच नाही. पण त्‍यासाठी जे दीड लाख रुपये दिले तेही त्‍या मटकेवाल्‍याला परत मिळाले नाहीत. आता तो व्‍यावसायिकच मटकेवाला असल्‍याने पोलिसांच्‍या विराेधात तो बोलेल तरी काय? तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार, अशी त्‍याची सध्‍या स्‍थिती झाली आहे. ∙∙∙

मुख्यमंत्री पुन्हा मध्यस्थी करणार?

टॅक्सी चालकांनीही सरकारने जारी केलेले ॲप ॲग्रीगेटर धोरण अवलंबावे, अशा तऱ्हेने भूमिका सुरुवातीला केली होती. मात्र, टॅक्सी चालकांचा रुद्रावतार पाहून त्यांनी पलटी मारली आहे. या टॅक्सी चालकांनी जो आमदार त्यांना पाठिंबा देत नाहीत, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवू , असा एकप्रकारे स्पष्ट इशाराच दिला आहे. किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात टॅक्सी व्यवसाय करणारे स्थानिक लोक आहेत. त्यामुळे निवडणुकीवर डोळा ठेवून आमदार मायकल लोबो यांनीही आपली भूमिका बदलून टॅक्सी चालकांबरोबर राहिले आहेत. दुसरीकडे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी टॅक्सींना दिलेली उपमा वादग्रस्त ठरली आहे. सत्ताधाऱ्यामधील उत्तरेतून आमदार व दक्षिणेतील मंत्री हे ॲप ॲग्रीगेटरवरून चांगलेच भिडत आहेत. वाहतूकमंत्री गुदिन्हो हे उत्तर गोव्यात जाण्यासही कचरत आहेत. टॅक्सी चालक त्यांची तर उत्तरेत वाट पाहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मध्यस्थीची भूमिका घेण्याची पाळी आहे. सत्ताधारी आमदार व मंत्रीच एकमेकांना भिडत आहेत. तर मुख्यमंत्री काही काळ मजा बघत त्यामधून सुवर्णमध्य काढत आहेत. ∙∙∙

खड्डे गेले नाहीत, पण खडी आली!

पर्वरी महामार्ग हा अलिकडील काही आठवड्यांपासून खड्ड्यांचा ट्रॅक बनला आहे. पावसाने रस्ता चिखलमय केला अन् खड्ड्यांनी पोखरून काढला, आणि नंतर खड्डे भरायच्या नावाखाली फक्त खडी टाकण्यात आली. पण या खडीवर रोलर फिरला नाही, डांबर घातले गेले नाही, परिणामी सगळीकडे केवळ खडीच खडी पसरली! याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसतो आहे. त्यांच्या गाडीचा तोल ढळतो, अपघाताचे प्रमाण वाढते, आणि त्यात हेल्मेट असले तरी मान मोडायची भीती कायम आहे. प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने सरकारच्या दृष्टीने ‘दुचाकीस्वार म्हणजे ‘दुर्लक्षित लोक’ असा समज झाल्याचे लोक बोलताहेत. ∙∙∙

ड्रग्ज निर्मूलन होणार?

गोवा हे पर्यटक राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी नागरिक येत असतात. गोवा हे ड्रग्जचे विक्री केंद्र असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेकदा गोवा ड्रग्जमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे मात्र राज्यात हा ड्रग्ज कमी होण्याऐवजी अधिकाधिक सापडत आहे. एक तर पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असल्याचा दावा पोलिस अधिकारी करत आहेत. मात्र एक खरे की, राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल होत आहे. राज्यातील युवा वर्ग या व्यसनाकडे ओढला जाऊ लागला आहे, त्यामुळे माफिया व विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थविरोधी दिन पाळून त्याची जनजागृती होते. मात्र त्यामुळे त्याचा कितपत परिणाम झाला आहे, याची कोणतीही माहिती सरकारी यंत्रणेकडे नाही. हैद्राबाद व तेलंगणा ते गोवा कनेक्शन कित्येक प्रकरणातून उघड झाले आहे. त्यामुळे किनारपट्टी लाभलेल्या या पर्यटक राज्यात ड्रग्जचे निर्मूलन होणे कठीण मात्र त्यावर नियंत्रण ठेवणे तरी यंत्रणेच्या हाती आहे. ∙∙∙

‘एअर इंडिया’चा धसका

एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळल्याने कित्येकांनी या विमान कंपनीचा धसका घेतला आहे. त्यातील एक म्हणजे आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर. पालेकर हे सध्या विदेशात आहेत. आज ते गोव्यात पोहोचणार होते. पण त्यांनी जी तिकीट काढली होती, ते नेमकी एअर इंडिया कंपनीचे. पण पालेकर यांनी एअर इंडियाच्या विमानाचा एवढा धसका घेतला म्हणे की त्यांनी ही तिकीट कॅन्सल केली. आता ते उद्या दुसऱ्या कंपनीच्या विमानाने गोव्यात येणार आहेत म्हणे! ∙∙∙

विकासाचा फुगा फुटला!

फोंडा आम्ही नियोजनबद्ध शहर बनवणार! म्हणणाऱ्या घोषणांचा फुगा, पावसाच्या दोन सरींनीच फुटला! फोंडा शहरात हलक्याशा पावसानेच रस्ते तुंबले, गटारांचे झाकणं उघडली आणि स्थानिक प्रशासनाच्या ''विकासकामांची'' पोलखोल झाली. या शहराचे नाव पर्यटन नकाशावर असूनसुद्धा, पावसाने क्षणभरात सगळा ‘प्रसाद’ दाखवला. रस्त्यांवरून गाडी चालवणे तर लांबच, चालणेही धाडसाचे काम झाले. वाहनधारकांनी चिखल व पाण्यातून वाट काढत सरकारच्या नियोजनशून्यतेला शिव्या दिल्या. गेली कित्येक वर्षे ‘ड्रेनेज सुधारतोय’, ‘मान्सूनपूर्व तयारी पूर्ण!’ अशा बातम्या झळकतात, पण प्रत्यक्षात पाणी वाहून जात नाही – लोकांचाच संयम वाहून जातो. हेच जर ‘हलक्या’ पावसात, तर मुसळधारात काय? हाच का तो पर्यटनाचा विकास? शहराच्या मधोमध तलाव तयार व्हावेत, अन् प्रशासन अजून झोपेत असावे, हे बघून फोंड्याच्या नागरिकांना वाटते की ‘स्मार्ट सिटी’ नव्हे, ही ‘संकट सिटी’च! ∙∙∙

समिती गायब!

गोमेकॉच्या आपत्कालीन विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानापमानाचा रंगलेले नाट्य अजूनही थांबायचे नाव घेत नाही. सरकारने मोठ्या थाटात ‘चौकशी करू! असा डंका पिटला होता. आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू, असे जाहीर करून टाळ्या घेतल्या . पण आता समितीच गायब! नेमलीच नाही! म्हणजे फक्त ट्रेलर दाखवला आणि चित्रपटच गुंडाळला. समितीच नसेल, तर चौकशी कुठून? हा प्रकार सरकारच्या व्यवस्थापनाची क्लासिक ‘हातचलाखी आणि सफाई’! एकीकडे डॉक्टरांचा अपमान होतो, तर दुसरीकडे ‘आम्ही गांभीर्याने घेतले’ असं दाखवून वेळ मारून नेली जाते. गोमेकॉत नेमके ‘चिकित्सा’ कोण करते डॉक्टर की सरकार? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT