Purumentachem Fest Goa Dainik Gomantak
गोवा

Purumentachem Fest: शिरवळ्या ते खारे नुस्ते, कपियाळी ते गावठी घोटां; गोव्यातील पावसापूर्वीचा सांस्कृतिक ठेवा

Purumentachem Fest Goa: पुरूमेंत फेस्ताला गोव्याचा सांस्कृतिक ठेवा म्हणता येईल. गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आयोजित 'तनिष्का पुरुमेंत फेस्त' नुकतेच पणजीत पार पडले.

Sameer Panditrao

पुरूमेंत फेस्ताला गोव्याचा सांस्कृतिक ठेवा म्हणता येईल. गोमन्तक तनिष्का व्यासपीठ आयोजित 'तनिष्का पुरुमेंत फेस्त' नुकतेच पणजीत पार पडले. हे या फेस्ताचे तिसरे वर्ष होते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी साजरे होणारे तनिष्का पुरुमेंत फेस्त म्हणजे पावसाळी तीन-चार महिन्यांसाठी विविध प्रकारच्या वस्तू, जिन्नस यांची साठवणूक करण्याची पर्वणी असते.

तनिष्का व्यासपीठचे काम पेडणे ते काणकोणपर्यंत विस्तारले असून गावागावातील महिला तनिष्का व्यासपीठशी जोडल्या गेल्या आहेत. तनिष्का पुरुमेंत फेस्तमध्ये गोव्यातील ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. पारंपरिक पुरुमेंतच्या सामग्रीसोबत महिलांनी बनवलेल्या घरगुती उत्पादनांना या फेस्तात मोठ्या प्रमाणात मागणी असते. तनिष्का पुरुमेंत फेस्तच्या माध्यमातून तनिष्का व्यासपीठच्या महिला दरवर्षी नवीन उच्चांक रचत आहेत. 

पणजी, कांपाल भागातील डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स गार्डनमध्ये आयोजित केलेल्या तनिष्का पुरुमेंत फेस्तचे उद्‌घाटन पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण गोव्यातील गावागावांतून आलेल्या महिलांनीं आणलेल्या पुरुमेंतच्या सर्व सामग्रीची माहिती रोहित मोन्सेरात यांनी जाणून घेतली. प्रत्येक स्टॉलला भेट देऊन गोव्यातील ग्रामीण भागातून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, पदार्थ कोणते आहेत हे देखील त्यांनी समजून घेतले. इतक्या विविध प्रकारची पुरुमेंतची सामग्री एकाच छताखाली नागरिकांना मिळत आहे हे बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

पालये गावातील तनिष्का गटांच्या मार्गदर्शिका संध्या नाईक यांच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर खवय्यांनी गर्दी केली होती. संध्या नाईक यांनी बनवलेल्या शिरवळ्यांच्या 'रिल्स' गोमन्तकच्या सोशल मिडिया अकाउंटवर व्हायरल होताच संध्याकाळी शिरवळ्या खाण्यासाठी भली मोठी गर्दी झाली. गरम गरम शिरवळ्या स्वादिष्ट रसात मिसळून खाण्यात जो तो रमून गेलेला दिसून आला. याशिवाय चहा आणि कांदाभजी देखील आवडीने खाल्ल्या गेल्या. आता घरांमध्ये पारंपरिक पदार्थ बनवणारी पिढी हयात राहिली नाही त्यामुळे ‘शिरवळ्यो’ सारखे पदार्थ घरी बनवले जात नाहीत. तनिष्का पुरूमेंत फेस्तमध्ये 'शिरवळ्यो कोणत्या स्टॉलवर मिळतात?' अशी विचारणा करणारे अनेकजण परत परत येत होते. शिरवळ्यांनीं लोकांचं मन जिंकले. 

मांद्रेवरून आलेल्या नीता गावडे यांच्या स्टॉलवरच्या गावठी सुरई तांदळाची, हरमलच्या मिरचीची चांगली विक्री झाली तर सुषमा कुमठेकर (वास्को) आणि रजंती हळर्णकर (हळर्ण), नमिषा फातर्पेकर यांच्या स्टॉलवरील खाऱ्या नुस्त्यांना भरपूर मागणी होती. सुका गालमा, सुके बांगडे, सुके बोंबील, सुकी सुंगटा यांची मोठी विक्री या स्टॉलवर झाली. 

यावर्षी तनिष्का पुरुमेंत फेस्तने गर्दीचा उच्चांक मोडला तसेच विक्रीचा देखील उच्चांक मोडला. फेस्तच्या पहिल्या दिवशीच अनेक स्टॉलवरची उत्पादनांची  हातोहात विक्री झाली. नागरिकांकडून मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे विक्रेत्याना पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी पुन्हा आपापल्या गावातून मागवाव्या लागल्या. यावर्षी आंब्यांची विक्रमी विक्री झाली. गोवा बागायतदार संघाच्या स्टॉलवर विक्रीला असलेल्या आंब्याच्या चाळीस पेट्या पहिल्या दिवशीच संपल्या. तनिष्का गटातील महिलांनी खास शिवोलीवरून आणलेला झाडपिका मानकुराद आंबा देखील असाच लगेच संपला. मानकुराद, हापूस, केशर, भला मोठा भिष्म, गावठी घोटां असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे महिलांनी आपापल्या स्टॉलवर ठेवले होते. लोकांच्या प्रचंड मागणीमुळे आंबे विकणाऱ्यांची तारांबळ उडाली. 

काणकोण- खोतीगाव मधील तनिष्का गटातील महिलांच्या स्टॉलवर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सेंद्रिय गूळ आणि मिरची विकत घेण्यासाठी गर्दी झाली होती. खोतीगावचा  सेंद्रिय गूळ आता तनिष्का पुरुमेंत फेस्तमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यावर्षी अनेकजण 'काणकोणचा स्टॉल कुठे आहे आम्हाला सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे' अशी विचारणा करणारे भेटत होते. काणकोणच्या मिरच्या, सोलां (कोकम) ला देखील भरपूर मागणी होती. 

मुरगाव -कुठ्ठाळी येथील 'सारथी क्लस्टर फेडरेशन'चा गोमंतकीय शैलीतील 'कपियाळी' बनवण्याचा प्रकल्प आहेत. या फेडरेशनमधील अनेकजणी तनिष्का व्यासपीठमध्ये सदस्या आहेत. तनिष्का पुरूमेंत फेस्तमध्ये त्यांचाही स्टॉल होता. त्यांनी बनवलेल्या कपियाळीना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कपियाळीची डिझाइन्स खूप सुंदर होती त्यामुळे त्याकडे आकर्षित होऊन अनेकजणी या स्टॉलवर थांबत होत्या. या महिला ऑर्डर घेऊन कपियाळी बनवून देतात त्यामुळे तशी चौकशी करणाऱ्या खूप जणांनी या स्टॉलला भेट दिली.    

Purumentachem Fest

सत्तरी- पर्येमधून आलेल्या कोमल चिवारे आणि मुळगावच्या गीता मांद्रेकर यांच्या स्टॉलवर पारंपरिक गोमंतकीय पदार्थ ठेवण्यात आले होते. विविध प्रकारचे लाडू, शेव- चकली, चिवडा, फणसाचे तळलेले गरे, गरम मसाले, विडीयो, पापड, सांडगे घ्यायला अनेकजणी या स्टॉलवर जात होत्या. याशिवाय फोंड्यावरून आलेल्या पमेला फर्नांडिस यांच्या विविध प्रकारच्या झाडांच्या, शोभिवंत रोपांचा स्टॉल आकर्षण ठरत होता. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची घरात ठेवता येतील असे मनीप्लँट, निवडुंगाचे वेगवेगळे प्रकार तिच्याकडे स्वस्त दरात मिळत होते. 

वास्कोवरून आलेल्या सुषमा कुमठेकर यांच्या स्टॉल त्यांनी 'बन्स'चं तयार पीठ ठेवलं होतं. या पिठात सगळे घटक घातलेले होते. फक्त अर्धी वाटी दही घालून, पीठ घट्ट मळून बन्स तळायचे. बन्स बनवणं सोप्पं केल्यामुळे त्यांच्या या तयार बन्स पिठाला चांगली मागणी होती. वास्कोच्या आणखी एका स्टॉलवर ज्योती वळवईकर यांनी आणलेल्या भरलेल्या बाळकैऱ्यांचं लोणचं अप्रतिम होतं. त्यांच्याच स्टॉलवर गोमंतकीय पारंपरिक क्रोशेचे वेगवेगळे प्रकार विक्रीला होते. त्याचीही भरपूर विक्री झाली. आमोणा गावातील वनराई संस्थेच्या तृप्ती नाईक यांनी बनवलेल्या सुवासिक उदबत्ती, धूपची चांगली विक्री झाली. 

मागचे दोन महिने तनिष्का पुरुमेंत फेस्तची तयारी सुरु होती. उत्तर गोव्यात पूजा ठाकूर आणि दक्षिण गोव्यात सुषमा कुमठेकर यांनी तनिष्का गटातील महिलांना या फेस्तमध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला. पणजी नगरपालिकेच्या सहकार्यामुळे तनिष्का पुरुमेंत फेस्त यशस्वीपणे पार पडले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT