पणजी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड मंगळवारपासून (ता. २०) तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. विविध शासकीय व सामाजिक उपक्रमांत ते सहभागी होत आहेत. मंगळवारी त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी केलेल्या कृतीने सर्वांची मने जिंकली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड मंगळवारी दाबोळी विमानतळावर दाखल झाले. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आदी मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड दाबोळी विमानतळावर दाखल झाले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड गोव्यात दाखल झाले त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता. धनखड यांच्या स्वागतासाठी उपस्थित मान्यवर देखील छत्री घेऊन विमानतळावर हजर होते. धनखड आणि त्यांची पत्नी विमानातून खाली उतरताच सुरक्षा ताफ्यातील एक व्यक्ती त्यांच्यासाठी छत्री घेऊन आला. पण, जगदीप धनखड यांनी त्याच्या हातातून छत्री घेत स्वत:च धरली, एवढेच नव्हे तर पत्नीला देखील दुसरी छत्री घेऊ न देता एकाच छत्रीत दोघांनी सर्वांकडून स्वागत स्वीकारले. उपराष्ट्रपतींच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दक्षिण गोव्यातील मुरगाव बंदराला देखील भेट दिली. धनखड यांनी गोव्यात तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विकसित भारताबाबत भाष्य केले. २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनण्याचे आमचे ध्येय आहे, त्यासाठी सीमेवर शांतता आवश्यक आहे. युद्धासारख्या परिस्थितीत कोणता आर्थिक विकास शक्य नाही? अनेकजण ऑपरेशन सिंदूरबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत आणि पुरावेही मागतायेत, याबाबत बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले, 'कोणीही पुरावे मागत नाही, सैनिकांनी आणलेल्या दहशतवाद्यांच्या शवपेट्यांनी संपूर्ण जगाला सत्य दाखवून दिले आहे.'
"आज सुमारे ३०० कोटी रुपये खर्चाचे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. नरेंद्र मोदी सरकारचे एक वैशिष्ट्य आहे - ते समर्पित आहेत, म्हणजेच ते काम लवकर पूर्ण करतात. पंतप्रधानांना विकासाची आवड आहे; ते जलद आणि मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीवर विश्वास ठेवतात. आज समर्पित केलेले प्रकल्प भारताची बदलती प्रतिमा परिभाषित करतात", असे धनखड म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.