सासष्टी: गोवा आणि गोव्याची संस्कृती तसेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गोव्याचा आवाज बनावे, असे आवाहन खासदार विरियातो फर्नांडिस यांनी रवींद्र केळेकर ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांकडे संवाद साधताना काढले.
कोकणी भाषा मंडळ संचालित रवींद्र केळेकर ज्ञान मंदिराच्या विद्यार्थी मंडळाच्या शपथविधी सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोकणी भाषा मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष रत्नमाला दिवकर, रवींद्र केळेकर ज्ञान मंदिराचे व्यवस्थापक चेतन आचार्य, कार्यकारी सदस्य प्रशांत नाईक, मुख्याध्यापक अनंत अग्नी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनुप मडकईकर, विद्यार्थी मंडळाची प्रभारी शुक्ला परब आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मी नाविक दलाला सव्वीस वर्षे दिली, मग मी गोव्याच्या सामाजिक आंदोलनात सक्रिय व्हायच ठरवले. गोंयकारपण जपणे ही आजचे प्राधान्य आहे. आज गोव्याची जमीन बाहेरच्या लोकांना विकली जात आहे.
गोव्याचा प्रत्येक मुद्दा भविष्यात लोकसभेत मांडणार असून जनतेचा आवाज बनणार असल्याचे खासदार फर्नांडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांनी ज्ञान मंदिराच्या विद्यार्थ्यांना लोकसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
रत्नमाला दिवकर, चेतन आचार्य व प्रशांत नाईक यांची समयोचित भाषणे झाली. रत्नमाला दिवकर यांच्या हस्ते खासदार फर्नांडिस यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक अनंत अग्नी स्वागत केले. आभार शुक्ला परब यांनी मानले.
सर्व धर्माच्या लोकांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, तरच एकता आणि समता टिकून राहील. प्रत्येकांने एकमेकांचा विचार करावा. सैनिक कधीच मरत नाहीत. त्यामुळे अमर राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सेनेत भरती होण्याचे स्वप्न बघायला हवे. गोव्याला आज इको टुरिझमची गरज आहे. आपली शेती, गवताळ मैदाने आणि समुद्रकिनारे-टेकड्या यांचे जतन करून पर्यटन केले पाहिजे. गोव्याची अस्मिता, गोंयकारपण, शीत, कडी आणि कोकणी भाषेची आपली खरी संस्कृती जपा, असे आवाहन खासदार फर्नांडिस यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.