कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील विविध औद्योगिक आस्थापनांकडून होणारी अनियमितता, अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या समस्येने सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यावर कारवाई करण्यात सरकारला अपयश आल्याने जनक्षोभ निर्माण झाला आहे.
बेकायदा कृत्यात गुंतलेल्या ग्लोबल इस्पात प्रायव्हेट लिमिटेडवर त्वरित कारवाई करण्याची मागणी कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.
‘कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळेवर कारवाई न करणे ही मुख्यतः सरकारी प्राधिकरणाची उदासीनता आहे. सरकारच्या ‘गो स्लो’ पध्दतीमुळे औद्योगिक आस्थापनांना बेकायदेशीर कृत्ये सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळत आहे’, असे युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर व गैरकृत्यांचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मेसर्स ग्लोबल इस्पात प्रा. लि.,ची बेकायदेशीर डोंगर कापणी व अतिक्रमणे आहेत, असा दावा युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रात केला आहे.
कुंकळ्ळीच्या तलाठ्याने आपल्या अहवालात ग्लोबल इस्पातने बेकायदेशीरपणे जमिनीत भराव टाकून ६००० चौ. मी.च्या परिसरात व्यावसायिक शेड बांधल्याचे नमूद केल्याचेही युरी आलेमाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले आहे.
आस्थापनांकडून नियमांचे उल्लंघन
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील मोठ्या जमिनींवर अतिक्रमण करून तसेच गोवा दमण आणि दीव लॅंड रेव्हेन्यू कोडच्या नियमांचे उल्लंघन करून विविध औद्योगिक आस्थापनांनी सदर जमीन बेकायदेशीरपणे विकसित केली आहे.
नगरविकास कायदा आणि नगरपालिका अधिनियम यांचे उल्लंघन करून तसेच संबंधित सरकारी प्राधिकरणांना गृहीत धरून अनेक औद्योगिक आस्थापनांनी सर्व नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.