Ponda News : फोंडा, फोंड्यात विविध विकासकामांच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम सुरू असून या कामावेळी सरकारी खात्यात कोणताच समन्वय नसल्याने जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
मात्र त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. कुर्टी येथील गोवा डेअरीजवळील रस्त्यावर भूमिगत वीजवाहिन्यांसाठी रस्ता खोदल्यानंतर तिथे मारलेल्या चरीमध्ये गोवा डेअरीचा दूधवाहू टँकर अडकल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. या प्रकारामुळे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.
खड्ड्यात अडकलेला टँकर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. शेवटी मशीन आणून काम केल्यानंतर टँकर खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकारामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच करावा लागला, त्यामुळे लोकांना नाहक हेलपाटे पडले.
दरम्यान, अशाप्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी वीज खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते यांच्याकडे संबंधित खोदकाम करणाऱ्यांनी समन्वय साधण्याची आवश्यकता असून लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
कंत्राटदाराची मनमानी
अन्य एका घटनेत मेस्तवाडा - कुर्टी येथे वीजवाहिन्यांसाठी खोदकाम सुरू असून घरगुती गॅसवाहिनी फुटली. गॅसवाहिनीला गळती लागल्याने काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली, पण त्यानंतर स्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीची पाहणी केली.
मुख्य म्हणजे कंत्राटदार आपल्या मजुरांकरवी आपल्याला हवे तेथे खणतो, पण जमिनीखाली काय आहे, ते पाहण्याची तसदी घेत नाही, त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत.
सरकारी खात्यात कोणताच समन्वय नसतो. एखादे विकासकामे करायचे झाले आणि रस्ता खोदकाम करायचे झाले तर जमिनीखाली काय आहे, कोणती वाहिनी गेली आहे, ते पहायला हवे,
पण फोंड्यातच नव्हे तर राज्यात कुठेही सरकारी खात्यात यासंबंधी विचारणा केली जात नाही, कंत्राटदार आपली मनमानी करतो, आणि सरकार गप्प राहते.
- विराज सप्रे (सामाजिक कार्यकर्ता, फोंडा)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.