St. Xaviers Exposition Goa Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar: 'धर्माचा अवमान नाही'! वेलिंगकरांच्या वकिलाचा युक्तिवाद; वक्तव्यामागे 'षडयंत्र' असल्याचा पालेकरांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Velingkar Controversial Statement About St Francis Xavier DNA

पणजी: राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक सेवक संघाचे माजी गोवा प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी यापूर्वीही सोशल मीडियावर सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. झेवियर शवप्रदर्शन सोहळ्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या ४०० कोटींमध्ये घोटाळा दिसल्याने त्‍यांनी हे वक्तव्य केले असेल तर त्यांनी राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार तसेच सरकारी घोटाळे याविरुद्ध आवाज का उठविला नाही? पोलिसांनी नोटीस बजावल्यावर ते चौकशीसाठी का समोर आले नाहीत? असे सवाल ‘आप’चे राज्‍य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी आमदार क्रुझ सिल्वा यांच्या हस्तक्षेप अर्जावर युक्तिवाद करताना केला.

बोलमॅक्स फेरेरा यांनी केलेले वक्तव्य व संशयित वेलिंगकर यांच्या वक्तव्यात साम्य मुळीच नाही. त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे तो निवाडा या प्रकरणाच्या बाबतीत लागू होत नाही अशी बाजू त्यांनी मांडली. संशयिताने केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील व देशातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा गंभीर गुन्हा आहे. सेंट फ्रान्‍सिस झेवियर शवप्रदर्शन आगामी सोहळा कार्यक्रमाच्याच्‍या तोंडावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामागे षडयंत्र आहे, असे ॲड. पालेकर म्‍हणाले.

वेलिंगकर यांनी हे वक्तव्य करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून जे मत व्यक्त केले आहे, त्यासाठी त्यांना अनेक व्यासपीठे होती. पण त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. त्यांचा हेतू भाविकांच्या भावना दुखावण्याचा होता. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये. तो दिल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्था उद्‍भवू शकते, अशा बाजू इतर हस्तक्षेप अर्जदारांच्या वकिलांनी मांडल्या.

धर्माचा अवमान केलेला नाही!

येत्या डिसेंबरमध्ये सेंट फ्रान्‍सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्यावर सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे सेंट झेवियर यांचे अवशेष हे त्यांचेच आहेत की नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचे मत वेलिंगकर यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनाही ही माहिती मिळून त्याचा फायदा होईल व त्‍यावर पुन्हा वादाचा मुद्दा उपस्थित होणार नाही. असे वक्तव्य करून वेलिंगकर यांनी कोणत्याच धर्माचा अवमान केलेला नाही, असा युक्तिवाद वेलिंगकर यांचे वकील ॲड. सरेश लोटलीकर यांनी केला.

लोकशाही नसून झुंडशाही

अर्जदार वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत तसेच राज्यात रस्ते अडवून तसेच आंदोलन करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सरकारला भाग पाडले. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करत त्यांना अटकेची मागणी केली.

सरकारनेही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असे वक्तव्य केले. अटकपूर्व जामीन न्यायालयासमोर असताना पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावून त्यांना ते अटक करण्यासाठी शोधत होते.

वक्तव्याची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्याची किंवा पोलिस कोठडीतील चौकशीची गरज नाही. दबावामुळे ज्या पद्धतीने ही कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे ती ‘लोकशाही’ नसून ‘झुंडशाही’ आहे.

त्यामुळे चौकशीस जाण्यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करावा लागला. अर्जदार चौकशीस जाण्यास तयार आहे मात्र त्याना अटक न करण्यापासून न्यायालयाने संरक्षण द्यावे.

फादर बॉलमॅक्स परेरा यांच्याबाबतीत जी भूमिका न्यायालयाने घेतली ती याबाबतीतही घ्यावी अशी बाजू ॲड. लोटलीकर यांनी मांडली.

… तर तीन वर्षे शिक्षा

अर्जदार प्रा. वेलिंगकर यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली डिचोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २९९ खाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याखाली अधिकाधिक ३ वर्षे शिक्षा आहे. दखलपात्र गुन्ह्यामध्ये कायद्यानुसार ७ वर्षाहून अधिक कमी शिक्षा असल्यास जामीन देण्याची तरतूद आहे.

सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना न्यायालयाने योग्य धडा दिला आहे. रस्त्यावर आंदोलन करून सरकारला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे हा आंदोलनकर्त्यांचा विजय आहे.
प्रतिमा कुतिन्‍हो, सामाजिक कार्यकर्त्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: डिचोलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचं धूमशान; वाचा दिवसभरातील घडामोडी

St. Francis Xavier DNA Controversy: सुभाष वेलिंगकर गोव्याबाहेर? शक्तीप्रदर्शन करत पोलिसांना शरण येण्याची मोर्चेबांधणी; भूमिगत बैठका सुरु!

Fr. Mousinho de Ataide: अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अध्यक्षपदी मोवझिन आताईद यांची वर्णी!

Subhash Velingkar Case: 'पॉलिटिकल केस असेल तर ते तात्काळ कामाला लागतात, पण...'; वेलिंगकर प्रकरणी पालेकरांचा पोलिसांवर निशाणा!

Indian Air Force Day: जगातील चौथे सर्वात मोठे भारतीय हवाई दल; देशाच्या संरक्षणासह करते 'हे' काम

SCROLL FOR NEXT