Canva
गोवा

आम्‍हाला शांत गोवा हवाय; संपादकीय

गोमन्तक डिजिटल टीम

ख्रिस्ती आंदोलकांनी दक्षिणेत रस्ते अडवले, बऱ्याच पर्यटकांचे हाल झाले. ही वार्ता आजूबाजूच्या राज्यांत वाऱ्यासारखी पसरली आणि गोव्यात येऊ पाहणाऱ्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ‘गुगल’वर ‘गोवा’ सर्च केल्यावर पर्यटन व आदरातिथ्यासंदर्भात भरभरून माहिती समोर येते. सध्या मात्र आंदोलनाची वृत्ते अग्रक्रमाने समोर येतात. गोव्यात हिंदू -ख्रिश्चन संघर्षाची बिजे रोवली जात असल्याची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे.

गोव्यात सहा दिवसांपूर्वीच लोक रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली होती, परंतु त्याला पार्श्वभूमी होती बेकायदा भूरूपांतर प्रकरणांची (Illegal Land Conversions). ‘आमचा गोवा आम्हांला राखायचा आहे’च्या घोषणांनी राजधानी दुमदुमली होती. उत्तरेत पेडण्यापर्यंत व दक्षिणेत सासष्टीत तसा नारा घुमू लागला.

सरकारच्या कृष्णकृत्यांची चिरफाड झाली, छबी संकटात आली. तेवढ्यात सुभाष वेलिंगकरांना सेंट फ्रान्सिस झेविअरच्या ‘डीएनए’ तपासणीचा उमाळा आला. ख्रिस्ती समुदायाच्या भावना दुखावल्या जाणे साहजिक होते. वेलिंगकरांनी ज्याच्याप्रति टिपणी केली, ते ख्रिश्चनांचे श्रद्धास्थान आहे. वर्षापूर्वी फादर बोलमॅक्स यांची छत्रपती शिवरायांसंदर्भात जीभ घसरल्यावर जशा समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या, त्याचीच पुनरावृत्ती वेलिंगकरांच्या वक्तव्याने झालीय.

तीन दिवसांत चित्र पालटले. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले; परंतु भूरूपांतरांविरोधात नाही, धार्मिक अस्मिता जपण्यासाठी. सरकारच्या बेगडी मुत्सद्दीपणाचा हा परिपाक नव्हे का? फादर बोलमॅक्सने केलेल्या द्वेषमूलक वक्तव्यानंतर ज्या तडफेने कारवाईची सूत्रे हलली होती, ती वेलिंगकरांच्या वक्तव्यानंतर दिसली नाही. सरकारच्या हेतूप्रति शंकेस त्याचमुळे वाव राहतो.

गोमंतभूमी धार्मिक कट्टरतेची प्रयोगशाळा बनते आहे की काय, अशी आम्हांला भीती वाटतेय. कुणीही उठावे आणि बरळून जावे हा अपवाद आता नियम बनू पाहतोय. धार्मिक कलहाच्या ठिणग्या पाडणाऱ्या, प्रक्षोभक गरळ ओकणाऱ्या प्रमोद मुतालिकना तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकरांनी गोव्याच्या हद्दीत पाऊल ठेवण्यास कायद्याच्या चौकटीत राहून मज्जाव केला.

एकतेला तडा जाऊ नये, हा त्यामागील हेतू होता. सावंत सरकारच्या कार्यकाळात अशी कठोरता का दिसू नये? मध्यंतरी कुणी ‘गुरुजी’ दवर्लीत आले, त्यांनी चिथावणीखोर भाषण केले. गोमंतकीय त्याला बधले नाहीत. लोक समंजसपणा दाखवतात याचा अर्थ कुणीही काहीही बरळत राहावे, असा होत नाही. इतिहासात डोकावून कितीवेळा पाहणार, त्यातून काय हाती लागणार? तत्कालीन मिशनरींकडून ‘इन्क्विझिशन’चे जे प्रकार घडले, त्याचा वेळोवेळी लोकांनी धिक्कार केला आहे.

आता पुढे जायला हवे. इतिहास उगाळून वर्तमान दूषित करून सामाजिक हानीच संभवते. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय आहे. परंतु अभिव्यक्तीच्या नावाखाली अन्य धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा कुणालाही अधिकार नाही. आज प्रत्येक तालुक्यातून वेलिंगकरांचा निषेध होत आहे. ‘जुलूस’वरून तापलेले वातावरण निवळण्यापूर्वी निर्माण झालेला जनक्षोभ सरकारचे अपयश आहे. झोपी गेलेल्याला जागे करता येते, सोंग घेतलेल्यास कसे करणार?

ख्रिस्ती आंदोलकांना शांतता बाळगण्याचा सल्ला देणाऱ्या क्लॉड अल्वारिस, डॉ. ऑस्कर रिबेलो, सबिना मार्टिन्स यांची तारीफ करावी तितकी थोडी आहे. अशा धुरीणांमुळे एकता अखंडित आहे. राज्यकर्त्यांना असली पाहिजे ती राजमर्मज्ञता (स्टेट्समनशिप) क्लॉड अल्वारिस यांच्या ठिकाणी आहे. त्याच क्लॉडना अराजकता हवी, अशी संभावना करून सरकारने यापूर्वी वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे.

क्लॉडची सरकारने अवहेलना केला आहे. तेच क्लॉड सरकारचे दायित्व निभावत आहेत. स्वातंत्र्य, समतावादाचा पुरस्कार करणारे बडे आसामी आज आहेत कुठे? काही वर्षांपूर्वी ‘दक्षिणायन’ चळवळ उभी राहिली. त्यात अनेक जण सहभागी झाले; परंतु पुढे ती चळवळ दिशाहीन बनली. सरकारव्यतिरिक्त अशी एखादी शक्ती असावी, जिचा दरारा हवा. ज्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसेल.

मुळात वेलिंगकर हे कोण? ते जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडले तेव्हा त्यांना प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा होती, जी धुळीस मिळाली. त्यांच्यासोबत कट्टर विचारसरणीचीच मोजकी काही मंडळी बाहेर पडली होती. मूळ संघाला हे पक्के ठाऊक आहे- गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन एकाच मुशीतून पुढे आलेले आहेत. मूळ संघाने ‘भूमिका’ घेताना प्रगल्भता, धार्मिक तारतम्य बाळगले आहे. संघप्रमुख असताना वेलिंगकरांनी जेव्हा-जेव्हा धार्मिक विद्वेषपूर्वक आक्रस्ताळेपणा केला आहे, तेव्हा संघातही चर्चा झाली आहे. वेलिंगकरांच्या सध्याच्या वक्तव्यांनाही संघाचा पाठिंबा नसावा! संघ अशा दुफळी माजवणाऱ्या भूमिकेशी कधीही समरस होईल, असे वाटत नाही.

वेलिंगकरांनी यापूर्वीही अशा पद्धतीची विधाने केली होती. ‘फ्रान्सिस झेवियर गोंयचा साहेब नाही’, असा जेव्हा त्यांनी दावा केला, तेव्हा त्यांना कुणी दाद दिली नाही. लोकांना द्वेष नकोय. परंतु संयमालाही मर्यादा असते. सरकारने त्यांना वेळीच रोखायला हवे होते. वेलिंगकरांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. हिंदू व कॅथलिक यांच्या मिलाफातून समाज उन्नयनाचा नवा रंग उदयास आला. त्याद्वारे संस्कृती उन्नत व्हावी, हे देशाचे स्वप्न आहे. ते पूर्ण व्हायचे असेल तर वाचाळवीरांना रोखायला हवे.

गोव्यात कडवा राष्ट्रवाद वाढतो आहे, असा संदेश देशभर जाऊ लागला आहे. एकदा का धार्मिक हिंसेची ठिणगी पडली की आवरणे सोपे नाही. गोव्याचे मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही, ज्याचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील. छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले जातात तेव्हा चर्चनेही संबंधितांचे कान पिळले आहेत. गोव्यात एकही धार्मिक दंगल झाल्याचा इतिहास नाही. कारण, कुठल्याच गोमंतकीयाला ती नको आहे. जिथे अशी विषवल्ली वाढू लागेल तिथे तिची वेळीच छाटणी होणे आवश्यक आहे.

गोव्यासह अनेक राज्यांत व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्याचा गैरफायदा घेऊन अनेक हिंस्र संघटना क्रियाशील होत आहेत. गोवा सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. जे पर्रीकरांनी केले तेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही करणे अपेक्षित आहे. ज्यांची वादग्रस्त वक्तव्ये आधीच ज्ञात आहेत, ज्यामुळे गोव्यातील शांतता बिघडू शकते अशांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत. सामाजिक सलोखा राखणे ही जबाबदारी साऱ्यांची आहे. सरकारने विषाची परीक्षा घेऊ नये. आम्हांला शांत गोवा हवाय!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्याला परतीच्या पावसाचा दणका; सत्तरी, डिचोलीत बत्ती गुल!

St. Francis Xavier DNA Test Row: ''वेलिंगकरांना अटक केल्यास...''; हिंदू संघटनांचा इशारा

Mount Kailash Mystery: '...पण माणूस रहस्यमयी कैलास पर्वतावर चढाई करु शकला नाही'!

Israel-Iran War Impact: तणाव इराण-इस्त्रायलमध्ये, झळ भारताला; तेलाच्या सर्वात मोठ्या आयातदाराची वाढली चिंता!

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

SCROLL FOR NEXT