Tarun Tejpal Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: 'ती' घटना घडलीच नाही, तेजपालच्या वकिलांचा उच्च न्यायालयात दावा; सीसीटीव्ही, व्हॉट्स ॲप चॅट्स, तांत्रिक विसंगतींचा आधार

Tarun Tejpal Sexual Assault Case: ‘तहलका’ मासिकाचा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या लैंगिक छळ प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: तरुण तेजपालवर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेच्या विधानांमधील तांत्रिक विसंगती, तिचे घटनेनंतरचे सामान्य वर्तन, गायब झालेले पहिल्या मजल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि तिच्या खासगी व्हॉट्स ॲप चॅट्सचा (ज्यात १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा उल्लेख होता) हवाला देत सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल कायम ठेवण्याची मागणी तेजपाल याच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केली आहे.

आता सरकार ३० जुलै रोजी यावर युक्तिवाद करणार आहे. ‘तहलका’ मासिकाचा माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल याच्याविरुद्धच्या लैंगिक छळ प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू आहे. मे २०२१ मध्ये म्हापसा सत्र न्यायालयाने तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती. या आदेशाला गोवा सरकारने आव्हान दिले असून नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत तेजपाल याच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद पूर्ण केला.

तक्रारदार महिलेने असा दावा केला होता, की तेजपाल यांनी लिफ्ट सुरू ठेवून सलग दोन मिनिटे तिचे दरवाजे उघडू दिले नाहीत. पण विज्ञान आणि तांत्रिक तज्ज्ञ सांगतात की, आतून बटण दाबून लिफ्ट तशी फिरती ठेवणे अशक्य आहे. इतकेच नाही, तर फुटेज दाखवते की त्या काळात लिफ्टचे दरवाजे दोन मजल्यांवर उघडले होते. या तांत्रिक सत्यामुळे तक्रारदाराने वारंवार विधाने बदलली, हे स्पष्ट होते. आधी ती ‘अनेक बटणे’ म्हणाली, मग ‘एक बटण’ म्हणाली आणि शेवटी म्हणाली ‘मी फक्त हात पाहिला’, असा युक्तिवाद आबाद पोंडा यांनी केला.

पोंडा म्हणाले, की जर एखाद्या महिलेसोबत इतकी भयंकर घटना घडली असेल, तर ती भीतीने थरथर कापेल. पण इथली कथा वेगळी आहे. कथित घटनेनंतरही ती महिला ‘थिंक फेस्ट’च्या पार्ट्यांमध्ये अतिशय आनंदी आणि सामान्यपणे वावरत होती. धक्कादायक म्हणजे, तिने स्वतः तरुण तेजपाल यांना हाक मारून बोलावले आणि म्हणाली, ‘या, हॉलिवूड स्टार रॉबर्ट डी नीरो यांच्यासोबत आपल्याला फोटो काढायचा आहे!’ एखादी घाबरलेली पीडिता स्वतःहून आरोपीला फोटोसाठी बोलावते का?

म्हापसा सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये तरुण तेजपाल याला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने म्हटले होते की, सरकारी पक्ष तेजपाल याच्यावरील आरोप सिद्ध करू शकला नाही आणि पुराव्यांमध्ये गंभीर त्रुटी आहेत. गोवा सरकारने कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्दोष मुक्ततेच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

तक्रार कोणी, का केली?

या घटनेची तक्रार ‘तहलका’ मासिकात काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याने केली होती. पीडित महिलेच्या आरोपानुसार हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी तिला चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवले आणि तिच्या संमतीविना तिचा लैंगिक छळ केला. सुरुवातीला तिने संस्थेच्या अंतर्गत यंत्रणेकडे दाद मागितली होती; परंतु नंतर या प्रकरणाला फौजदारी स्वरूप आले आणि गुन्हा दाखल झाला.

माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुली नव्हे!

सरकारी पक्ष ज्या ई-मेल माफीनाम्याला सर्वांत मोठा पुरावा मानत आहे, तो मेल तेजपाल यांनी स्वतः लिहिलेलाच नाही. तक्रारदार महिलेला पोलिसांत जायचे नव्हते. तिला फक्त ‘क्लोजर’ हवे होते. तिने ‘तहलका’च्या शोमा चौधरी यांना जे सांगितले, त्या मसुद्यानुसार तो मेल तयार झाला आणि तेजपाल यांच्या सिस्टीमवरून त्यांच्या बहिणीने तो पाठविला. त्यात कुठेही बलात्काराची कबुली नाही आणि तो मेल पाठवल्यावर अवघ्या ११ मिनिटांत मीडियात लीक झाला, यावरून तेजपाल यांना बदनाम करण्याचा पूर्वनियोजित कट स्पष्ट होतो, असे ॲड. पोंडा यांनी न्यायालयात सांगितले.

तेजपाल न्यायालयात हजर

या खटल्याची सुनावणी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. आज स्वतः तेजपाल सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिला. त्याच्यासमवेत त्याचे वकील आणि सहकारी असा लवाजमा उपस्थित होता. पांढरा सदरा-पॅन्ट आणि डोक्यावर हॅट, पिकलेली दाढी असा लूक असलेला तेजपाल न्यायालयात दाखल झाला. आज तेजपाल याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात मुख्य युक्तिवाद पूर्ण केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.

पहिल्या मजल्याचे रहस्य

त्या रात्री ते दोघेही दुसरा मजला समजून चुकून हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर उतरले होते आणि चूक लक्षात आल्यावर पुन्हा लिफ्टमध्ये परतले. हे सत्य सिद्ध करू शकणारे पहिल्या मजल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मुद्दाम न्यायालयात आणलेच नाही. ते आणले असते तर तेजपाल निर्दोष असल्याचे सिद्ध झाले असते. पोलिसांनी मूळ डीव्हीआर देखील तपासू दिलेला नाही, असे पोंडा यांनी सांगितले.

१०० कोटींचे ‘डील’ : तक्रारदाराने नोकरी जाण्याच्या भीतीने विरोध केला नाही, हा दावा फेटाळताना तिच्याच खासगी व्हॉट्स ॲप चॅट्सचा स्फोट कोर्टात करण्यात आला. ती आधीच ‘तहलका’ सोडण्याच्या तयारीत होती आणि तिला १ लाखाची फेलोशिपही मिळाली होती. ती तिच्या मैत्रिणींशी व्हॉट्स ॲपवर चर्चा करत होती, की तेजपाल यांच्याकडून १०० कोटींची नुकसान भरपाई मागायची का? तिची सावत्र आई तिला सांगत होती, ‘घाईघाईने माफीनामा स्वीकारू नको, एक चांगली आर्थिक डिल करून घे.’

घटना कुठे, कधी घडली?

ही कथित घटना नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली. या हॉटेलमध्ये ‘तहलका’ मासिकातर्फे ‘थिंक फेस्ट’ या परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या एका लिफ्टमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. घटनेच्या केंद्रस्थानी तरुण तेजपाल आहे. तो ‘तहलका’ या प्रसिद्ध मासिकाचा संस्थापक व माजी मुख्य संपादक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

Vitthalapur Sanquelim Bridge: विठ्ठलापूर-साखळी पूल असुरक्षित, पावसाळ्यात साचते तळे; वीज दिव्यांअभावी अंधार; कचऱ्याचे साम्राज्य

India Silent Cholesterol Crisis: भारतात वाढला हृदयविकाराचा धोका, 90 टक्के लोकांचे कोलेस्ट्रॉल असंतुलित; ICMR चा धक्कादायक खुलासा

'आरजी'समोर आता भाजप नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाचं मोठं आव्हान! नेतृत्वातील मतभेदांमुळे पक्षाची घसरगुंडी?

Viral Video: बॉईज हॉस्टेलच्या मेसमध्ये शिरली 5 फुटी मगर; विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ, CCTV मध्ये कैद झाला थरार

SCROLL FOR NEXT